आदर्श शिक्षक नुसता साक्षर असणारा मतदार तयार करीत नाही तर तो कर्तव्यदक्ष असा नागरिक निर्माण करतो. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे कि दुस-या कोणत्याही उपायांनी नागरिक निर्माण करता येत नाही आणि ज्या समाजात मतदारांपेक्षा नागरिकांची संख्या अधिक असते, तो समाज, तो देश अजिंक्य ठरतो; इतरांसाठी तो आदर्श देश बनतो. कारण मतदार हा आपोआप तयार होतो, तर नागरिक घडवावा लागतो. मतदार हा स्वत:च्या संसारापलीकडे बघत नसतो, तर नागरिक हा समाजाच्या संसाराची काळजी वाहतो. मतदार हा आपलं मत आणि मन विकून स्वत:चा खिसा भरण्यात धन्यता मानतो. नागरिक हा कधीही विकला जात नाही. मतदार रस्त्यावर थुंकायला कमी करीत नाही. त्याला त्याची लाज वाटत नाही; तर नागरिक त्याने टाकलेली थुंकी स्वच्छ करण्यात धन्यता मानतो. मतदार हा अपघातात जखमी होऊन बेशुध्द झालेल्या माणसास ओलांडून जाईल किंवा त्याच्या खिशातील पैसे पळविल, पण नागरिक मात्र त्याचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करील; अन् तेही उपकारांची भावना न ठेवता. केवळ माणुसकी म्हणून अशा सजग – सेवाभावी आणि समर्पित नागरिकांची फौज केवळ उत्कृष्ट असणारा शिक्षक निर्माण करु शकतो, यात शंका नाही. पूज्य विनोबाजींच्या शब्दांत आदर्श शिक्षक विद्यार्थी आणि पालकांना ज्ञानपारायण करतो आणि ज्ञानाला सेवापारायण बनवितो.
आत्म्याचे सर्वगामी उन्नयन झालेला नागरिक कशामुळे निर्माण होतो? कशातून तयार होतो? तो केवळ चार कविता आणि चार गणितं शिकवली म्हणून तयार होत नाही. इतिहासाचं एखाद पानं शिकवून तो तयार होत नाही, तो तयार होत नसतो; तो तयार होतो संस्कारांनी, सशक्त बनलेल्या शिक्षणाने. संस्कारसंपन्न शिक्षण ही आज आमच्या देशाची – समाजाची अत्यंत निकडीची अशी गोष्ट झाली आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे की (ते कदाचित अपुरे असण्याचीही शक्यता आहे.) आज आपल्या समाजात अनाचार, स्वैराचार, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, खाबूगिरी, क्रौर्य, हिंसा, लुटालूट, स्त्री बलात्कार, शोषण, फसवणूक, भोगप्रवणता, धनलोभ, हत्याकांड यांसारख्या समाज जीवनाला अध:पतीत करणा-या गोष्टी वारंवार घडतात. त्याच मूळ कारण संस्काराशिवाय दिल्या जाणा-या शिक्षणात आहे. भविष्याचा विचार न करता आजचा दिवस उत्कंठ भोगविलासात घालवणारी आजची जी चंगळवादी वृत्ती आहे त्यामागेही संस्कारशून्य जीवनदृष्टी आहे. संस्कारमुक्त जीवनदृष्टी हीसुध्दा शिक्षणातून प्राप्त होत असते. त्यामुळे आम्ही आज साक्षर आहोत. आज आम्ही शिक्षित आहोत. सुशिक्षित नाही. संस्कारित कमी आहोत. देशाची अत्यंत महत्त्वाची गुपिते इथला एखादा नराधम चार – दोन लाखांपोटी शत्रूला विकतो. यामागील कारणे कोणती? त्याला देशप्रेमाचे न मिळालेले संस्कार हेच कारण आहे. पैशाला परमेश्वर मानणारी इथली धनलोभी माणसं दुधात भेसळ करतात. तेलात भेसळ करतात, मसाल्यात, अन्नात भेसळ करतात. जीवरक्षक औषधांत भेसळ करतात. उद्या ते आईचे दूध विकायला कमी करणार नाहीत आणि त्यातही ते भेसळ करतील. हे सारं का घडतं? त्यांना संस्कारक्षम शिक्षण मिळालं नाही म्हणून किंवा त्या शिक्षणाचा त्यांनी त्याग केला म्हणून. म्हणून या सा-या रोगांवर एकच उपाय आहे; तो म्हणजे संस्कारसंपन्न शिक्षकांनी संस्कारांना प्राधान्य देऊन केलेले शिक्षण. संस्कारांशिवाय केलेले शिक्षण म्हणजे आत्मा नसलेले शरीर असे मला वाटते. संस्कारांशिवाय असणारे शिक्षण म्हणजे मूर्तीशिवाय असणारे मंदिर. संस्कारांशिवाय असणारा माणूस म्हणजे दोन पायांवर चालणारा पशू होय. ही संस्कार पेरण्याची जबाबदारी उत्कृष्ट शिक्षकावर येऊन पडते. त्यांनी संस्कारदीप होऊन अवतीभवतीचा दाटलेला अंधार दूर केला तरच या देशाचा भाग्योदय लवकर होऊ शकेल, यात शंका नाही. मला असं नेहमी वाटतं की शिक्षणाचं सौंदर्य शिक्षकात लपलेलं असतं. शिक्षकाचं सौंदर्य त्याच्या चारित्र्यात लपलेलं असतं. चारित्र्याचं सौंदर्य त्याच्या संस्कारात लपलेलं असतं. संस्काराचे सौंदर्य आचरणात लपलेलं असतं आणि आचरणाचं सौंदर्य समाजजीवनातून प्रकट होत असतं. आज या सौंदर्याचा मूळ उद्गाता शिक्षक आहे. तो तेलाने माखलेल्या कागदाच्या बोळ्यासारखा टाकाऊ व निरुपयोगी असेल तर काय साधलं जाणार? त्यासाठी हवा आदर्श शिक्षक, उत्कृष्ट संस्कार करणारा ‘परिपूर्ण’ शिक्षक. व्रत म्हणून अध्यापन क्षेत्रात असलेला शिक्षक हा विद्यार्थ्यांचा शिल्पकार, पालकांचा मित्र, गावक-यांचा मार्गदर्शक, समाजाचा सेवक, वर्तमानाचा भाष्यकार आणि राष्ट्राचा निष्ठावंत उपासक असला तरच आजच्या विदीर्ण शिक्षणाला दिशा लाभेल. सत्त्व लाभेल. सामर्थ्य प्राप्त होईल. समाज आणि संस्कृतीला आपणाला हवा तसा आकार देता येईल.
असा उत्कृष्ट शिक्षक घडविण्यासाठी काय केलं पाहिजे? कोणी केलं पाहिजे? आणि त्यांच प्रारुप काय असलं पाहिजे हा एक कमालीचा जटिल प्रश्न आहे. याचं एकच एक उत्तर संभवत नाही. त्यात पुन्हा शिक्षण हा विषय चौघांच्या खांद्यावर वाहून न्यायचा विषय, म्हणजे त्याच्या मरणाची वा सरणाची अंतिम जबाबदारी कुणाचीच नाही. हे चार खांदेकर म्हणजे केंद्रसरकार, राज्यसरकार, संस्थाचालक आणि मुलांचे पालक. आपल्यापुरती आनंदाची गोष्ट अशी की आपल्या दोन्ही सरकारला अनेक दिवस शिक्षणमंत्रीच मिळत नाही. जो कसाबसा मिळतो तो या खात्यावर कमालीचा नाराज झालेला असतो. शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी किंवा आदर्श शिक्षक घडविण्यासाठी तो उत्साहाने पुढाकार घेत नाही. दिवस मोजत हा खिळखिळा झालेला वंगणविरहित बैलगाडा तो वर्षभर चालवितो व तेथून पळ काढतो. मग दुस-याची शोधाशोध सुरु होते. चार - पाच वर्षांत जर चार – पाच शिक्षणमंत्री या खात्याला लाभले तर त्या खात्याचं भाग्य काय असणार? त्यातच भरीस भर म्हणजे मतलबी आणि धंदेवाईक शिक्षणसंस्था आणि उदासीन पालक वर्ग (निदान ग्रामीण भागात तरी) यांची यात भर पडते. दंड, दमन, दादागिरी, दंडुकशाही यांच्या धाकात असलेला शिक्षक येथे कसा टिकणार, कसा शिकवणार नि काय शिकवणार? उत्कृष्ट शिक्षक त्यातून कसा तयार होणार? अर्धवट पिकलेली फळे काढून ती एखाद्या अंधा-या खोलीत पिकायला घातली तर ती जशी धड पिकत नाहीत आणि टिकत नाहीत; ती जागच्या जागी जशी नासतात तशी आजच्या आमच्या शिक्षकांची स्थिती झालेली आहे. त्यात पुन्हा तो वशिल्याचा, राखीव जागेचा, नातेवाईक असलेला वा इतर हितसंबंध टिकवण्यापोटी नोकरीला घातलेला असेल तर सगळा आनंदच आनंद मानायचा. अशा शिक्षकांना केशवसुत आणि केशवकुमार यातला फरक ठाऊक नसतो. वारांगना आणि वीरांगना त्यांना एकच वाटतात. मन आणि वमन यातला अर्थ यांना ज्ञात नसतो. अशा या सत्त्व नसलेल्या मातीपासून कशा मूर्ती (आदर्श शिक्षकाच्या) घडविणार आणि कोण घडविणार?
२) अशा निवडलेल्या गुणी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षक होण्यासाठी विशेष शिक्षण दिलं जातं. तेथे त्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व समृध्द केलं जातंच. पण जीवनाला व्यापून उरणा-या सर्व बाबींचं परिपूर्ण व चांगलं शिक्षण दिलं जातं.
३) त्यांचं वक्तृत्व, भाषा कौशल्य, अवांतर वाचन, शब्द वैभव याबरोबर कला, क्रीडा, संगीत आणि संस्कार संगोपन वृत्ती वाढीस लागावी अशी व्यवस्था केली जाते.
४) मुलांचं बालमानसशास्त्र जाणून घेणं, त्यांच्याशी वात्सल्यानं वागणं – बोलणं, त्यांची अडचण जाणून ती सोडवंण, त्याला प्रोत्साहन देत जाणं यासाठीही विशेष तयारी केली जाते.
५) तो स्वत: साधना, सेवा, समर्पण, मूल्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती यांनी कसा परिपूर्ण बनेल यासाठी भाषण + संवाद + प्रयोग + अनुभवप्राप्ती यांचीही जोड दिली जाते.
६) आपणांकडे आज असलेल्या बी.एड् आणि डी.एड् या शिक्षणकामात वरील पाच बाबी नियोजनपूर्वक समाविष्ट करुन नियोजनपूर्वक – गांभीर्याने राबवल्या तर खूप चांगला फरक जाणवेल. एक – दोन वर्षांत नसेल पण एका दशकात शिक्षण आणि विद्यार्थी यात लक्षणीय परिवर्तन झालेलं जाणवेल.
७) अनेकांनी मागे अशी सूचना केली होती की, शिक्षणाचं खातं हे न्याय खात्याप्रमाणे स्वतंत्र असावं आणि त्या त्या क्षेत्रातील नामवंतांनी (शास्त्रज्ञांसह) त्याचं प्रशासन स्वतंत्रपणे करावं. त्यात कुणाचाही हस्तक्षेप असता कामा नये. सर्व निर्णय व अमंलबजावणी या शिक्षणतज्ज्ञांची असेल.
८) काही साम्यवादी देशात इयता १ ते ७ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी ८०% स्त्रिया आणि २०% पुरुष या प्रमाणात भरती केली जाते. तसा प्रयोग आपल्याकडे करुन बघावा.
९) स्त्री – पुरुष समानता, सामाजिक बांधिलकी, निरर्थक धारणांचा त्याग, संस्कारांची कृतिशील शिकवण यावरही विशेष भर देणारी प्रणाली असावी.
१०) वर्ग नावाच्या कोंडवाड्यात आजही सत्तर – ऎंशी कोकरे कोंडून ठेवली जातात. आणि शाळा सुटेपर्यंत सांभाळली जातात. त्याऎवजी वैयक्तिक लक्ष देता येईल व त्या त्या मुलांचा गुणविशेष विकसित करता येईल, एवढीच विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्गात असावी.
११) या शिक्षकांचीही दर तीन वर्षांनी कसून परीक्षा घेतली जावी, जेणेकरुन आपलं ज्ञान अद्ययावत ठेवावं लागेल. ही परीक्षा आवश्यक असावी. त्यावर वेतन अवलंबून असावं.
१२) आपल्याकडे एकच एक अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकं नेमलेली असतात. मागास भूप्रदेश, आदिवासी प्रदेश, विशिष्ट भूभाग, त्या भूभागाची गरज व मागणी यांचा थोडाफार विचार करुन अभ्यासक्रमात बदल करावा असं वाटतं.
१३) शिक्षणाला शरीर श्रमाची जोड देण्यात यावी. पाश्चात्य देशातही अशी योजना राबविली जाते. श्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सामाजिक ऎक्य भावना, उपेक्षितांची सहवेदना आणि सर्जक भूमीचं महत्त्व या गोष्टी त्याद्वारे मुलांवर बिंबवल्या जातील. शेतीत काम करण्याची तरुणास आज जी लाज वाटते ती वाटणार नाही.
१४) या धोरणाला सातत्य असावं. कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी तज्ज्ञांनी केलेल्या या उपक्रमात – प्रारुपात राजकारण्यांनी हस्तक्षेप करु नये, तो बंद पाडू नये.
एवढ्या गोष्टी निष्ठेने केल्या तर उत्कृष्ट शिक्षक तयार होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल. त्यातूनच माणसांच्या चांगुलपणावर श्रध्दा असणारा समाज निर्माण होईल व समाज आणि शिक्षण, शिक्षण आणि संस्कार, ज्ञान व कर्म, शिक्षण आणि गुणविकास, शिक्षण आणि रोजगार, शिक्षण आणि संशोधन, उपक्रम यामध्ये ऎक्य निर्माण होईल. यातून सामर्थ्य निर्माण होईल आणि त्या उर्जेतून सारा देशचं निश्चित दिशेने. निश्चित हेतूने ध्येयाप्रत जाऊन पोहचेल यात शंका नाही.
लेखक: डॉ. द. ता. भोसले
सोलापूर
सोलापूर
संकलन -विवेक शेळके
No comments:
Post a Comment