आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday 30 November 2012

महाराष्ट्र गीते

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला, भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे, सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!

* कवयित्री - शांता शेळके * संगीतकार - आनंदघन
* मूळ गायक -लता, उषा, मीना, हृदयनाथ मंगेशकर, हेमंतकुमार


मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥

* कवी -गोविंदाग्रज * संगीतकार - वसंत देसाई * मूळ गायक - जयवंत कुलकर्णी व समूह



बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

* कवी - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर * संगीतकार - शंकरराव व्यास
* मूळ गायक - ललिता फडके, व्ही. जी. भाटकर





जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंव्ह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दरिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।

* कवी - राजा बढे * संगीतकार - श्रीनिवास खळे
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह
 
 
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान

बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण
तू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान

मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण
मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण

वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान

* कवी - चकोर आजगावकर * संगीतकार - श्रीनिवास खळे
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह
 
शौर्याची तव परंपरा
- द. ना. गव्हाणकर
शौर्याची तव परंपरा! महाराष्ट्रा वळुनि बघ जरा
शिवबाच्या कीर्तीचे झडति चौघडे
गडकिल्ले अजुनीही गाति पवाडे
दरि खोरे वीरकथा सांगे पठारा॥
सिंहगडीं अमरपदीं ताना पहुडला
अन्याया तुडवित संताजि दौडला
आंग्रयांनी जागविले अरबी सागरा ॥
चांदबिबी, लक्ष्मीनें खड्‌ग पेललें
तात्यानें समरावर वार झेलले
उमाजीनें डोंगरांत केला पुकारा ॥
वासुदेव ङ्गडक्यांना ङ्गांस
लोकमान्य टिळकांचे सिंह गर्जले
सत्यास्तव ज्योतिबांनी केले संगरा ॥
परशराम, बाबु गेनू, वीर कोतवाल
छातीवर गोळी झेली हसत बिंदुबाळ
बेचाळीस क्रांतीचा शूर सातारा ॥
लाखोंनी देशास्तव अर्पियले प्राण
गाति कोयना, कृष्णा त्यांचें कीर्तिगान
सह्याद्री अभिमानें ङ्गुलवि पिसारा ॥

 
 
 
संयुक्त महाराष्ट्र येतसे पहा
- द. ना. गव्हाणकर
संयुक्त-महाराष्ट्र येतसे पहा
कोटि कर उंचावुनी उभे रहा ॥
अरबि सिंधुच्या तिरीं
सह्यगिरीच्या शिरीं
मराठीची ही नगरी
गोदा, कृष्णा वहाती सुवर्ण-प्रवाहा॥
समतेचे छत्र शिरीं
सौख्यचा दंड करी
आणायास भूवरी
माझा महाराष्ट्र गर्जा जयघोष हा॥
उठवा गिरीकंदरा
जागवा चरां चरां
कांपवा दिगंतरां
खवळोनी सिंधुपरी रूप घ्या महा॥
मर्‍हाठे सर्व खडे
वाजवीत चौघडे
ध्वज त्यांचा ङ्गडङ्गडे
उंच जावोनी नभास तो भिडे पहा॥

 

No comments: