आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday 28 November 2012

अनुताई वाघ

                                                                             अनुताई वाघ

कोसबाडच्या टेकडीवरून शिक्षणाचा प्रवाह आदिवासी वाड्या-पाड्यांपर्यंत नेऊन सांस्कृतिक व सामाजिक विकास साधणार्या थोर शिक्षणतज्ज्ञ!
अनुताईंचं अवघं आयुष्य म्हणजे एका तपस्विनीचं आयुष्य आहे. कामावरची आणि जीवनावरची अविचल निष्ठा हे त्याचं वैशिष्ट्य! एखादा आदर्श समाजसेवक कसा असावा याचं अनुताई म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहे.

त्यांच्या गुरू ताराबाई मोडक जुन्या काळातल्या! त्यांच्या हाताखाली अनुताई घडल्या, त्यामुळे त्यांचं वळणही जुनंच. पण ताराबाईंची स्वप्नं प्रत्यक्षात आणताना या शिष्येने आधुनिक विचारांना, संशोधनाला जवळ केलं. आदिवासींमध्ये शिक्षणाची क्रांती करताना, त्यांच्या समस्या जाणून घेताना अनुताई सत्याला सामोर्या गेल्या आणि प्रत्येक समस्येवर पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन स्वत:च्या अनुभवाच्या आधाराने तोडगा काढला. अनुताईंच्या या कार्यामुळे एक आधुनिक शैक्षणिक पद्धत आकाराला यायला मदत झाली. साठ-पासष्ट वर्षांपूर्वी सर्वसंग परित्याग करून एका अपरिचित जगाला आपले मानून, तिथे शिक्षणाचे रोप लावणे ही खरं तर जगावेगळी गोष्ट होती. पण या कर्तृत्वाचा किंवा मर्दुमकीचा लवलेशही त्यांच्यापाशी नव्हता आणि हेच अनुताईंचं मोठेपण आहे.

अनुताईंचा जन्म १९१० सालच्या मार्च महिन्यातला. पाच भावंडांत अनुताई मोठ्या. घरची परिस्थिती बेताचीच! वडिलांनी नोकरीनिमित्त वेगवेगळ्या गावी बस्तान बसवलं, त्यामुळे अनुताईंच्या शिक्षणाची तशी आबाळच झाली. पुढे त्यावेळच्या रूढी-परंपरेनुसार त्यांचा लहान वयातच म्हणजे १३ व्या वर्षीच विवाह झाला. पण लग्न झाल्यानंतर सहा महिन्यातच त्या विधवा झाल्या. त्याच वेळी त्यांच्या हाती पोळपाट लाटणं यायचं! कारण शिक्षण अर्धवट सोडलेलं, पुनर्विवाहाची शक्यता नाही आणि वयही अडनिडं! पण अनुताई याही प्रसंगाला धैर्याने सामोर्या गेल्या. त्यांच्या आईची मैत्रीण दुर्गाबाई नेने त्यांच्यासाठी धावून आली. त्यांच्या बरोबर अनुताई अकोल्याला गेल्या आणि तिथल्या राष्ट्रीय शाळेत दाखल झाल्या. एक वर्ष तिथं राहून त्या इगतपुरीला आल्या. तिथं त्यांनी फायनलची परीक्षा दिली. या परीक्षेत त्या जिल्ह्यात पहिल्या आल्या. पुढे चार वर्ष नाशिकला नोकरी केल्यावर त्या पुण्याला आल्या आणि हुजूरपागेत रुजू झाल्या. त्यांचे वडील एव्हाना थकले होते. त्यामुळे घरची आणि पाठच्या भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. हीदेखील त्यांनी निष्ठेनं पार पाडली. याच काळात म. गांधींनी चलेजाव आंदोलनाचं रणशिंग फुंकलं. अनुताईंचा मूळ पिंड समाजकार्याचा असल्यामुळे या आंदोलनात उडी घ्यायची त्यांना अनिवार इच्छा झाली. पण भावंडांच्या शिक्षणाचा विचार करून त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला. पण त्याच वेळी निश्र्चय केला की ज्या वेळी आपण या जबाबदारीतून मुक्त होऊ, त्या वेळी कुठल्याही सांसारिक पाशात न गुंतता स्वत:ला समाजकार्यात झोकून द्यायचं.

हुजूरपागेत अनुताईंनी तेरा वर्षे नोकरी केली. कोसबाड वगळता त्यांनी इथंच आयुष्यातला सर्वाधिक काळ व्यतीत केला. पण या काळातही त्यांच्या जिवाला स्वस्थता नव्हती. नोकरी करतानाच मॅट्रिक व्हायचं त्यांच्या मनानं घेतलं आणि त्यांनी आपलं नाव नाईट स्कूलमध्ये दाखल केलं. १९३८ मध्ये त्या चांगले गुण मिळवून मॅट्रिक झाल्या. त्यांची शिकण्याची जिद्द प्रौढ वयातही कायम होती. पुढे अनेक वर्षांनी त्यांनी कोसबाडहून पदवीची परीक्षा दिली. पदवी परीक्षेच्या वेळी अनुताईंचं वय एक्कावन्न वर्षांचं होतं आणि त्यांना मोतीबिंदू झाला होता. डोळ्याला नीट दिसत नसतानाही, दुसरा वाचक घेऊन अनुताईंनी अभ्यास केला आणि परीक्षा दिली. ही परीक्षाही त्या चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्या.

भावंडांच्या जबाबदारीतून मुक्त होताच अनुताईंच्या मनात समाजकार्याचे विचार रुंजी घालू लागले. १९४५ मध्ये तशी संधी आयतीच त्यांच्याकडे चालून आली. यावर्षी बोरीवलीत भरलेल्या स्त्रियांच्या बालशिक्षणविषयक शिबिरात अनुताई सामील झाल्या आणि तिथं एकाच वेळी त्या बालशिक्षण आणि ताराबाई मोडक यांच्या संपर्कात आल्या. या शिबिरात ताराबाईंनी आदिवासींच्या शिक्षणासाठी बोर्डीला येण्याचं आवाहन समस्त स्त्रीवर्गाला केलं आणि अनुताईंनी त्याला लागलीच प्रतिसाद दिला. अनुताईंच्या घरच्या मंडळींना हा निर्णय आत्मघातकीपणाचा वाटला. कारण पुण्यात आता अनुताईंचे बस्तान व्यवस्थित बसले होते. आयुष्याची घडी पुन्हा एकदा विस्कटून नव्याने खडतर आयुष्याची सुरुवात करणे हा लौकिकार्थाने वेडेपणाच होता. पण असा वेडेपणा अनुताईंच्या रक्तातच होता. १९४५ साली अनुताई ताराबाईंसमवेत बोर्डीला आल्या आणि त्यांच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय सुरू झाला.

बोर्डीला आल्यावर अनुताईंनी ताराबाईंसमवेत बालवाडी सुरू केली. खरं तर त्या वेळी शहरातही पूर्व प्राथमिक शिक्षणाची संकल्पना इतकी नवीन होती की, ती खेड्यात पटवून देणं हे प्रयासाचं काम होतं. यात या गुरु-शिष्य द्वयीला (ताराबाई-अनुताई) अनेक अडचणी आल्या. त्यांच्या बालवाडीला लागूनच हरिजनांची वस्ती होती. त्यांची मुले या शाळेत येत त्यामुळे सवर्णांच्या मुलांनी शाळेवर बहिष्कार घातला. या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना समजावून सांगणे हे अवघड काम होते. वेगवेगळ्या वस्तीतली मुलं त्यांच्या शाळेत यावीत म्हणून कधी झांजा वाजवून मुलं गोळा केली तर कधी गल्लीतल्या प्रशस्त ओट्यांवर त्या-त्या विभागातली मुलं गोळा केली, त्यांच्याशी गप्पा-गोष्टी केल्या. याच त्यांच्या प्रचारवाड्या होत्या. त्यामुळे गावकर्यांना बालवाडीचं महत्त्व पटलं. हळूहळू पांढरपेशांची, शेतकर्यांची, मच्छिमारांची आणि हरिजनांची-अशी सर्व प्रकारची मुलं त्यांच्या शाळेत यायला सुरुवात झाली. त्यातूनच ताराबाई आणि अनुताईंची विकासवाडी आकाराला आली.

ही विकासवाडी बोर्डीला आकार घेत असतानाच स्थानिक आदिवासींचा बहिष्कार मात्र दोघींना खटकत होता. हा समाज डोंगरदर्यात राहाणारा, शहरीच काय पण ग्रामीण लोकजीवनापासूनही कोसो दूर असलेला. या आदिवासींची मुलं आपणहून शाळेत येतील किंवा अगदी त्यांच्या घरी जाऊन चार गोष्टी उपदेशाच्या सांगितल्या, तरी येतील अशी कुठलीच सुतराम शक्यता नव्हती. कारण त्यांच्या आयुष्याचे अगक्रमच वेगळे होते. या परिस्थितीत आपणच त्यांच्यात जाऊन राहिलो, तर काही फरक पडेल असा विचार या दोघींनी केला आणि आपला मुक्काम बोर्डीहून ४-५ मैलांवरच्या कोसबाडला हालवला. एका खोपटेवजा घरात त्यांनी आपला संसार थाटला आणि त्या घराच्या अंगणातच शाळा सुरू केली. त्यालाच पुढे अंगणवाडी असे नामाभिधान मिळाले. मुलं शाळेत येत नाहीत म्हणून शाळाच मुलांच्या मागे नेणार्या ताराबाई आणि अनुताई केवळ असामान्य होत्या.

अनुताई बोर्डीला येण्यापूर्वीच एक नावाजलेल्या शिक्षिका होत्या. पण आदिवासी भागात आल्यावर त्यांना स्वत:ला वेगळ्या प्रकारचा शिक्षक म्हणून घडवावे लागले. त्यांना प्राथमिक शिक्षणाकडून पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे वळावे लागले. शहरातील शिक्षणाकडून खेड्यातील शिक्षणाकडे वळावे लागले. एवढेच नाही तर केवळ शिकवणार्या शिक्षकाऐवजी मुलांना आपणहून शिकण्यास प्रवृत्त करणार्या संशोधक-शिक्षकात स्वत:ला बदलावे लागले.

अंगणवाडीतल्या या मुलांच्या शिक्षणाची सुरुवात अर्थातच स्वच्छतेपासून झाली. मुलांना आंघोळ घालणे, त्यांचे केस धुणे, नखे कापणे, त्यांच्या खरुजेवर कडुनिंबाचा पाला लावणे या सर्व गोष्टी अनुताई स्वत: करत. मग गाणी, गप्पा आणि खेळातून अभ्यास सुरू होई.

या शाळेच्या माध्यमातूनच अनुताईंना आदिवासींच्या समस्या समजायला मदत झाली. त्यांची मुले शाळेत का येऊ शकत नाहीत हे लक्षात आले. मग ताराबाई आणि अनुताई यांनी या मुलांसाठी वेगळ्या शाळा सुरू केल्या. या शाळेतच त्यांनी तान्ह्या मुलांसाठी पाळणाघर, मधल्या मुलांसाठी बालवाडी आणि मोठ्या मुलांसाठी प्राथमिक शाळा सुरू केली.

अनुताई जाणून होत्या की, आदिवासींमध्ये अनेक सुप्त गुण आहेत. ही मुले चपळ आहेत, बुद्धिमान आहेत, काटक आहेत. त्यांची दृष्टी तीक्ष्ण आहे, नेम अचूक आहे. जोडीला त्यांच्याकडे नृत्यकला आणि अभिनयकला आहे. विशेष म्हणजे आदिवासींमध्ये समस्याग्रास्त मूल जवळ-जवळ नाहीच. तेव्हा या हिर्यांना पैलू पाडायला हवेत. त्यासाठी ही मुले शाळेत टिकती व्हायला हवीत आणि हे साध्य करायचे असेल, तर त्यांना त्यांच्या जीवनाला उपयोगी पडेल असे शिक्षण द्यायला हवे. वारली कुटुंबातल्या मुलींमध्ये शिक्षण रुजवायचे प्रथम प्रयत्न अनुताईंनी केले. त्यामुळेच आज या समाजातल्या बायका-मुली साक्षर होऊ शकल्या. या मुलींना दिवसभर काम असे. बहुतेक जणी धाकट्या भावंडांना सांभाळत. काहींना घरीच राहावे लागे. या मुलींना मग अनुताई दिवेलागणीनंतर बोलवत. त्यांना गाणी, गोष्टी आणि लिहायला, वाचायला शिकवत. कधी खूप उशीर झाला, पाऊस असला, तर या मुली अनुताईंकडेच मुक्कामाला असत. त्या त्यांना जेवू घालत, आईची माया देत.

आपल्या एक तपाच्या शैक्षणिक काळात अनुताई शिक्षणशास्त्र कोळून प्यायल्या असल्या, तरी त्यांच्या या सैद्धांतिक ज्ञानाचा आदिवासी भागात अतिशय कमी उपयोग होता. कोसबाडला आल्यावर या आदिवासी मुलांना कसं शिकवावं हे त्यांना अनुभवातून ठरवावं लागलं. त्यांच्या या संशोधन कार्यातच त्यांचे कर्तृत्व सामावले आहे.शिक्षण द्यायचे नसून घ्यायचे असते हे सूत्र मनाशी ठेवून त्या निरनिराळे प्रयोग करत राहिल्या. शिक्षण आदिवासींच्या जीवनाशी कसं बांधता येईल याचा विचार केला. त्यासाठी आदिवासींच्या घरची परिस्थिती, त्यांचे परस्पर संबंध, सामाजिक वृत्ती यांचा अभ्यास केला. म्हणून तर त्यांची शैक्षणिक साधने आजूबाजूच्या परिसरातून विकसित झाली. जात्याच त्यांचा बालशिक्षणाकडे ओढा असल्यामुळे ताराबाईंकडून त्यांनी प्रथम सगळं शिकून घेतलं, त्याचा अभ्यास केला. स्वानुभवातून पडताळून पाह्यलं आणि मगच ते साधनसूत्र इतरांना दाखवलं. त्यांच्या विचाराला अशा प्रकारे अनुभवाची आणि कृतीची जोड होती.

ताराबाईंचा बोर्डीचा प्रयोग त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. एकतर तो त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील अखेरचा प्रयोग होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे बालशिक्षण खेड्यात नेणे हा एक अभिनव प्रयोग होता, जो आजवर कुणीही केलेला नव्हता. त्यावर देशाच्या शिक्षणाची दिशा ठरणार होती. ताराबाईंचं हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी अनुताईंवर येऊन पडली. त्यासाठी त्यांच्यातील शिक्षकाला संशोधक होणे भाग होते आणि ही सर्वांत मोठी परीक्षा होती. घर आणि शाळा या दोन्ही ठिकाणी मुलांचा अभ्यास करून त्यांनी अभिनव शिक्षणपद्धती शोधून काढली. एकीकडे मुलांच्या उद्योगशीलतेला वाव देऊन दुसरीकडे मुलांच्या सर्जनशील भावनांना खतपाणी घालण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी केला. शिक्षकाने विद्यार्थिभिमुख असावे म्हणजे काय ते अनुताईंच्या या प्रयोगांवरून कळते. त्यांनी मुलांना फक्त सुशिक्षितच केले नाही तर सुसंस्कृतही केले. अनुताईंचं कार्य फक्त शिक्षण विषयाशीच निगडीत नव्हतं. मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पाळणाघरं काढली. दारुबंदी, विधवाविवाह अशा अनेक सामाजिक प्रश्र्नांबद्दल जवळच्या पाड्यांवर जाऊन तेथील लोकांचं प्रबोधन केलं. आदिवासी जोडप्यांची सामुदायिक लग्ने लावून दिली. केवळ कोसबाडच्या आदिवासी भागात काम करणं त्यांना मान्य नव्हतं. म्हणून डहाणूला एक मूक-बधीर विद्यालय सुरू केलं. तिथे गरीब मुलांची राहण्याची, जेवणाची सोय केली, स्वावलंबी व्हावे म्हणून उद्योगाचे शिक्षण दिले. कोसबाडला शिक्षक महाविद्यालय, प्राथमिक शाळा, छापखाना, उद्योगवर्ग सुरू करण्यासाठी अनुताईंनी अथक परिश्रम घेतले. शिक्षणपत्रिका व सावित्री ही मासिके, तसेच बालवाडी कशी चालवावी, विकासाच्या मार्गावर, कुरणशाळा, सहज शिक्षण ही पुस्तके - यांच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या शैक्षणिक विचारांचा प्रसार केला. कोसबाडच्या टेकडीवरून हे त्यांचे आत्मवृत्त प्रसिद्ध आहे.

वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्या तरुणाईच्या उमेदीने काम करत होत्या. या वयात त्यांनी दुर्गम आदिवासी भागात काम करण्याची जबाबदारी अंगावर घेतली आणि ग्राममंगल चे रोपटे लावले. दुर्गम भागात शिक्षणाचे आणि सांस्कृतिक विकासाचे काम अंगावर घेतले आणि सहज शिक्षणाचा एक नवाच प्रयोग केला. अनुताई स्वत: प्रसिद्धीपराङमुख असल्या, तरी त्यांच्या कार्याची कीर्ती सर्वदूर गेली. ती सरकार दरबारीही जाऊन पोहोचली आणि अनुताईंना पद्मश्री मिळाली. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र पदवी, सावित्रीबाई फुले पुरस्कार, तसेच आंतरराष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार - असे अनेक सन्मानही त्यांना प्राप्त झाले. या सन्मानावरची त्यांची प्रतिक्रिया अनुताईंचं निस्पृह मन दाखवणारीच होती. त्या म्हणाल्या, मला केवळ एवढ्याचसाठी बरे वाटले की, संस्थेची कामे आता भराभर होतील. बाकी कोणत्याही मानाने हुरळून जायचे माझे वय नाही आणि सेवाव्रती माणसाला कोणत्याही लाभाची व नावाची अपेक्षा नसते.

एक शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ती अशा अनुताईंच्या कार्याचा पसारा एका लेखात मावणारा नाही. तो एका ग्रंथाचा विषय आहे. कोणे एके काळी महात्मा फुलेंनी आणि महर्षी कर्वेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खुली करण्याचे महान कार्य केले होते. आधुनिक काळात असाच पराक्रम ताराबाई आणि अनुताई या दोन स्त्रियांनी केला.

3 comments:

Unknown said...

Jevha ek marathi shikshika ghadate ani ghadavate tevha eka sundar sansruti chi ani sundar deshachi nirmiti hote

Unknown said...

Hi

Unknown said...

Very nice writing and you are a clever blogger.All the best