आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday 30 April 2014

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० ला करण्यात आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्‍तर महाराष्ट्र, विदर्भ हे महाराष्ट्राचे प्रमुख विभाग. स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ब्रिटीशांनी भारतावर राज्य करण्यासाठी भारताचे विविध भाग पाडले होते. ही विभागणी त्यांनी भाषेप्रमाणे केलेली नव्हती, पण मा. गांधी, लो. टिळक हे भाषावार प्रांत रचनेचे पुरस्कर्ते होते. पण स्वातंत्र्या नंतर पंडित नेहरुंना मुंबई महाराष्ट्राला दयायला विरोध होता व त्यांना मुंबईतील अमराठी भांडवलदारांचा पाठिंबा होता. स्वातंत्र महाराष्ट्र निर्मिती साठी कॉंग्रेसचे पुढारी काहीही पाऊले उचलत नसल्यामुळे स्वतंत्र महाराष्ट्राच्या एकिकरणाचा विषय १९३८ साली पटवर्धन व १९४० मध्ये ग. त्र्यं. माडखोलकर यांनी उपस्थित केला. पुढे १९४६ च्या साहित्य संमेलनात माडखोलकरांच्या अध्यक्षते खाली 'संयुक्‍त महाराष्ट्र समिती' स्थापन झाली.
दार कमिशनने भाषावार प्रांत रचनेस विरोध दर्शविला व महाराष्ट्रीयांवर अपमानास्पद टिका केली. त्यांनी मुंबई हे मिश्र वर्णाच्या लोकांचे ठिकाण आहे, असे म्हटले होते. विदर्भासह महाराष्ट्र, सौराष्ट्रासह गुजरात व स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना पं. नेहरुंनी जाहीर केली तेव्हा महाराष्ट्रापासुन मुंबई तोडण्याची भावना मराठीजनांत पसरली. याच कारणास्तव संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला व 'मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्र झालाच पाहीजे' हे ह्या चळवळीचे घोषवाक्य बनले.
आचार्य अत्रे, सेनापती बापट, शाहिर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, एस. एम. जोशी या व्यक्‍तिंनी संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्‍व केले. मोरारजी देसाई व स. का. पाटील या नेत्यांनी या चळवळीला दडपण्याचा प्रयत्‍न केला. त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले व २१ नोव्हेंबर १९५५ रोजी पोलिसांच्या गोळीबारात १५ जणांना प्राण गमवावे लागले. जनतेच्या असंतोषाला न जुमानता सरकारने मुंबई केंद्रशासित केल्याची घोषणा केली. या निर्णयाने चळवळीला आणखीनच बळ मिळाले. मोर्चे, सत्याग्रह सुरु झाले. या चळवळीच्या काळात भारताचे त्यावेळचे अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी महाराष्ट्रावर होणा-या अन्यायाच्या निषेधार्थ राजीनामा देऊन चळवळ अधिक मजबूत केली. या चळवळीत एकूण १०५ जणांना हौतात्म्य प्राप्‍त झाले. मुंबईच्या फ्लोराफाउंटन भागात त्यांच्या स्मरणार्थ 'हुतात्मा स्मारक’ उभारले गेले. पुढे सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई मिळुन एक द्विभाषिक राज्य स्थापन केले गेले. पण त्याला सर्व जनतेने विरोध केला. अखेर निवडणुकींना सामोरे जायचे असल्याने लोकांचा रोष ऒढवून घेऊन चालणार नाही. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्‍वाने एक पाऊल मागे घेऊन संयुक्‍त महाराष्ट्रासाठी ते राजी झाले. पुढे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुंबई राजधानी व नागपुर ही उपराजधानी म्हणून निश्चित झाली. या स्वातंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. १०५ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज आपण मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणुन पहात आहोत.
असा हा आपला महाराष्ट्र दिन.

No comments: