आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday 28 November 2012

लेणी

                                        लेणी
अजिंठा :इ. स. पूर्व २०० ते इ. स. ६५० या काळात अजिंठा ( व वेरूळ) येथील लेणी कोरली गेल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. रंगीत भित्ती चित्रे आणि लेणी यासाठी औरंगाबादेतील सोयगाव तालुक्यात असलेली अजिंठ्याची लेणी जगभरात प्रसिद्ध आहेत. येथे एकूण ३० लेणी बौद्धकालीन आहेत. बौद्धमंदिरे, गुंफा, गौतम बुद्धांच्या जीवनावर कोरलेले प्रसंग खडकांमध्ये कोरले आहेत. इंग्रज लष्करातील अधिकार्‍यांनी १८१९ साली ही लेणी शोधून काढली. अजिंठा गावापासून लेणी सुमारे ११ कि. मी. अंतरावर आहेत.

लेणी व्यवस्थित बघता यावीत, पडझड होऊ नये यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू आहेत. लेण्यांवर, धूर, धुराळा, पेट्रोल-डिझेल, हवा, पाऊस यांचा परिणाम होऊन ती खराब होऊ नयेत असा प्रयत्न केला जात आहे. प्रदूषण विरहित बसेसमधून पर्यटकांना लेणींपर्यंत जाता येते. स्वत:ची वाहने ४ कि. मी. अलीकडेच थांबवावी लागतात. औरंगाबादपासून सुमारे १०६ कि. मी. अंतरावर ही लेणी आहेत.

येथे दरवर्षी पर्यटन-उत्सवाचे आयोजन केले जाते. संपूर्ण भारतासह इतर अनेक देशांतील पर्यटक, अभ्यासकही येथे ‘कलेचा आनंद’ लुटण्यासाठी मोठ्या संख्येने भेट देतात. येथील शिल्पांतून ‘तो’ काळ समोर उभा राहतो. हे प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या महायान पंथाशी जोडलेले स्थान आहे.

वेरुळ :
खुल्ताबाद तालुक्यात वेरुळ येथे ३४ लेणी आहेत. त्यात १२ बौद्ध, १७ हिंदू, आणि ५ जैन धर्मीय लेणी आहेत. ‘कैलास लेणे’ हे म्हणजे एका डोंगरात कोरलेले शिल्प आहे. जगभरातील पर्यटक ते एक आश्चर्य म्हणून पाहायला वारंवार येतात. ही लेणी राष्ट्रकूट राजा कृष्ण याने खोदली असे अभ्यासक मानतात. वेरुळजवळच घृष्णेश्र्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे.

धुमार लेणी, कैलास मंदिर, बुद्धांची प्रचंड आकराची मूर्ती, रामायण-महाभारतातील दृश्ये - आदी शिल्पाकृती येथे प्रेक्षणीय आहेत.

घारापुरी लेणी : रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात घारापुरी या ठिकाणी लेणी आहेत. त्या लेण्यात एक प्रचंड मोठा हत्ती कोरलेला आहे. त्यावरून या लेणींना एलिफन्टा केव्हज् असे नाव पोर्तुगीजांनी दिले. या लेणी पाहण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून समुद्रातून लॉंचने जाता येते. येथील दगडात कोरलेले महादेवाचे मंदिर प्रेक्षणीय आहे.

उपरोक्त लेणींबरोबरच अतिशय प्राचीन अशी पितळखोरा लेणी (औरंगाबाद जिल्हा); कार्ले-भाजे व जुन्नर येथील लेणी (पुणे जिल्हा); उस्मानाबाद जिल्ह्यातील जैन लेणी, लातूर जिल्ह्यातील खरोसा लेणी व कान्हेरी गुंफा / लेणी (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली) ही महाराष्ट्रातील लेणी प्रेक्षणीय असून पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची आहेत.


महाराष्ट्रातील संग्रहालये:
प्रस्तावना -
निरनिराळ्या पंचवार्षिक योजनांमधून सरकारची धोरणे मांडली जातात. तसेच एका पंचवार्षिक योजनेत वस्तुसंग्रहालये, पुरातत्त्व संशोधनाच्या जागा यांचे जतन करण्याचे धोरण सुस्पष्टपणे मांडले गेले होते. जिल्हा आणि विभाग स्तरावर महत्त्वाच्या वास्तू, जागा, संग्रहालये स्थापन केली जावीत असे त्यानुसार ठरले. त्यामुळे प्रादेशिक स्तरावर नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे संग्रहालये आहेत. कोल्हापूर, सिंदखेडराजा (बुलढाणा जिल्ह्यात), सातार्‍यात ३ कलादालने, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, नांदेड जिल्ह्यात माहूर या ठिकाणी जिल्हास्तरीय संग्रहालये जतन करण्यात आली आहेत. यातील काही व्यक्तिगत संग्रहालये आहेत.

तसेच काही ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांवर, महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावे संग्रहालये व्हावीत असे सरकारचे धोरण प्रत्यक्षात राबवले जात आहे. त्यात छत्रपती राजर्षी शाहू, राम गणेश गडकरी, वीर सावरकर, आणि महात्मा फुले यांच्या स्मृती जतन करणारी संग्रहालये सुरूही झाली आहेत.

१९८४ मध्ये प्रसिद्ध सिनेनट श्री. चंद्रकांत मांढरे यांनी स्वत:चे घर आणि संग्रहात असलेली सर्व पोट्रेटस् व निसर्गचित्रे सरकारने संग्रहालयात जतन करावीत यासाठी दान केली आहेत. कोल्हापुरातील त्यांच्या संग्रहात जवळजवळ ३०० चित्रे आहेत. अनेक कलाप्रेमी मंडळी या संग्रहाचा आस्वाद आता घेऊ शकतात.
काही संग्रहालयांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

रिझर्व बँकेचे चलनाचे संग्रहालय, मुंबई.जानेवारी, २००५ मध्ये या संग्रहालयाची मुंबई येथे स्थापना झाली. हे भारतातील पहिलेच चलनांचे संग्रहालय आहे. तेव्हाचे देशाचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्याचे उद्घाटन केले.

चलन व्यवहारात कस-कसे बदल झाले, नाणी, नोटांचे बदलते आकार, रंग याची संग्रहालयामुळे कल्पना येते. निरनिराळे धातू, मिश्र धातू यांचा या संग्रहात समावेश आहे. इ. स. पूर्व ६ व्या शतकापासून ते आजतागायत चलनात झालेली स्थित्यंतरे त्यामुळे सर्वांसमोर येतात. नाणी, नोटा, धनादेश(चेक्स), हुंडी यांमध्ये निरनिराळ्या धातूंचा, कागदाचा उपयोग - चलनात कसा होत गेला हे यावरून समजते.

लहान मुलांसाठी माहिती देणारी दालने त्यात स्वतंत्रपणे मांडली आहेत. त्यातून नाण्यांचा इतिहास, माहिती ही खेळांमधून सांगितली आहे.

फिरोजशहा मेहता मार्गावर, फोर्ट भागात, अमर बिल्डिंग या ठिकाणी मुंबईत हे रिझर्व बँकेने सुरू केलेले संग्रहालय आहे.

नॅशनल मेरिटाईम म्युझियम, मुंबई
मुंबईत हे संग्रहालय आहे. भारतीय नौदलाने हे संग्रहालय तयार केले आहे. इतर देशातील मॉडेल्स घेऊन त्यावरून मुंबईत बांधण्यात आलेल्या बोटींचे नमुने त्यात आहेत. नौसेना किंवा नौदल याविषयी रस असणार्‍या पर्यटकांना व अभ्यासकांना हे प्रतिकृतींचे संग्रहालय एक वेगळाच आनंद देते.

डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (व्हिक्टोरिया - अल्बर्ट म्युझियम), मुंबई .
मुंबईत भायखळा येथे या संग्रहालयात शस्त्रास्त्रे, चर्मकला, कुंभारकाम, हस्तीदंतावरील कोरीव काम, प्राचीन लिखित दस्तऐवज अशा विविध विषयांवरील माहिती व वस्तूंचा संग्रह आहे. हे मुंबईतील जिजामाता उद्यानात असून या संग्रहालयातून बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना (१८८३) झाली.

No comments: