भीमवंदना- सुरेश भट
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना!
दुमदुमे 'जयभीम' ची
गर्जना चोहीकडे
सारखा जावे तिथे
हा तुझा डंका झडे
घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना!
कोणते आकाश हे?
तू अम्हा नेले कुठे?
तू दिलेले पंख हे...
पिंजरे गेले कुठे?
या भरा-या आमुच्या...हि पाखरांची वंदना!
कालचे सारे मुके
आज बोलू लागले
अन तुझ्या सत्यासवे
शब्द तोलू लागले
घे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना!
एक आम्ही जाणतो
आमची तू माउली
एवढे आहे खरे
आमुची तू सावली
घे अम्ही त्यांना दिलेल्या उत्तरांची वंदना!
जाळले गेलो तरी
सोडले नाही तुला
कापले गेलो तरी
तोडले नाही तुला
हि तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना!
तू उभा सूर्यापरी
राहिली कोठे निशा?
एवढे अम्हा काळे
ही तुझी आहे दिशा!
मायबापा, घे उद्याच्या अंकुराची वंदना!
धम्मचक्राची तुझ्या
वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा आम्ही
घेतलेला सोबती
ऐक येणा-या युगांच्या आदराची वंदना!
संकलन - विवेक शेळके
No comments:
Post a Comment