आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday, 28 November 2012

महाराष्ट्रातील शेती


 
           महाराष्ट्र ही पूर्वापार कृषीवलांची भूमी! ‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’’ असे वर्णन असणार्‍या आपल्या महाराष्ट्रात हवामान, पाणी, माती यांमध्ये कमालीचे वैविध्य! बहुतेक सर्व प्रकारची अन्नधान्ये, फळे, फुले, भाजीपाला यांचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. त्यामुळेच देशाच्या कृषी व्यवसायात महाराष्ट्राचे आगळे स्थान निर्माण झाले आहे. एका अर्थाने महाराष्ट्रात पूर्णान्न शेती केली जाते असे विधान केल्यास ते अतिशयोक्तीचे वाटणार नाही. कष्टकरी शेतकरी, संशोधन करत नवनवे प्रयोग करणारे शेतकरी यांच्या अपार कष्टांच्या माध्यमातून आपले राज्य शेती व शेतीपूरक उद्योग या क्षेत्रांत प्रगती साधत आहे.

महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू असून मोसमी पावसावर अवलंबून आहे. एकूण २२५.७ लाख हेक्टर पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ८० ते ८५% शेती जिरायती स्वरूपाची असून सुमारे १६% क्षेत्र बागायती शेतीखाली आहे. महाराष्ट्राच्या सुमारे १० कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ५८% लोक ग्रामीण भागात राहतात तर एकूण मनुष्यबळाच्या ५५% लोक शेतीवर अवलंबून आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषिक्षेत्राचा वाटा एकूण सुमारे १५% आहे. महाराष्ट्रातील प्राकृतिक रचनेत विविधता आढळते त्याचप्रमाणे हवामानामध्येही विभिन्नता आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात एकाच प्रकारची शेती होती नाही. मशागत करण्याच्या पद्धतीमध्ये प्रादेशिक घटकांचा मुख्यत्वेकरून प्रभाव पडतो. त्यानुसार महाराष्ट्रातील शेतीचे पुढील प्रकार पडतात. -

१. ओलीत शेती २. आर्द्र शेती ३. बागायत शेती ४. कोरडवाहू किंवा जिराईत शेती
५. पायर्‍यापायर्‍यांची शेती ६. स्थलांतरीत शेती

ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांचा प्रमुख व्यवसाय अर्थातच शेती हाच आहे. आजही मराठी शेतकरी जमिनीला आई मानतात, पशु-धनाची, कृषिअवजारांची पूजा करतात. आपले शेतकरी शेतीला केवळ उपजीविकेचे साधन मानत नाहीत. महाराष्ट्रात ‘कृषीसंस्कृती’ हा शब्द सहजगत्या वापरला जातो. शहरीकरण जरी वाढत असले, तरी आजही ‘शेती’ हा लाखो शेतकर्‍यांच्या जीवनाचे एक प्रमुख अंग आहे, जीवन जगण्याची पद्धती आहे. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था या कृषिआधारीत समाजव्यवस्थेशी जोडलेल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक सण-उत्सव हे शेतीच्या वेळापत्रकाशी जोडलेले आहेत. महाराष्ट्रात शेती हे असे क्षेत्र आहे की, ज्यावर संपूर्ण राज्याचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण अवलंबून आहे. सर्वांगीण विकासासाठी सातत्याने आधुनिकतेची कास धरणार्‍या महाराष्ट्रात शेती क्षेत्रातही सातत्याने नवनवीन उपक्रम, तंत्रज्ञान यांचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत
.सर्वांगीण विकासासाठी सातत्याने आधुनिकतेची कास धरणार्‍या महाराष्ट्रात शेती क्षेत्रातही सातत्याने नवनवीन उपक्रम, तंत्रज्ञान यांचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत

No comments: