आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday 24 December 2012

नाताळ

                                     नाताळ

 
नाताळासाठी सजवलेला ख्रिस्तजन्माचा देखावा व ख्रिसमस वृक्ष
           नाताळ हा मुख्यत्व्ये २५ डिसेंबरला ख्रिश्चन देवता येशू ख्रिस्त  याच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जाणारा ख्रिश्चन सण आहे. काही ठिकाणी नाताळ २५ डिसेंबरऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.
या सणात एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्र्परांचे अभिनंदन करण्यात येते. या काळात आपापल्या घरांना रोषणाई करून सजवले जाते. ख्रिसमस वृक्ष सजावट (नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.

धार्मिक महत्त्व

नाताळ सण म्हणजे २५ डिसेंबर. आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात तसा प्रकार इसवीसनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही. तिथे सूर्य भ्रमणालाच अधिक महत्त्व आहे आणि २५ डिसेंबरला आपले सूर्यमहाराज नेहमीपेक्षा थोडे कमीच वेळ दर्शन देत असतात.
२१ डिसेंबरचा दिवस हा वर्षातील सर्वांत छोटा दिवस. दिवस छोटा याचा अर्थ रात्र मोठी. त्यामुळे २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असणार. या मोठ्या रात्रीत मेणबत्त्या पेटवाव्यात, आनंदोत्सव साजरा करावा, असे कोणाला वाटले तर ते योग्यच ठरेल. शिवाय हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. आता येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा दिवस मानला जात असला तरी पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारी मानला जात असे.
जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्या वेळच्या पोप महाशयांनी हा दिवस २५ डिसेंबर हा मानावा असा निर्णय दिला. त्यांनी येशूख्रिस्ताचा जन्मदिन २५ डिसेंबर रोजी साजरा करावा, असे फर्मान काढले आणि त्या वेळेपासून हा दिवस २५ डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगभरचे ख्रिस्तानुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. साधू, संत, महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते.
जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी हा दिवस साजरा करतात. भारतीय धर्म-संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विशेष या २५ डिसेंबरशी निगडित आहे. प्राचीन काळात रोम राज्यात २५ डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणून मानला जात होता.
काळोख म्हणजे अंधार हा माणसाला भयप्रद वाटतो. तो जणू आपला शत्रू आहे, अशी भावना माणसाच्या मनात पूर्वापार रुजलेली आहे. अंधार दूर करून सगळीकडे प्रकाशाची उधळण करीत वावरणारा सूर्य म्हणजे आपला मित्र वाटतो. सूर्याचे एक नावच मुळी ' मित्र ' असे आहे.
आपली धर्मसंस्कृती सूर्यपूजक आहे. २५ डिसेंबर या दिवशी प्राचीन रोम संस्कृतीने सूर्याशी जसे नाते जोडून ठेवले त्याचप्रमाणे मोठ्यात मोठ्या दिवसाशी आपल्या मोठ्यात मोठ्या सणाचे नाते जोडून ख्रिस्तानुयायांनी एक सांधा जोडून घेतला किंवा जाणता-अजाणता त्यांच्याकडून जोडला गेला, असे म्हटले पाहिजे.
वर्षातील सर्वांत तेजस्वी अशा पौर्णिमेनंतर येणाऱ्या अमावास्येला दीपोत्सव साजरा करून आपणही जणू अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची तळमळच व्यक्त केली आहे. आश्विन कृष्ण अमावास्येला दुसऱ्या दिवशी उगवणाऱ्या सूर्याला, नव्या विक्रम संवताच्या नवीन सूर्याला आपण सर्वजण पिढ्यान्पिढ्या वंदन करीत आलो आहोत.
धर्म आणि धर्मदैवते वेगळी असली तरी सर्व जगावर सोनेरी किरणांची खैरात करणारा आणि अखिल विश्वाचा जणू आत्माच असलेला सूर्य मात्र उभ्याआडव्या अनंत आभाळात एकच.