आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday 28 November 2012

प्राचीन महाराष्ट्र

                             प्राचीन महाराष्ट्र
 
                      महाराष्ट्राचा इतिहास आणि ‘महाराष्ट्र’ नावाचा उल्लेख शोधण्यासाठी आपणास प्राचीन कालखंडात जावे लागते. नर्मदा नदीच्या उत्तरेस उत्तरापथ किंवा आर्यावर्त आणि दक्षिणेस ‘दक्षिणापथ’ असे म्हणत. चंद्रगुप्त मौर्यांच्या कालखंडातील आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य यांनी लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथात अश्मक व अपरान्त या देशांचा उल्लेख आहे. अश्मक म्हणजे अजिंठ्याच्या आसपासचा प्रदेश.

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण गावी एक शिलालेख सापडला आहे. तो चौथ्या शतकातील आहे. या शिलालेखात सेनापती सत्यनाग याने स्वत:ला ‘माहाराष्ट्र’ असे म्हणवून घेतले आहे. पुढच्या कालखंडात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी आपल्या शिष्यांना ‘महाराष्ट्री असावे’ असे सांगतात.

महाराष्ट्र या नावाबरोबरच महाराष्ट्रातील आद्य मानववस्तीचा शोध आपण घेतला, तर आपणास नव्या संशोधनपद्धतीनुसार मिळालेली माहिती आश्र्चर्यकारक असल्याचे दिसते. नासिक, जोर्वे, नेवासे, चांडोली, सोनगाव, इनामगाव, दायमाबाद, नांदूर, मध्यमेश्वर या ठिकाणच्या उत्खननांमधून व अत्याधुनिक अशा ‘कार्बन-१४’ पद्धतीनुसार पुरातत्त्ववेत्यांनी महाराष्ट्रातील आद्य-मानवाचा कालखंड इ.स. पूर्वी सुमारे ५ लक्ष ते ३० लक्ष वर्षे मानला आहे. उपरोक्त व नद्यांच्या काठी झालेल्या उत्खननांतून असा निष्कर्ष इतिहासतज्ज्ञांनी काढला आहे की, आदि-अश्मयुगीन मानव महाराष्ट्रात एक ते दीड लाख वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या परिसरात वावरत असावा. पुढे वसाहती वाढत गेल्या. महाराष्ट्रात बाहेरुन-विशेषत: उत्तरेतून राजांचे प्रतिनिधी म्हणून लष्करी वेशाचे लोक येऊ लागले. मूळचे नागरिक आणि बाहेरुन आलेले यांच्यात सुरुवातीला संघर्ष व नंतर समन्वय झाला.
वरील कालखंडानंतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे आपण वळलो, तर आपणास महाराष्ट्रातील ठळक जाणवणार्‍या सत्ता पुढीलप्रमाणे दिसतात. सातवाहन घराण्यातील श्री सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, वाकटकांचा विंध्यशक्ती, द्वितीय प्रवरसेन, चालुक्यांच्या घराण्यातील श्रेष्ठ असा सत्याश्री पुलकेशी, विक्रमादित्य, राष्ट्रकुटांपैकी मानांक, दंतिदुर्ग, प्रथम कृष्ण, ध्रुवराज, गोमंतकातील कदंब घराण्यातील अनंतदेव, अपरादित्य, मध्ययुगीन अशा यादव घराण्यातील द्रुढव्रत, भिल्लम, रामदेवराय या राजांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचे योगदान दिले. या राजांच्या ऐतिहासिक योगदानाला तोड नाही. येथपर्यंत आपण प्राचीन महाराष्ट्राचा अगदी धावता आढावा घेतला आहे.

No comments: