*विद्रोही कलावंत अण्णाभाऊ साठे*
१ ऑगस्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. अण्णाभाऊंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना. अस्पृश्य जातीमध्ये जन्म झाल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना बालपणापासूनच दारिद्रयाचे आणि सामाजिक विषमतेचे चटके सहन करावे लागले. एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता अण्णाभाऊंचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही. जीवनाच्या शाळेतच अण्णाभाऊ घडत गेले. अर्थातच औपचारिक शिक्षण न मिळाल्यामुळे अनौपचारिक शिक्षणातून त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक समृद्ध होत गेले. त्यांचा वाटेगाव ते मुंबई हा प्रवासच मुळात कामाच्या, भाकरीच्या शोधात झाला आहे. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर त्यांना पोटासाठी अनेक प्रकारची कामं करावी लागली. बालपणातील अशा दाहक, वेदनामय अनुभवामुळे त्यांचे मन बंडखोर, विद्रोही बनत गेले.
मुंबईमध्ये पोटासाठी अनेक प्रकारची कामं करताना, कामगार म्हणून वावरताना त्यांना मार्क्स, लेनिन, गॉर्कीच्या विचाराने प्रभावित केले. समाजातील आर्थिक विषमता, दारिद्रय नष्ट करण्याचा आणि सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा समान हक्क देणारा मार्ग म्हणून त्यांना मार्क्सवाद प्रेरक वाटला. रशियन मार्क्सवादी कादंबरीकार गॉर्की हा अण्णाभाऊ साठेंचा आवडता लेखक आहे. गॉर्कीच्या साहित्याचा आणि विचाराचा मोठा प्रभाव त्यांच्या साहित्यावर दिसून येतो. त्यामुळेच ते साहित्याकडे समाजपरिवर्तनाचे, क्रांतीचे एक महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून पाहतात. उपेक्षित समाजाला सर्व प्रकारच्या गुलामीतून मुक्त करण्याचे काम त्यांना साहित्याकडून अपेक्षित आहे. मार्क्सवादाबरोबरच नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांचा विचारही त्यांना समाजपरिवर्तनासाठी प्रेरक वाटला. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा विचार त्यांना महत्त्वाचा वाटतो. म्हणून मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद या त्यांच्या लेखनामागील दोन मुख्य प्रेरणा आहेत.
अण्णाभाऊंची मराठी मातीशी आणि लोकजीवनाशी असणारी नाळ अतिशय घट्ट आहे. बालपणातच लोककलेचा त्यांनी जवळून अनुभव घेतला होता. अर्थातच, उपेक्षितांच्या जीवनातील लोककलेला म्हणजेच तमाशा, पोवाडा, लावणीला मार्क्सवादी दृष्टीचा साज चढवून अण्णाभाऊंनी समाज परिवर्तनाच्या संघर्षाला सुरुवात केली. कामगारांना जागृत, संघटित करण्यासाठी ते पोवाडे, लावण्या, क्रांतिगीते रचू लागले. मंचावरून सादर करू लागले. साधारणपणे १९४२ ते १९५० या काळामध्ये अण्णाभाऊ ‘लोकशाहीर’ म्हणून नावारूपाला आले.
अण्णाभाऊ लोककलावंत होते. त्यांच्याकडे मानवी जीवन समजून घेण्यासाठी लागणारी संवेदना होती. या संवेदनेमुळे आणि मार्क्सवादी तत्त्वज्ञानामुळे त्यांना मानवी जीवनाकडे आणि साहित्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळेच त्यांना माणूस आणि त्या माणसाचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात.
‘लाल बावटा कलापथका’च्या माध्यमातून अण्णाभाऊंनी महाराष्ट्रभर जनजागृतीचे काम केले. शेकडो कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जनतेला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. ते स्वतःच कामगार असल्यामुळे त्यांना कामगारांच्या मूलभूत प्रश्नांची जाणीव होती. कामगारांचे भांडवलदार वर्गाकडून होणारे शोषण त्यांना चांगलेच माहीत होते. या भांडवलशाहीच्या जोखडातून कामगारांना मुक्त करण्यासाठी त्यांनी कामगार लढîkत स्वतःला झोकून दिले. कामगार चळवळ मजबूत करण्यामध्ये अण्णाभाऊंचे जसे महत्त्वाचे योगदान आहे, तसे अण्णाभाऊंच्या जडणघडणीत कामगार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जीवनसंघर्षाचा पूर्वार्ध म्हणून कामगारांच्या लढयातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
१९४२ ते १९६२ हा वीस वर्षाचा काळ अण्णाभाऊ साठे यांना माणूस आणि कलावंत म्हणून अधिकाधिक उंचीवर नेणारा ठरला. वाटेगाव ते मुंबई हा प्रवास पायी करणारे अण्णाभाऊ आपल्या आवडत्या तत्त्वज्ञानावर उभा असलेला देश पाहण्यासाठी १९६१ मध्ये मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने करतात.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अण्णाभाऊंसारख्या लढाऊ कार्यकर्त्यामुळे अधिक व्यापक आणि सामर्थ्यशाली बनली. अशा अनेक कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली. कामगार, कवी, लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, लोकनाटयाचे जनक, उत्तम नट, पत्रकार, निर्माता, आणि माणसावर, मानवी जीवनावर उत्कट प्रेम करणारा माणूस असे विविध पैलू अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वात आहेत. या अर्थाने अण्णाभाऊ साठे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ठरते. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा शेवट मात्र मनाला चटका लावणारा आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबरी, शाहिरी कविता, लोकनाटय, नाटक आणि स्फुट लेखनातून विद्रोही जाणिवांचा उत्कट आविष्कार झाला आहे. वर्ग-जाती संघर्षाचे संमिश्र चित्रण त्यांच्या साहित्यात येते. म्हणून वर्गसमाज आणि जातिसमाज हे त्यांच्या विद्रोहाचे लक्ष्य आहे. अन्यायाविरुद्धची झुंज, संघर्ष, विद्रोह हा त्यांच्या लेखनविश्वाचा स्थायी भाव आहे. शोषक आणि शोषित यांच्यातील संघर्ष हा त्यांच्या साहित्याचा मुख्य विषय आहे. त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनातून शोषणाचा धिक्कार, प्रतिकार आणि स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभावाचा पुरस्कार प्रत्ययास येतो. सामाजिक आणि आर्थिक विषमतेने शोषित माणसाचे ‘माणूस’ म्हणून असणारे अस्तित्वच नाकारले. अशा शोषितांना माणूसपण प्राप्त करून देण्यासाठीच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विद्रोही जीवनमूल्यांची पेरणी करते. उपेक्षित-शोषितांच्या अंतरंगातील विद्रोह आधुनिक मराठीतील ललित साहित्यात प्रथमच अण्णाभाऊंच्या साहित्यातून अनुभवाचा व्यापक पट घेऊन अभिव्यक्त झाला.
अण्णाभाऊपूर्व मराठी साहित्याचा केंद्रबिंदू मध्यमवर्ग होता. अण्णाभाऊंनी मात्र मस्तकात विद्रोह घेऊन जगणाऱ्या उपेक्षित, शोषित वर्गाला मराठी साहित्याचा केंद्रबिंदू बनविले. हा त्यांचा विद्रोही प्रवास आधुनिक मराठी ललित साहित्यात अपूर्वच म्हणायला हवा. एकूणच, अण्णाभाऊ साठे यांचे सबंध साहित्यच विद्रोहाचे जीवनगाणे आहे. या त्यांच्या साहित्याच्या मस्तकात विद्रोहाचा अग्नी आहे, तर हृदयात समतेचे, न्यायाचे मंगलमय मधुर, सुगंधी संगीत आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे सबंध साहित्यच विद्रोही तत्त्वज्ञानावर उभे आहे. हे विद्रोही तत्त्वज्ञान त्यांना मार्क्स, गॉर्की, फुले, आंबेडकर यांच्याकडून मिळालेले आहे. या विद्रोही तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याच्या भूमीत समाजपरिवर्तनाचा विचार पेरला. क्रांतीचा मळा फुलवला, सजवला. म्हणून आधुनिक मराठीतील महात्मा फुल्यांपासून चालत आलेल्या विद्रोही ललित साहित्याच्या प्रवाहाला अधिक सशक्त आणि व्यापक बनविणारे साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे महत्त्वाचे ठरतात.
शोषणाला नकार देणारी आणि समतेचा पुरस्कार करणारी विद्रोही सांस्कृतिक परंपरा बळीराजा, चार्वाक, महावीर, बुद्ध, कबीर, तुकाराम, फुले-शाहू-आंबेडकर यांनी समृद्ध केली आहे. सर्व प्रकारच्या शोषणावर ‘घाव’ घालणारे अण्णाभाऊ साठे याच विद्रोही सांस्कृतिक विचारधारेचे वारसदार ठरतात. 🙏🏻
!! विनम्र अभिवादन !!