आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday 17 February 2014

राजा शिवछत्रपती

                                                       ।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।



तीनशे वर्ष महाराष्ट्र इस्लामी राज्यसत्तेच्या ताब्यात खितपत पडला होता,या लोकांनी महाराष्ट्रावर आपली राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक गुलामगिरी लादून रयतेचा प्रचंड छळ चालविला होता.या कालखंडातील दिल्लीचे मोगल राजे,स्वत:ला हिंदूस्थानाचा अधिपति मानत.मोघलांच्या सत्तेला हिंदूस्थानात सर्वप्रथम छत्रपती शिवरायांनी आव्हान दिले आणि आपले स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापिले.हिंदूस्थानातील जे राजे पारतंत्र्यात जगत होते त्यांना छत्रपतींनी स्वतंत्र होण्याचा संदेश दिला.त्यामुळेच छत्रपतीं शिवरायांना युगकर्ते ,शककर्ते असेही म्हटले जाते.



छत्रपती शिवरायांचा जन्म इ.स.१९ फेब्रुवारी १६३०(फाल्गुन वद्य तृतीया,शके १५५१) रोजी पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला(संदर्भ:जेधे शकावली).सन १६३९ ते १६४२ या कालावधीत बालशिवाजी कर्नाटकात असताना शहाजीराजांनी त्यांना राज्यकारभार तसेच युद्धाभ्यासाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती(संदर्भ:परमानंदकृत शिवभारत).त्यामुळे लहानपणीच बालशिवाजी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी यात तरबेज झाले.रामायण, महाभारत या ग्रंथाचे जिजाऊंकडून संस्कार झाल्यामुळे,परकीयांविरूद्ध लढण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले.जन्मानंतर इ.स १६४२ पर्यत त्यांचे वास्तव्य शिवनेरी, सिंदखेडराजा, खेड शिवापूर, पुणे जहागीर तसेच बेंगलोर आदि ठिकाणी होते.
बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत पुण्याजवळचा मुलूख) खोऱ्यात राहणार्‍या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५ साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.


छत्रपती शिवरायांनी सुरवातीच्या कालखंडामध्ये तोरणा,सिंहगड,चाकण आदी किल्ले आदिलशहाकडून जिंकून आपल्या वर्चस्वाखाली आणले.आदिलशहाने शिवाजीराजांना आळा घालण्यासाठी फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवरायांवर हल्ला करण्यास पाठविले शिवाय विश्वासघाताने शहाजीराजांना कैद केले.


पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला.यावेळी आपल्या मुसद्दीने मुघल बादशाह शाहजहान यास दख्खनच्या सुभेदार,शहजादा मुरादबक्ष याच्यामार्फत पत्र पाठवून शहाजीराजां सहित मुघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजांची सुटका झाली याबदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला.


स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.

सईबाईना संभाजीराजे हा पुत्र तर सखूबाई,रानूबाई,अंबिकाबाई या मुली होत्या. सोयराबाईंना राजाराम हा पुत्र तर दीपाबाई ही मुलगी होती.सगुनाबाईना राजकुंवर ही मुलगी होती. तर सकवारबाईना कमलाबाई ही मुलगी होती.
चंद्रराव मोरेचा बंदोबस्त


जावळीचा चंद्रराव मोरे हा आदिलशहाचा चाकर होता,त्याच्या त्रासाने जावळी खोर्‍यातील जनता त्रस्त झाली होती.मोरे याचा पाडाव करून शिवाजी महाराजांनी जावळी काबिज केली,शके १५७७ पौष वद्य चतुर्दशी मंगळवार १५ जाने १६५६ (संदर्भ:जेधे शकावली).यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला.महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.कैदेतील मोरे आदिलशाहीशी गुप्तरुपाने पत्रव्यवहार करताना सापडल्यामुळे महाराजांनी त्याला ठार केले.रायरीवरील विजयाने महाबळेश्वर ते रायगडापर्यंतच्या कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

प्रतापगडची लढाई
आदिलशाहच्या ताब्यातील चाळीस किल्ले इ.स.१६५९ पर्यंत छत्रपतींनी जिंकले होते,या कालावधीत त्यांनी मुघलांशी नरमाईचे धोरण ठेवले.शिवरायांना नेस्तनाबूत करण्यासाठी अफझलखान या सरदारास आदिलशहाने पाठविले. शिवरायांना कैद करून विजापूरात घेऊन येण्याची प्रतिज्ञा करून अफाट सैन्यासह खान स्वराज्यावर चालून आला.स्वराज्यात येताना खान तुळजापूर,पंढरपूर आणि वाटेतील इतर गावातील देवस्थानाची तोडफोड करत, वाईला तळ ठोकून राहिला.


खानाच्या प्रचंड अशा सैन्याशी समोरासमोर लढण्याची ताकद त्यावेळी शिवरायांकडे नव्हती.याच अफझलखानाने शहाजीराजांना कैद करून अपमानास्पदरितीने बेड्या ठोकून विजापुरात नेले होते तर कनकगिरीच्या वेढ्यात शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा खानामुळे मृत्यू झाला होता.
अफझलखानांस घाबरून मसूरचे जगदाळे, उत्रोळीचे खोपडे आदि खानाला मिळाले तर कान्होजी जेधे (संदर्भ:जेधे शकावली)सारखे मावळातील बहूसंख्य इमानी वतनदार महाराजांना सामील झाले.आपल्या जीवाचे बरेवाईट होईल हे जाणून जिजाऊंच्या ताब्यात राज्यकारभार देऊन आपल्या सहकार्‍यांना भावी काळासाठी त्यांनी सूचना दिल्या.


खानाला आपण फार घाबरतो आणि आपल्याकडून खूप अपराध झाल्यामुळे आपण खानास भेटावयास जाण्याऐवजी खानानेच आपल्या भेटीस प्रतापगडाच्या पायथ्याशी यावे, असा आग्रह शिवरायांनी केला.शिवरायांच्या नम्रतेच्या निरोपामुळे व स्वत:च्या सामर्थ्याची घमेंडीमुळे अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी यावयास तयार झाला.

भेटीच्या वेळी दोन्हीकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि यावेळी सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.१० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवराय भेटीसाठी खानाला सामोरे गेले असता धिप्पाड खानाने अलिंगन देण्याचा बहाणा करून शिवरायांचे मस्तक काखेत दाबून दुसर्‍या हाताने कट्यारीचा वार शिवरायांच्या शरीरावर केला.शिवरायांनी अंगरख्याच्या आत घातलेल्या चिलखतावर हा वार बसला.खानाचा दगा लक्षात येताच शिवरायांनी उजव्या हातातील वाघनख्यांनी वार करून खानाचे पोट फाडून आतडी बाहेर काढली.

खान'दगा दगा'असे ओरडत आतडी सावरीत बाहेर आला असता,खानाचा अंगरक्षक सय्यद बंडाने शिवरायांवर केलेला वार शिवरायांचा अंगरक्षक जिवा महालाने वरच्यावर अडवून सय्यद बंडाला ठार केले.पालखीत बसून पळून जाणार्‍या खानाचे मुंडके संभाजी कावजी याने उडविले.महाराज गडावर जाताच तोफेचा आवाज करण्यात आला आणि खानाच्या बेसावध सैन्यावर दाट जंगलात लपून बसलेल्या मावळयांनी तुटून पडून त्यांची दाणादाण उडविली.
अफझलखानाच्या वधानंतर शिवरायांनी खानाच्या शवाचे इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार करुन त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.तर अफझलखानाच्या वधानंतर खानाचा मुलगा व इतर सरदारांना पळून जाण्यास मदत करणार्‍या खंडोजी खोपडेला महाराजांनी डावा पाय आणि उजवा हात तोडण्याची प्रतापगडावर शिक्षा दिली.


पन्हाळगडची लढाई

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते.मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला.शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला.शिवा काशीद चे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्यांस ठार केले,तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.

छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्या- नंतर,सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला.मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले,अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले.घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली,शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू,फ़ुलाजी,संभाजी जाधव,बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.

महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला.इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऎकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला.या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.
मुघलांशी संघर्ष



इ.स.१६६३ साली मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार करण्यासाठी त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या राज्यविस्ताराला वेसण घालण्यासाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले.हजारो सैन्य,प्रचंड मोठा लवाजमा सोबत घेऊन शाहिस्तेखान दख्खनला निघाला.दख्खनला जात असताना मध्ये वाटेत लागणार्‍या प्रत्येक गावा-गावात त्याने दहशत पसरवीत मोठा विध्वंस केला.पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील छत्रपती शिवरायांच्या लाल महालात खानाने तळ ठोकला.

खानाचे सैन्य रोजच आजूबाजूच्या गावा-गावामध्ये जाऊन लुटालूट करत.खानाच्या रूपाने एक मोठे संकट स्वराज्यावर चालून आले होते.खानाला धडा शिकविणे गरजेचे होते.समोरासमोरच्या युध्दात मराठ्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते,अशा वेळी छत्रपतींनी लालमहालावर हल्ला करून खानाला धडा शिकविण्याचे ठरविले.राजांना लाल महाल नवा नव्हता,त्यांचे लहानपण लालमहालातच गेले होते त्यामुळे लालमहालातील कोपरा न कोपरा त्यांना माहीत होता.

लालमहालाभोवती खानाच्या शेकडो सैनिकांचा बंदोबस्त होता.अशावेळी अंधार्‍या रात्री लग्नाच्या वरातीचा आधार घेऊन राजे व काही निवडक मावळे वेशभूषा बदलून महालात घुसले .लालमहालात मराठ्यांनी कत्तल आरंभिली सगळीकडे गोंधळ चालू झाला,छत्रपती खानाच्या शामियानात शिरले .ऱाज्यांना प्रत्यक्ष समोर पाहून खानाची पाचावर धारण बसली,जीव वाचविण्यासाठी खानाने खिडकीतून उडी मारली,छत्रपतींचा चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाची तीन बोटे तुटली गेली.खान बचावला गेला पण शिवरायांची दशहत मनात बसल्यामुळे तो मराठी मुलूख सोडून गेला.या प्रकरणामुळे मुघलांची बेइज्जत झाली तर शिवरायांचे नाव हिंदूस्थानभर झाले.
बसरूरची ऐतिहासिक आरमार स्वारी



इ.स.१६६५ साली छत्रपतींनी बसरूर या कर्नाटकातील बेदनुरच्या नायकाच्या राज्यातील बंदरावर चढाईचा बेत केला.गुप्तहेरांकडून शहराची व सागरी मार्गाची माहिती काढली. सन ८ फेब्रुवारी १६६५ साली मालवणजवळच्या मालंडच्या खाडीतून ८५ लहान तसेच ३ मोठी जहाजे घेऊन त्यांनी जहाजावर पाऊल टाकले.मालवण ते बसरूर अंतर सहा दिवसात कापून मराठे १४ फेब्रुवारीला बसरूरच्या किनार्‍यावर पोहचले.

मराठ्यांनी शहरात घुसून लुट आरंभिली.सुमारे चार हजार मराठे अचानक शहरात घुसल्यामुळे शहरात हाहाकार उडाला,मराठ्यांनी दिवसभर शहराची लुट केली. सभासदाच्या बखरीमध्ये या मोहिमेचे खुप सुंदर असे वर्णन आहे.

'बिदनुरी शिवाप्पा नाईक जंगम होता,त्याचे शहर बसनूर(बसरूर)म्हणून थोर नामांकित होते.दर्या किनारी येथे पालती(टेहळणी)पाठवून वर घाटे जाता मार्ग नाही म्हणून पाणीयातील जहाजे आणून सिध्द करून आपण राजा खासा,जहाजात बसून जाऊन बसनुरास एकाएकी दिवस उगवावयासी गेले.शहरचे लोक बेहुशार होते,एकाएकी जहाजातून उतरले,शहर मारिले,एक दिवस शहर लुटून फन्ना केले.जैसी सुरत मारून मालमत्ता आणिली,त्याप्रमाणे बसनुरची मालमत्ता अगणित माल, जडजवाहीर, कापड, जिन्नस आपले देशास घेऊन आले.मालमत्ता पाहता दोन कोटी होनांची आणली.

छत्रपती शिवरायांनी आरमारातून जाऊन स्वत: या सागरी मोहिमेचे नेतृत्व केल्यामुळे बसरूरच्या स्वारीचे खूप ऐतिहासिक महत्व आहे.या मोहिमेमुळे टोपीवाले इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज तसेच डचांमध्ये मराठ्यांच्या आरमाराची जबरदस्त दशहत निर्माण झाली.
पुरंदरचा तह



छत्रपती बसरूर मोहिम संपवून स्वराज्यात परत येत असताना त्यांना मिर्झाराजे जयसिंग याच्या आक्रमणाची बातमी समजली.स्वराज्यावर आलेल्या या मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी महाराज लगोलग राजगडावर पोहचले.शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंग याच्या दिलेरखान या सेनापतीने पुरंदराला वेढा घातला.पुरंदरच्या माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले.सभासदाच्या बखरीमध्ये याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता.त्याजबरोबर हजार माणूस होते.याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते.त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले.दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती.त्यात होऊन सरमिसळ जाहले.मोठे धूरंधर युद्ध जहले.मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले.पाचशे पठाण लष्कर ठार जाहले.तसेच बहिले मारले.'

मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,'अरे तू कौल घे.मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.'ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?'म्हणोनि नीट खानावरी चालिला.खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारुन पुरा केला.तो पडला,मग खानाने तोंडात आंगोळी घातली,'असा शिपाई खुदाने पैदा केला.'

मिर्झाराजे जयसिंगच्या रूपाने स्वराज्यावर आलेले मोघलांचे आक्रमण, परतावण्यासाठी छत्रपती शिवरायांनी ११ जून १६६५ रोजी मिर्झाराजे जयसिंग बरोबर इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह'केला.या तहान्वये तेवीस किल्ले मोघलांना द्यावे लागले.तह करून छत्रपतींनी स्वराज्यावरील संकट परतवून लावल्यामुळे तह करून सुध्दा राजे जिंकले.

No comments: