लोककला हे महाराष्ट्रानं जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. तशाच काही लोककला या धार्मिक व आध्यात्मिक श्रद्धांशीही निगडीत आहेत. आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल समाजाला जेव्हा शिक्षणाचा आधार नव्हता, तेव्हा या लोककलांनी त्यांचे प्रबोधन केले, आजारांवर झाडपाल्यांची औषधे सांगीतली आणि ईश्वराच्या आधाराने जगण्यावरची श्रद्धा वृद्धिंगत केली.
लोकश्रद्धेतून जन्मलेल्या व लोकशिक्षणासाठी अखंडपणे चालत आलेल्या या लोककला आजही ग्रामीण जीवनासाठीच नव्हे तर मराठी संस्कृतीपासून काहीशा दुरावत चाललेल्या शहरी संस्कृतीसाठीही गरजेच्या आहेत.
महाराष्ट्राची जडणघडण करण्यात या लोककलांचा मोठा वाटा आहे. प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक पातळीवर समाजमनास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोककलांनी केला म्हणूनच आज आपण म्हणू शकतो की, महाराष्ट्र म्हणजे सप्तसुरांचा संगम आणि सप्तरंगांची उधळण आहे. इथे मनातला गुंता शेजारीण सोडवू शकत नाही, पण वर्षातून एकदा येणारी कडकलक्ष्मी सगळ्या रोगांवर औषध देऊन जाते. ज्वारीच्या शेतातून कुणी चालू लागला, तर कधी कडाक्याच भांडण होतं, पण मोरपिसाची टोपी घातलेल्या वासुदेवाच्या झोळीत सूपभर जोंधळे आनंदानं घातले जातात. कधी स्वत:च्या पणजोबाचं नावं आम्हाला माहिती नाही, पण वर्षातून एकदा येणारा हेळवी आमच्या पणजोबाचा खापर पणजोबा कुठे राहायचा हे पत्त्यासहीत सांगतो. खरा पोलीस गावात कधी येतो की नाही हे माहीत नाही, पण बहुरूपी आला की पोरं-सोरं डालग्यामागं गुडूप होतात. ब्रह्मदेवानं गाठ मारली म्हणून लग्न होतं, पण गोंधळ्यानं गोंधळ घातल्याशिवाय संसार सुरू होत नाही. आम्ही मूल व्हावं म्हणून नवस बोलतो, पण मूल झालं की ते देवाला सोडतो. आमचा अर्धा गाव कीर्तनात दंगलेला असतो, तर अर्धा गाव तमाशात रंगलेला असतो. गळ्यात माळ घालून काही लोक पंढरीची वाट चालतात, तर काही म्हसोबाला बोकड कापून स्वत:च त्यावर ताव मारतात. जसा आहे तसा, पण आपला महाराष्ट्र रंग-ढंगदार आणि नवरसपूर्ण आहे एवढं खरं!
लोकश्रद्धेतून जन्मलेल्या व लोकशिक्षणासाठी अखंडपणे चालत आलेल्या या लोककला आजही ग्रामीण जीवनासाठीच नव्हे तर मराठी संस्कृतीपासून काहीशा दुरावत चाललेल्या शहरी संस्कृतीसाठीही गरजेच्या आहेत.
महाराष्ट्राची जडणघडण करण्यात या लोककलांचा मोठा वाटा आहे. प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक पातळीवर समाजमनास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोककलांनी केला म्हणूनच आज आपण म्हणू शकतो की, महाराष्ट्र म्हणजे सप्तसुरांचा संगम आणि सप्तरंगांची उधळण आहे. इथे मनातला गुंता शेजारीण सोडवू शकत नाही, पण वर्षातून एकदा येणारी कडकलक्ष्मी सगळ्या रोगांवर औषध देऊन जाते. ज्वारीच्या शेतातून कुणी चालू लागला, तर कधी कडाक्याच भांडण होतं, पण मोरपिसाची टोपी घातलेल्या वासुदेवाच्या झोळीत सूपभर जोंधळे आनंदानं घातले जातात. कधी स्वत:च्या पणजोबाचं नावं आम्हाला माहिती नाही, पण वर्षातून एकदा येणारा हेळवी आमच्या पणजोबाचा खापर पणजोबा कुठे राहायचा हे पत्त्यासहीत सांगतो. खरा पोलीस गावात कधी येतो की नाही हे माहीत नाही, पण बहुरूपी आला की पोरं-सोरं डालग्यामागं गुडूप होतात. ब्रह्मदेवानं गाठ मारली म्हणून लग्न होतं, पण गोंधळ्यानं गोंधळ घातल्याशिवाय संसार सुरू होत नाही. आम्ही मूल व्हावं म्हणून नवस बोलतो, पण मूल झालं की ते देवाला सोडतो. आमचा अर्धा गाव कीर्तनात दंगलेला असतो, तर अर्धा गाव तमाशात रंगलेला असतो. गळ्यात माळ घालून काही लोक पंढरीची वाट चालतात, तर काही म्हसोबाला बोकड कापून स्वत:च त्यावर ताव मारतात. जसा आहे तसा, पण आपला महाराष्ट्र रंग-ढंगदार आणि नवरसपूर्ण आहे एवढं खरं!
१. वासुदेव
गोविंद रामा हो, गोपाळा रामा जी जी
केशवा रामा हो, माधवा रामा जी जी सूर्यप्रकाश चंद्रप्रकाशात मिसळताना पक्षांची घरटी किलबिलू लागतात, त्यांच्यासोबत, तालासुरात, टाळ-चिपळ्यांच्या तालावर वासुदेव मनाचा ताबा घेतो आणि बाळ गोपाळांचा मेळा अंथरुणातून थेट अंगणात येतो. डोक्यावर मोरपिसांनी सजविलेला शंकुच्या आकाराचा मुकुट, अंगात शुभ्र घोळदार झब्बा, सलवार आणि कमरेला बांधलेलं उपरणं. उपरण्यात खोवलेला पावा. एका हातात टाळ, एका हातात चिपळ्या आणि पहाटेचं वातावरण भारून टाकणार्या किनर्या आवाजाला पायात बांधलेल्या चाळांची साथ. पाहताक्षणी लहान-थोरांना भुरळ घालण्याची किमया त्याच्या - या वासुदेवाच्या - पेहरावात असते. टाळ वाजवित, गात-नाचत येणार्या या वासुदेवाची वर्णनं महानुभव पंथाच्या साहित्यातही सापडतात. यावरून लोकजागृतीचा हा आदर्श वारसा सुमारे नऊशे ते हजार वर्षांपूर्वीचा तरी नक्की असावा असे अभ्यासक सांगतात. कृष्णभक्ती हा वासुदेवाचा वसा आहे. हे त्याच्या पेहरावावरून सहज लक्षात येतं. डोक्यावरच्या मुकुटातली मोरपिसं आणि त्याचा पावा त्याच्या भक्तीचा केंद्रबिंदू दाखवितात. तर त्याच्या गीतातील गोविंद गोपालाचा उल्लेखही तेच दर्शवितो. वासुदेव बनून गावोगावी फिरण्याबरोबरच काही वासुदेव शेतीही करतात. त्यांची वेगळ्या जातीत गणना होऊ लागली असली, तरी ते जातीने प्रामुख्याने मराठा या श्रेणीत मोडतात असे अभ्यासकांनी नमूद केले आहे. मौखिक परंपरेनं चालत आलेली गाणी, अभंग, ओव्या, गवळणी आपल्या विशिष्ट लकबीत, तालबद्धरीत्या सादर करून लोकांच्या मनावर सकारात्मक संस्कार करण्याचा पहिला मान वासुदेवाचा. सकाळी पहिल्यांदा आपण जे गीत ऐकतो, ते दिवसभर आपल्या मनाभोवती रेंगाळत राहते. गावोगावी फिरणार्या वासुदेवाला याचं भान आहे. म्हणूनच तो दिवसाच्या आरंभालाच शुद्धाचरणाचा, नि:स्वार्थ दानाचा आणि हरिभजनाचा उपदेश करतो. समाजमनाची मशागत करताना जसा तो कमी पडत नाही, तसा तो स्वत:साठी दान मागतानाही कमीपणा वाटून घेत नाही. देणार्यालाही तो कधी भिक्षेकरी वाटत नाही.
‘बळीच्या वंशी जन्म घेतला, काळीचा धंदा सोडू नको.
ऐक पराण्या, तुला सांगतो, हरि भजल्याविण राहू नको.’
असा हिताचा उपदेश करतानाच,
‘तुम्ही आया बायांनो द्या वासुदेवणीला चोळी
अहो, लहान मुलीच्या द्या अंगीची काचोळी.’
अशी स्वत:च्या संसाराला हातभार लावणारी मागणी मागतो.
समाजाची आध्यात्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक गरज भागविणारी ही समृद्ध परंपरा महाराष्ट्राच्या समाजजीवनातून कधीही वजा होऊ नये अशीच आहे. शहरीकरणाच्या, आधुनिकतेच्या विळख्यात गुरफटत चाललेला महाराष्ट्र अशा संस्कारक्षम परंपरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन गढूळ होऊ देणार नाही अशी अपेक्षा. त्याच्या कर्तृत्वाचं मोल म्हणून त्याच्या झोळीत मूठ-पसा टाकला की, तो ‘दान पावलं, दान पावलं’ म्हणत आपल्या ओंजळीत पुण्याइचं दान टाकील आणि प्रबोधनाचा हा मंजूळ पावा महाराष्ट्राच्या संस्कारक्षम मनाला अखंड जागविताना सांगत राहील...
बळीच्या वंशी जन्म घेतला, काळीचा धंदा सोडू नको,
ऐक पराण्या, तुला सांगतो, हरि भजल्याविण राहू नको, दिली देवानं धनसंपदा, गर्व मनामधि धरु नको, चरत गायत्री शेती आली, तिच्या मुखावर मारु नको, झाली म्हातारी गाय बापा, कसाबाला तू विकू नको, मूल घातला साळमंदी, लाड त्याचा तू करू नको, वडील बंधू बापापरमानं, मर्जी मोडून बोलू नको, पित्याच्या वंशी जन्म घेतला, त्याच्या सेवेला चुकू नको, आईच्या पोटी जन्म घेतला, वाईट वंगाळ बोलू नको, दोघा भावांचा तंटा लागला, सरकारामधि जाऊ नको,
२. बहुरूपी
भर दुपारी उन्हातान्हात राबण्यापेक्षा थोडा विसावा घ्यावा म्हणून कुणी सोप्यात, ओसरीवर कलंडलेला असतो, तर घरातलं महिला मंडळ धान्य निवडण्यात किंवा इतर कामात मग्न असतं. ग्रामीण भागात दिसणारं हे नेहमीचं चित्र. पण वर्षातल्या एखाद्या दिवशी दुपारच्या या मंदावलेल्या वेळेची तारांबळा उडून जाते. ध्यानी मनी नसताना कानावर खणखणीत आवाज पडतो.
‘पाटील...कुठायत पाटील, असली करणी करून वर उन्हातान्हाचे सावलीत झोपता. ’पहिल्यांदा बाया-बापड्या गोंधळून जातात, पोरं घाबरून जातात. पण आवाज देणार्याचा अवतार बघून त्यांच्या लक्षात येतं की हा तर बहुरूपी आहे. अंगात पोलिसाचा वेश, पण खिशाला लाल, काळा, हिरवा, निळा, खटक्याचा, मोडलेला असे दहा -बारा पेन अडकवलेले. डोक्यावर एक काच नसलेला काळ्या फ्रेमचा चष्मा. पायात फाटलेले बूट, बंदात अडकविलेली, कधीही न वाजणारी शिट्टी आणि काखेला जुनाट विटकी डायरी. अशा वेशातला बहुरूपी पोलीस वर्षातून एकदातरी गावात येतोच येतो. आला की ज्याच्या घरासमोर असेल, त्या घरच्या पुरुषावर वारंट बजावतो. त्याच्या बायकोला खरं गुपित सांगतो. ‘'वहिनी, तुम्ही काळजी करू नका पाटलानी पुण्याच्या शिटीत दुसरी बायको केली असली, तरी पोलीस खातं तिला टिकू देणार नाही. हा डिप्युटी चिप होमगार्ड आता पाटलांना घेऊन जाणार आणि तिसर्या लग्नाची शिक्षा देणार आहे. तुम्ही काळजीच करू नका.’' खळखळून हसणार्या बाया-बापड्या क्षणभर कामाच्या रामरगाड्यातून बाहेर येतात. त्यांच्या या मोकळेपणानं हसण्याचं श्रेय घेतानाच हा बहुरूपी आपली खाकी पिशवी पुढं करतो. मग कुणी धान्य, कुणी वस्तू , तर कुणी पैसे देतात आणि पुढच्या दारावर नव सोंग घेऊन, नव्या उत्साहात तो निघून जातो. महाराष्ट्राच्या ग्रामीणजीवनाची रचना ही एखाद्या गजबजलेल्या संपन्न कुटुंबासारखी आहे. एकमेकाला हातभार लावत सगळे सुखानं नांदत आहेत. शेतकर्याचा जीनक्रम बलुतेदारांवर, तर बलुतेदारांचा शेतकर्यांवर अवलंबून आहे. कष्ट, नैसर्गिक आपत्ती, मागासलेपणा, शिक्षणाचा अभाव, रोगराई अशा अनेक समस्यांनी भरडून निघणारा समाज बहुतेक वेळा वैतागलेला आणि चिंतेत राहणारा. पण यावरही ग्रामीणजीवनाला मनोरंजनाचा तोडगा मिळाला आहे. तो लोकरंजन करणार्या अस्वलवाला, नंदीबैलवाला, बहुरूपी अशा पात्रांच्या रूपानं. ग्रामीणजीवनाच्या पार्श्र्वभूमीवरती अशा कलाकारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बहुरूपी ग्रामजीवनात येणार्या सर्व कलाकारांमध्ये अधिक प्रभावी वाटतो. अर्थात त्याचा वारसाही तेवढाच समृद्ध आहे. श्रीपती भट यांच्या ‘ज्योतिषरत्नमाला’ या आद्यग्रंथात त्याचा ‘बोहपी’ या नावाने उल्लेख आलेला आहे. समर्थ रामदास, संत एकनाथ आदींनी आपल्या काव्यरचनेत त्याची दखल घेतली आहे. समर्थ रामदासांनी तर देवालाच त्याची उपमा दिली आहे. अनेक अभ्यासकांनी आणि संतानी बहुरूपीचा उल्लेख वेगवेगळ्या नावाने झाल्याचे नमूद केले आहे. त्यात बोहपी, भोरपी, रामचंद, बहुरूपी अशा नावांचा समावेश होतो. पश्र्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागात त्याला भैरुपी असेही संबोधले जाते. समाजातल्या विविध घटकांचं सूक्ष्म निरीक्षण आणि जन्मत:च मिळालेली अभिनयाची देणगी हे बहुरूप्यांचं वैशिष्ट्य. लोक कसे वागतात, पुढार्यांच्या लकबी, त्यांची खोटी आश्वासनं, त्रास देणारा नवरा अशा अनेक गोष्टींवर तो अचूकपणे बोट ठेवतो. एका दारी पुढारी होऊन रांगड्या भाषेत आश्वासन देणारा बहुरूपी पुढच्या दारी लगेच शहरी शुद्ध भटजी होऊन भविष्य कथन करू लागतो. आवाजातील चढ-उतार, त्या त्या रूपाशी तंतोतंत जुळणारा अभिनय पाहिला की स्टेजवरचे एकपात्री कलाकारही फिके वाटू लागतात. त्याला अभिनयासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. ‘मागच्या वर्षी तुमच्या घरातून अर्धलीनं नेलेली चारी ढेकणं ताप येऊन देवाघरी गेली’, अशी दु:खद बातमी देऊन पुढच्या दारी लगेच तो तराळी होऊन येतो, आणि ‘चला ताई चला, तुम्ही लग्नाला चला...चिखलाची कढी, दगडाची वडी, मस्करीचं लोणचं, गाढवाची भजी...’ अशी लगबग करू लागतो. समाजाचं खरं रूप सर्वांना रुचेल अशा पद्धतीनं मांडणारा, विशेषत: ग‘ामीण महिलावर्गाला काही क्षणांची का असेना खळखळणारी उसंत देणारा हा जातिवंत विनोदवीर आपण जपायला हवा, नाहीतर त्याच्या काखेला असणार्या विटक्या डायरीत तो आपलं नाव लिहून घेईल आणि ते चित्रपगुप्ताला सांगण्याची धमकी आपल्याला देईल.
३. गोंधळ
महाराष्ट्रातील बहुतांश समाजांचा कुळधर्म-कुळाचार असणारी एक प्रबोधक, मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे गोंधळ. लग्न, मुंज किंवा इतर शुभकार्यावेळी घरी 'गोंधळ' घातला की आयुष्याचा गोंधळ होत नाही अशी धारणा आहे.
श्री रेणुका मातेचा किंवा श्री तुळजाभवानीचा आशीर्वाद लाभावा यासाठी भाविक-भक्त आपल्या पारंपरिक घराण्यातील गोंधळ्याला बोलावून देवीचा यथासांग गोंधळ घालतात. महाराष्ट्रात ज्या लोककलांना लोकजीवनाचा अविभाज्य घटक बनता आलं, त्यापैकी ही एक महत्त्वाची कला होय. गोंधळाची उत्पत्ती ही परशुरामांनी केलेल्या मातृवंदनातून झाली असे सांगितले जाते. त्याबद्दल अशी कथा आहे की, परशुरामांनी बेटासूर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शिर कापले. त्याच्याच शरीरातील शिरा (नसा) कापून, शिराच्या (कवटीच्या) ब्रह्म रंध्रात ओवून त्या वाद्याचा ‘तिंतृण तिंतृण’ असा आवाज करीत तो माता रेणुकेजवळ आला व तिला वंदन केले. या वंदनातूनच गोंधळाचा उगम झाला असे अभ्यासक लिहितात. तर गोंधळी लोक जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांपासून आपली उत्पत्ती झाली आणि माहूर हे आपले मूळ स्थान आहे असे मानतात. काही संशोधकांनी गोंधळ ही कला भूतमाता व तिच्या भक्तांशी संबंधित असल्याचंही साधार स्पष्ट केलं आहे. गोंधळाची प्राचीनता मांडताना संशोधकांनी- श्री. तुळजाभवानीची प्राचीनता ही इ. स. १००० पूर्वी जाते व रेणुका माता त्याहून प्राचीन आहेत, आणि गोंधळाची प्राचीनता रेणुका मातांच्या प्राचीनतेशी निगडीत आहे असे नमूद केले आहे. तर समर्थ रामदासांनी रचलेल्या, गोंधळात गायल्या जाणार्या आरतीत ‘कवडी' एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा वो’ या ओळीतील कवडी या चलनाचा संदर्भ येतो. ‘कवडी' हे चलन पाचव्या शतकाच्या दरम्यान कर्नाटकात प्रचलित होते. त्या वेळचे कर्नाटकातील कदंब राजघराणे हे श्री तुळजाभवानीला आपली कुलदेवी मानत होते व उत्सव, गोंधळात सहभागी होत होते. यावरून गोंधळ प्रथा तेव्हापासून प्रचलित असावी असाही संदर्भ दिला जातो. शतकानुशतके भक्तिभावाने घातल्या जाणार्या या गोंधळाचे स्वरूप बदलत्या काळासोबत सकारात्मक व नकारात्मकदृष्ट्याही बदलत आले आहे. भाविकाच्या घरी गोंधळ घालण्यासाठी येणार्या गोंधळ्यांच्या पिढ्या काळासोबत ज्ञानात वाढ व सादरीकरणात बदल करत राहिल्याने काही दशकांपूर्वीचा गोंधळ वेगळा होता असे वाटून जाते.
गोंधळाची रचना :
सभोवताली रांगोळी काढून मध्यभागी एक पाट ठेवला जातो. पाटावर कोरे वस्त्र अंथरले जाते. त्यावर तांदळाचा चौक करून त्यावर मध्यभागी कलश ठेवला जातो. विड्याची पाने, सुपारी, हळकुंड, खारीक इत्यादी पूजासाहित्य पाटावर मांडतात. पाटाच्या चारही कोपर्यांलगत झापाच्या आकारात कडब्याची ताटे किंवा उसाच्या कांडया बांधल्या जातात. त्या ताटांना कडकण्यांची माळ अडकवली जाते आणि दिवट्या पेटवून गोंधळाला सुरुवात केली जाते. (महाराष्टा्तील प्रत्येक भागात, किंबहुना प्रत्येक कुटुंबात (कुळात) याबाबतचा पद्धती, रचना, साहित्य यांमध्ये फरक आढळतो.)
गण : गोंधळाची सुरुवात गणाने होते. कोणत्याही शुभकार्याप्रमाणे गोंधळातल्या गणातही गणेशाला नमन केले जाते. अनेक पारंपरिक गणांसोबत संत तुकोबांनी लिहिलेला पुढील गण बहुतांश वेळा गायला जातो.
गणराया लौकर यावे, भेट सकळाला द्यावे।।धृ।।
आले गणपती नाचत, पायी घागर्या वाजत।।१।। अंगी शेंदुराची उटी, केशर कस्तुरी लल्लाटी।।२।। सोंड फिरवीतो गोमटी, नामलगावचा गणपती।।३।। तुका म्हणे शोधुनी पाहे, विठ्ठल-गणपती दुजा नाही।।४।।
आवातणं : गण झाल्यानंतर तेहतीस कोटी देवांना गोंधळासाठी आवातणं (म्हणजे आमंत्रण) दिलं जातं. पारंपरिक आवातण्यांमध्ये पृथ्वी, आकाश, पाताळ येथील सर्व देवतांना गोंधळाच्या ठिकाणी येऊन भाविकांना आशीर्वाद देण्याची विनंती केली जाते.
‘‘आई अंबाबाईच्या नावानं... उदो उदो मायेचा निजरूप आईचा गोंधुळ मांडला उदे उदे ग अंबाबाई गोंधळा ये मोरेश्र्वर गणा... गोंधळा ये सातारची मंगळाई ... गोंधळा ये’’
असे सर्व देवतांना आमंत्रण दिले जाते व शेवटी,‘ राहिले साहिले गोंधळा यावे’ म्हणून हा आवातण्याचा कार्यक‘म आटोपता घेतला जातो. या आवातण्यानंतर देवीला वंदन केले जाते, तिची स्तुती केली जाते व त्यानंतर सुरू होतो कथांचा वर्षाव. प्रबोधन करणार्या कथा, देवीच्या माहात्म्याच्या कथा, मध्ये मध्ये उत्स्फूर्त काव्य. त्याला वैशिष्ट्यपूर्ण चालीत बसवून संबळ, तुणतुणं आणि झांजेच्या तालावर सादर करणं. अशा कथा-काव्य-संगीताच्या गोंधळाने ऐकणारा दंग होऊन जातो.
गार डोंगराची हवा अन्
बाईला सोसना गारवा।। कुंकु, नारळ घेऊनी हाती या अंबाबाईला विनवू किती...
अशी गोंधळगीते समाजात लोकप्रिय झाली आहेत. तर अलीकडे मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार काही नवीन विनोदी गीतांचा भरणाही गोंधळात होऊ लागला आहे.
काय करू मी आता बाई, माझ्या नशिबाला
मला मिळाला नवरा मेला, नुसता म्हसोबा किंवा वाट लावलीया माझ्या संसाराची, वढ माहेराची हीला वढ माहेराची अशा गीतांनी हास्यक‘ोळ उडवला जातो.
सासू कशी असावी, सूनेनं कसं असावं, सासर्याला मान द्यावा, संसारासाठी तन-मन-धन अर्पावं अशी शिकवण देणार्या गीतांच्या व कथांच्या माध्यमातून गोंधळी दैनंदिन जीवनाचा, समाजाचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न करतात. शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत सर्वांना समान मानून प्रत्येक घरात जाऊन प्रबोधनाचं, लोकशिक्षणाचं कार्य करणारे गोंधळी बहुश्रुततेतून, पारंपरिक ज्ञानातून आणि समाजाच सूक्ष्म निरीक्षण करून स्वत:ला ज्ञानदानासाठी पात्र बनवितात.इतर कोणत्याही माध्यमाचा विचार करता ग्रामीण किंवा शहरी भागातही गोंधळ हे माध्यम व्यापक व प्रभावी वाटते. बहुतांश समाजांमध्ये हा कुळाचार असल्याने त्याची व्यापकता मोठी आहे. मोजक्या लोकांसमोर प्रभावीपणे सादर केला जात असल्याने गोंधळाच्या वाट्याला मोठा प्रेक्षकसमूह क्वचितच येतो. विवाहसंस्था ही समाजजीवनातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. सामाजिक नीती व शांतता या संस्थेवर आधारित आहे. अशा संस्थेला योग्य वळण देण्याचं, अनुभवातून आलेल्या ज्ञानाच्या आधारे भविष्यातल्या संकटांच्या जागा दाखविण्याचं काम करणारी गोंधळ ही परंपरा म्हणूनच गरजेची व महत्त्वाची आहे.
|
No comments:
Post a Comment