आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे
Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

Monday, 17 February 2014

राजा छत्रपती राजाराम

                                             ।।पराक्रमी राजा छत्रपती राजाराम।।


छत्रपती राजाराम यांचा जन्म २ मार्च १६७० रोजी छत्रपती शिवरायांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला.राजारामचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी जानकीबाईंशी १५ मार्च १६८० रोजी झाले होते.


जानकीबाईच्या नंतर राजाराम यांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई व कोल्हापूरच्या कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई यांच्याशी झाले.याशिवाय राजाराम यांना अंबिकाबाई ही आणखी एक पत्नी होती.छत्रपती संभाजीराजेंना मोघलांनी पकडल्यामुळे रायगडावर १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम यांचे मंचकारोहन झाले.


याच सुमारास २५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला.याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला.जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह राजाराम यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले.वाटेत विशाळगडावर ताराबाई,राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले.
महाराष्ट्रात राजारामांनी आपल्या गैरहजेरीत धनाजी जाधव,संताजी घोरपडे, परशराम त्रिंबक, शंकराजी नारायण यांच्याकडे सुत्रे सोपविली होती.धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांनी आपल्या गनिमी काव्यांनी व वेगवान हालचालींने मोघलांना वेठीस आणले होते.तर तिकडे जिंजीला राजाराम यांचा मोघलांशी संघर्ष चालू होता.मोघलांना एकाच वेळी दोन ठिकाणी लढावे लागत होते.


सन १६९० साली मोघल सरदार जुल्फिकारखानाने जिंजीला वेढा दिला.हा वेढा सात वर्ष चालला होता.वेढा घातलेल्या मोघलांच्या सैन्यावर हल्ले करून धनाजी जाधव,संताजी घोरपडे यांनी त्यांना वेठीस आणले होते.अखेरीस १६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले होते.


महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम यांनी १६९८ साली धनाजी जाधव,परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली.या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली.मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले तेथेच त्यांचे निधन झाले.छत्रपती राजाराम पराक्रमी,मुत्सद्दी होते.चांगल्या माणसांची त्यांना पारख होती.राजाराम यांना ताराबाईपासून शिवाजी तर राजसबाई पासून संभाजी हे दोन पुत्र झाले होते.

छत्रपती संभाजीराजे

                                       ।।सिंहाचा छावा छत्रपती संभाजीराजे।।



श्री शंभो: शिवजातस्य, मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनो लेखा,वर्तते कस्य नोपरि ||



छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र श्री.संभाजी राजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे.तिचे अंकसेवन करणाऱ्यांचा(आधार घेणाऱ्यांचा) पगडा सगळ्यांवर पडेल.


छत्रपती संभाजीराजे,ज्यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते.आठ भाषांचा जाणकार असणारा हा महाराजा, ज्यांनी 'बुधभूषणम्' हा संस्कृत तर 'नायिकाभेद', 'नखशिख', 'सातसतक' हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले.हा थोर राजा जसा लेखणीतही श्रेष्ठ होता तसा तो रणांगणात श्रेष्ठ होता.बुध्दिमत्ता आणि शौर्य श्रीशंभूराजामध्ये भरले होते.आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट केला,स्वराज्यातील एकही किल्ला गमावला नाही.मराठ्यांचे आरमार शक्तीशाली केले.कर्नाटकातील मराठी राज्य वाढविले,पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांश राज्य जिंकले,औरंगजेबच्या सैन्याची दाणादाण उडविली,असा हा छावा. छत्रपती संभाजीराजे एकाच वेळी मोघल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दीशी लढत होते.


श्री शंभूराजांचे निष्कलंक व्यक्तित्व समजण्यासाठी,शंभूराजांनी लिहिलेला खालील श्लोक पुरेसा आहे.(बुधभूषण,अध्याय दोन,श्लोक ४२२).यात त्यांनी राजाचे सात दोष वर्णिलेले आहेत.


व्यसनादि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् |

सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ||४२२||


हे सात दोष पुढीलप्रमाणे आहेत,वादण्ड,पारूष्य,दुरयातंच,पान,स्त्री,मृगया आणि द्यूत.शंभूराजेंनी राजांना या सात दोषापासून दूर राहावयास सांगितले आहे.


श्रीशंभूराजांनी बुधभूषण या आपल्या संस्कृत ग्रंथात पानापानावर असे विचार मांडलेत.त्याकाळी राजाकडे जनानखाना असणे प्रतिष्ठेचे असताना शंभूराजांनी त्याचा निषेध केला तसेच बहूपत्नीव नाकारले.महाराणी येसूबाईंना स्वतंत्र राज-मुद्रा देऊन राज्यकारभारामध्ये सामील करून घेतले.अशा थोर सेनानीचे कर्तुत्व झाकण्याचा प्रयत्न पेशवेकालीन बखरकारांनी केला.संभाजी राजांच्या कर्तुत्वाचे विकृतीकरण करणारी मल्हार रामराव चिटणीसाची बखर,संभाजी राजांच्या मृत्युनंतर १२२ वर्षांनी,सन १८११ साली लिहिली गेली.मल्हार रामराव चिटणीसाचे खापरपणजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांस संभाजीराजेंनी स्वराज्यद्रोहाच्या आरोपामुळे हत्तीच्या पायी दिले होते,त्यामुळे मनात अढी ठेवून मल्हार रामराव याने बखर लिहिली.आजच्या युगातील काही तथाकथित विद्वान लेखक,नाटककार,इतिहासकारसुध्दा संभाजी राजांच्या कर्तुत्वाचे विकृतीकरण करण्यात आघाडीवर आहेत.संभाजीराजांच्या पराक्रमाविषयी आपण सविस्तरपणे पुढे चर्चा करणार आहोत.


छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स.१४ मे,१६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या 'मातोश्री सईबाईंचे'निधन,संभाजीराजांच्या लहान वयात झाले. त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या कापूरहोळ गावातील 'धाराऊ'राजेंच्या दुधाई बनल्या.लहानपणापासूनच बुध्दिमान असलेल्या संभाजीराजेंनी युध्दाचे डावपेच,राजकारण लवकर आत्मसात केले.

छत्रपती शिवरायांनी संभाजीराजें अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांना आग्रा भेटीसाठी सोबत नेले.आग्रा भेटीवेळी संभाजी राजेंना मोघलांची पंचहजारी मनसबदारी मिळाली होती.त्यामुळे जेव्हा औरंगजेबने कपटाने छत्रपती शिवरायांना कैदेत टाकले त्यावेळी संभाजीराजेंचा,छत्रपतींना खुप उपयोग झाला.


सन १६७४ साली राज्याभिषेकानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले.त्यामुळे संभाजी राजे पोरके झाले.तर छत्रपती राजारामाचा जन्म झाल्यामुळे सोयराबाई संभाजी राजेंकडे दुर्लक्ष करू लागल्या.संभाजीराजे अत्यंत देखणे व शूर होते,त्यांना भ्रष्टाचार खपत नसे.शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील अण्णाजी दत्तोंच्यासारख्या काही लोकांचा भ्रष्टाचार संभाजीराजेंनी उघडकीस आणल्यामुळे ते संभाजी राजेंविरूध्द गेले.शिवरायांनंतर जर संभाजी राजे गादीवर बसले तर आपले काही खरे नाही असे अष्टप्रधानातील भ्रष्ट लोकांना वाटू लागले.त्यामुळे त्यांनी महाराणी सोयराबाईंना फूस लावून शिवरायांनंतर छोट्या राजारामाला गादीवर बसविण्याचे मनोरथ आखले.

छत्रपती शिवरायांनी जेव्हा दक्षिण भारतातील मोहिम आखली,तेव्हा त्यांनी संभाजी राजेंना सोबत नेण्याचा विचार केलेला होता,जेणेकरून संभाजी राजेंना मोहिमेचा अनुभव येईल.पण छत्रपतीसोबत गेल्यावर संभाजी राजेंचे कर्तुत्व शिवरायांच्या नजरेत भरेल व राजे म्हणून ते संभाजीराजेंची निवड करतील असे वाटल्यामुळे, अष्टप्रधान मंडळीनी सोयराबाईंकरवी महाराजांना,संभाजीराजेंना सोबत नेण्यास विरोध दर्शविला.महाराज या सर्वापुढे हतबल झाले व त्यांनी संभाजी राजेंना शृंगारपूरचे सुभेदार म्हणून पाठविले.

शृंगारपूरचे सुभेदार



छत्रपती दक्षिण मोहिमेला गेल्यानंतर अष्टप्रधानांची कारस्थाने सुरू झाली.इकडे शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजीराजेंतील कवी,लेखक जागा झाला. बुधभूषणम् हा संस्कृत तर नायिकाभेद,नखशिख आणि सातसतक हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ त्यांनी याच कालावधीत लिहिले.यावेळी त्यांना कवी कलश यांची चांगली साथ लाभली.शृंगारपूर परिसरात दुष्काळ पडल्यामुळे,रयतेकडून एक वर्ष करवसुली न करण्याचा संभाजीराजेंनी निर्णय घेतला.पण अष्टप्रधानानीं संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिला.संभाजीराजे राज्य चालविण्यासाठी अयोग्य आहेत,असा प्रचार अष्टप्रधान मंडळीनी आरंभिला.तशी पत्रे त्यांनी कर्नाटकात मोहिमेवर असलेल्या छत्रपतींना पाठविली.



आपल्या निर्णयाला स्वराज्यात किंमत नाही,असे समजल्यामुळे संभाजीराजे निराश झाले.अशातच दिलेरखानाने संभाजीराजेंना पत्र पाठवून आपल्याकडे येण्याचा निरोप दिला.मुघलांना मिळून त्यांची गुपीते मिळवावी असा विचार करून त्यांनी मुघलांना सामील व्हायचा निर्णय घेतला.सभासदाच्या बखरीमध्ये याचे पुढीलप्रमाणे वर्णन आहे.'इतकियात संभाजीराजे राजियाचे पुत्र ज्येष्ठ राजियावर रूसून मोघलाईत गेले .'



दिलेरखानाने संभाजीराजेंना ढाल करून भूपाळगडावर हल्ला केला.शत्रूपक्षात संभाजीराजे असल्यामुळे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तसेच इतर मावळ्यांनी शरणागती पत्करली.संभाजीराजेंनी सर्व सैनिकांना सुखरूप जाऊ मागणी दिलेर खानाकडे केली.पण दिलेर खानाने सर्वच सैनिकांचा एक हात कलम करण्याचा आदेश दिला,तसेच त्याने आदिलशाहच्या ताब्यातील अथणीवर हल्ला करून तेथील जनतेचा अनन्वित छळ केला.मोघलांना सामील होऊन आपण चूक केल्याचे संभाजीराजेंना कळल्यामुळे मोघलांच्या तावडीतून निसटून ते विजापूर मार्गे पन्हाळा किल्ल्यावर येऊन दाखल झाले.

छत्रपती शिवरायांची व संभाजीराजेंची ऐतिहासिक भेट


छत्रपती शिवरायांना कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना संभाजीराजे स्वराज्यात परत आल्याची वार्ता समजल्यानंतर ते त्वरेने संभाजीराजेंना भेटावयास पन्हाळा किल्ल्यावर आले.तो ऐतिहासिक दिवस होता १३ जानेवारी १६८०.संभाजीराजेंची पन्हाळा किल्ल्याचा सरसुभेदार म्हणून नेमणूक करून ते रायगडाला परतले.

रायगडावर आल्यानंतर छत्रपतींनी ७ मार्च,१६८० रोजी राजारामची मुंज केली.तर १५ मार्च १६८० रोजी,प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई हिच्याशी राजाराम याचा विवाह केला.

मनात अढी असल्यामुळे सोयराबाईंने संभाजी राजेंना विवाहासाठी बोलाविले नाही. राजारामच्या विवाहानंतर काही दिवसातच,३ एप्रिल १६८० या रोजी महाराजांचे निधन झाले.महाराजांच्या निधनाची बातमी संभाजीराजेंना न कळवता,लहान असलेल्या राजारामला राज्याधिकारी करण्याचे अष्टप्रधान मंडळी व राणी सोयराबाईंनी ठरविले.महाराजांच्या मृत्युनंतर अठरा दिवसांनी,२१ एप्रिल रोजी राजाराम महाराजांचे रायगडावर त्यांनी मंचकारोहन केले.

अष्टप्रधानांची कारस्थाने



राजारामचे मंचकारोहन झाल्यानंतर,प्रधान मंडळीनी सेनापती हंबीररावास,'आम्हास मिळून राजारामाचा कार्यभाग साधावा'असे पत्र धाडिले.हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते त्यामुळे आपल्या भाच्यासाठी ते आपल्या कटात सामील होतील असे प्रधान मंडळीना वाटले.

मोरोपंत,प्रल्हाद निराजी आणि अण्णाजी दत्तो या मंडळीनी संभाजीराजेंना अटक करण्यासाठी रायगडाहून पन्हाळा किल्ल्याकडे प्रस्थान केले.वाटेत कराड जवळ हंबीरराव मोहिते यांना सोबत घेऊन संभाजीराजेंना कैद करावयाचा त्यांचा विचार होता.पण कराडच्या छावणीत आल्यानंतर हंबीरराव मोहितेंनी सर्व मंडळीना कैद करून कोल्हापूरला,पन्हाळा किल्ल्याकडे कूच केली.

संभाजीराजे हेच खरे गादीचे वारस आहेत तसेच मोघलांच्या प्रचंड अशा फौजेशी सामना करण्याची ताकद फक्त संभाजीराजेंकडे आहे,हे हंबीररावांना माहित होते.त्यातच मोघल सुभेदार बहादुरखान स्वराज्याच्या तोंडाशी आला होता.अशा वेळी राजारामला गादीवर बसवून स्वराज्याचा आत्मघात करण्यासारखे होते.या कठीण समयी संभाजीराजेंसारख्या खंबीर राजाची स्वराज्याला आवश्यकता होती. हे जाणून हंबीरमामा सारखा मुत्सद्दी सेनानी संभाजीराजेंच्या बाजूने उभा राहिला.सेनापती संभाजीराजें कडे गेल्यामुळे प्रधान मंडळीचे सर्व कारस्थान धुळीस मिळाले.पन्हाळा किल्ल्यावर मोठ्या उदार मनाने संभाजीराजेंनी या सर्व मंडळीना माफ केले.

संभाजीराजेंचा राज्याभिषेक


पन्हाळा किल्ल्याहून रायगडाला रवाना होताना संभाजीराजेंनी स्वराज्यातील सर्व किल्ल्यावर दारूगोळा,धनधान्य पाठवियाची व्यवस्था केली.किल्ल्याच्या मजबूती- करणाकडे किल्लेदारांना लक्ष द्यावयास सांगून आवश्यक साधनसामग्री प्रत्येक किल्ल्यावर पाठविली.यानंतर संभाजीराजेंनी रायगडाला प्रस्थान केले.रायगडाची जनता आपल्या राजाचं स्वागत करावयास गडावर हजर होती.सन १६ जानेवारी १६८१ साली संभाजीराजेंचा राज्याभिषेक,किल्ले रायगडावर झाला.या प्रसंगी त्यांनी सर्व अष्टप्रधान मंडळीना माफ केले व परत सर्वांना अष्टप्रधानात स्थान दिले.पण काही महिन्याने या मंडळीनी परत बंडाळी केली,तेव्हा कायमची बंडाळी मोडून काढण्यासाठी अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना छत्रपती संभाजींनी सुधागड परिसरात असणार्‍या परली गावात हत्तीच्या पायी दिले.

बुर्‍हाणपुरची मोहिमशत्रू तोंडाला आल्यामुळे ती वेळ स्वस्थ बसण्याची नव्हती.संभाजीराजेंनी लगेच बुऱ्हाणपुरची मोहिम आखली.बुर्‍हाणपुर हे मोघल राजवटीतील सुरतेनंतर असणारे दुसरे सधन शहर होते.त्यामुळे हे शहर लुटून मोघलांचे आक्रमण उधळून लावण्यासाठी,हंबीरराव मोहिते यांनी बुऱ्हाणपुरवर चाल केली.मोघलांचा इतिहासकार खाफीखान यांने या लुटीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे.

बुर्‍हाणपुर शहराच्या बाहेर बहादूरपुरा आणि इतर सात पुरे होते,मराठ्यांनी ते पुरे घेरले.मराठ्यांनी शहरावर इतक्या अनपेक्षितपणे हल्ला केला की,शहरातील लोकांना एक पैसा हलवता आला नाही.देशोदेशीचे जिन्नस,जडजवाहीर,सोने-नाणे,रत्ने यांनी भरलेली बाजारपेठ मराठ्यांनी लुटली.

मोघलांशी लढा


सन १६८१ साली औरंगजेबचा पुत्र शहजादा अकबर,औरंगजेबविरूध्द बंड करून संभाजीराजेंना येऊन मिळाला.मराठ्यांचे राज्य जिंकणे व शहजादा अकबर शासन करणे हे दोन हेतू मनात ठेवून औरंगजेबने दक्षिण मोहिम आखली.प्रचंड सैन्यासह व नामांकित सेनानीना घेऊन त्यांने दक्षिणेला कूच केली.वाटेतील गावागावात विध्वंस करत तो नोव्हेंबर १६८१ च्या सुमारास औरंगाबादला पोहचला.नासिकच्या जवळ असलेल्या रामसेज किल्ल्याला मोघल सेनानी शहाबुद्दीनखानने वेढा दिला.

सिद्दीचा बंदोबस्त


मोघलांचे स्वराज्यावर आक्रमण आले होते याचा फायदा घेऊन सिद्दीने कोकणकिनारपट्टीवर खूप उच्छाद मांडला होता.सिद्दीला मोघल,इंग्रज व पोर्तुगीज यांची मदत मिळत होती.१६८२ मध्ये संभाजी राजांनी सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निश्चय केला.प्रथम संभाजीराजेंनी सिद्दीच्या हबशी मुलखावर हल्ला करून तो जिंकून घेतला कारण सिद्दीला तेथून रसद मिळत होती.



राजापुरी गावातून नजरेच्या टप्यात असलेल्या जंजिरा किल्ल्याला दर्यात बुडविण्याचा विचार करून संभाजीराजेंनी आक्रमण केले.पण किल्ल्याच्या बुरूजापर्यत मराठ्यांच्या तोफेचा मारा पोहचत नसल्यामुळे जंजिराच्या बुरूज शाबूत होता.सिद्दी खैरतने जंजिरा किल्ल्याचा बंदोबस्त मोठा चोख ठेवला होता.सिद्दी खैरताच्या कलाल बांगडी,लांडा कासम,चावरी या मोठ्या तोफांच्या मार्‍यापुढे मराठ्यांची गलबते दर्यात डूबत होती.



अशावेळी संभाजीराजेंनी धाडशी निर्णय घेऊन,ओहटीच्या वेळी समुद्रात भराव टाकून पुल बांधण्याचे ठरविले,जेणेकरून तोफेचा मारा जंजिराच्या बुरूजापर्यंत पोहचेल.समुद्रात काही अंतरावर भराव टाकल्यानंतर मराठ्यांनी आपल्या मोठ्या तोफा काढून किल्ल्यावर मारा चालू ठेवला त्यामुळे किल्ल्याचा बुरूज कोसळून किल्ल्यामध्ये ठिकठिकाणी आग लागली.रात्रीच्या वेळी सिद्दी खैरत व कासम किल्ला सोडून इंग्रजाच्या आश्रयाला मुंबईला पळून गेले.किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असे वाटले असतानाच मोघल सरदार हसन अलिखान कल्याणमार्गे रायगडाच्या दिशेने येत असल्याचे समजल्यामुळे संभाजीराजेंना ही मोहीम अर्धवट सोडावी लागली.पण संभाजीराजेंनी जंजिरा खिळखिळा केल्यामुळे,सिद्दीने पुन्हा मराठी मुलखात पाय टाकायचे धाडस केले नाही.संभाजीराजे एकाच वेळी मोघल,सिध्दी,इंग्रज,पोर्तुगीज यांच्याशी लढत होते.
रामसेजचा ऐतिहासिक लढा


इकडे नासिकच्या जवळ असलेल्या रामसेज किल्ल्याला मोघल सेनानी शहाबुद्दीनखानने वेढा दिला होता.औरंगजेबला वाटले की काही तासातच किल्ला पडेल पण किल्ला जिंकायला त्याला तब्बल साडेसहा वर्षे लागली.या कालावधीत त्यांने वेगवेगळे सेनानी किल्ला जिंकावयास पाठविले.रामसेजचा किल्लेदार सुर्याजी जेधे हा मोठा पराक्रमी होता.मराठ्यांनी हा किल्ला झुंजवत ठेवला.किल्ल्याला घातलेला वेढा मारण्यासाठी रूपाजी भोसले,मानाजी मोरे,हंबीरमामा यांना संभाजीराजेंनी पाठविले.या कालावधीत स्वत: संभाजीराजे यांनी किल्ल्यावर रसद पुरविली.अखेरीस किल्ल्यावरची रसद संपल्यामुळे मराठ्यांनी किल्ला सोडून दिला.

याच सुमारास संभाजीराजेंनी गोव्याचे पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय यांच्याविरूध्द आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला.मराठ्यांचे राज्य जिंकण्यास येत असलेल्या अपयशामुळे औरंगजेबने आदिलशाही जिंकून घेण्याचा विचार केला.
म्हैसूरकर चिक्कदेवराजाचा बंदोबस्त



मराठ्यांची जहागीर एंकोजीरावांनी बेंगलोरहून,तंजावरला हलविल्यापासून म्हैसूरकर चिक्कदेवराजा खूप माजला होता.त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते.रामसेजचा लढा चालू असल्यामुळे औरंगजेब नजीकच्या कालखंडात घाटमाथ्यावर उतरण्याची शक्यता कमी होती.त्यातच पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते.औरंगजेबबरोबरच्या निर्णायक युध्दात कर्नाटक,तामीळ प्रांतातून येणारी रसद महत्त्वाची ठरेल ही संभाजीराजेंनी ओळखले होते.कर्नाटक,तामीळ प्रांतातील जहागीर त्यासाठी शाबूत ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे संभाजीराजेंनी कर्नाटक,तामीळ प्रांतावरील मोहिमेचा बेत आखला.


चिक्कदेवराजाची ताकद पहिल्यापेक्षा वाढल्यामुळे म्हैसूरवर हल्ला करणे संभाजीराजेंना योग्य वाटले नाही.त्यामुळे शत्रूला गुहेतून बाहेर काढून त्याजबरोबर लढावे असा विचार त्यांनी केला.तामीळ प्रांतातील चिक्कदेवराजाच्या ताब्यात असलेल्या त्रिचनापल्लीच्या(सध्याचे त्रिची शहर)पाषाणकोट किल्ल्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.



संभाजीराजेंच्या सोबतीला बसप्पा नाईक हुक्केरी,गोवळकोंड्याचा दिवाण मादण्णा पंडीत तसेच तंजावरच्या एंकोजीरावांच्या सैन्याची कुमक होती.पहाटेच्या सुमारास होडीचा आधार घेत संभाजीराजेंच्या सैन्याने दुथडी भरून वाहणार्‍या कावेरी नदीत घोडी घालून कावेरीचा किनारा गाठला.मराठ्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शहरात अफरातफरी माजली.संभाजीराजेंनी पाषाणकोट किल्ल्यावर जोरदार हल्ला चढविला.गडावरील मदुरेकर नायकाच्या शिबंदीने जोरदार प्रत्युतर दिले.पण शेवटी कवी कलशाच्या नेतुत्वाखालील तिरंदाजांच्या पेटत्या बाणांनी किल्ल्यावरील दारूगोळ्याला आग लागून बुरूज उडाला व शेवटी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.



संभाजीराजेंनी चिक्कदेवराजांकडून मोठी खंडणी वसूल केली.या कालावधीत संभाजीराजेंनी कर्नाटक व तामीळ प्रांतात मोठा मुलूख मारला.या प्रांतातील बावीस किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले.मोठी खंडणी तसेच रसद स्वराज्याला मिळाली.कर्नाटकातील धर्मपुरी-होसूर पासून तामीळ प्रांतातील जिंजी वेलुरापर्यंतचा प्रदेश मराठ्यांच्या घोड्याच्या टापाखाली आला.
संगमेश्वरला दगा


सन १६८५ साली एप्रिल महिन्यात मोघलांच्या सैन्याने विजापूरला वेढा घातला.औरंगजेबचा शहजादा आज्जम यांने हा वेढा आणखी मजबूत केला. विजापूरला वाचविण्यासाठी संभाजीराजेंनी आपले विश्वासू छंदोगामात्य कवि कलश यांना आदिलशाहच्या मदतीस पाठविले.पण अखेरीस १२ सप्टेंबर १६८६ साली विजापूर मोघलांच्या ताब्यात पडले.


आदिलशाही जिंकल्यामुळे आता औरंगजेबला कोणताही शत्रू उरला नाही,त्याने आता पुर्ण शक्तीनिशी मराठी मुलूखावर वेगवेगळ्या आघाड्या उघडल्या.शत्रू अगदी रायगडाच्या पायथ्याशी आला होता.अशातच सन १६८७-८८ साली पडलेल्या दुष्काळाने रयतेचे हाल झाले.संकटे चोहोबाजूंनी आलेली होती,या संकटाच्या समयी स्वराज्यातील अनेक सरदार,वतनाच्या आशेने मोघलांना मिळाले होते. समय खूप कठिण होता अशा वेळी पुढील रणनीती ठरविण्यासाठी संभाजीराजेंनी महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले.यावेळी कोकणात यावयाच्या सर्व वाटांवर संभाजीराजेंनी बंदोबस्त लावला होता.


संगमेश्वरची बैठक संपवून रायगडाला निघतेवेळी,हेरांनी संगमेश्वरवर औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी हल्ला केल्याची बातमी आणली.


त्यावेळी संगमेश्वरला संभाजीराजेंसोबत महाराणी येसूबाई होत्या.अवघे चारशे-पाचशे सैन्य यावेळी राजांसोबत होते.शत्रूने अचानक हल्ला केल्यामुळे मोठी हातघाई झाली.यासमयी येसूबाईंना, धनाजी जाधव व काही सैनिकासह त्यांनी पुढे पाठविले.शत्रुला गुंगारा देण्यासाठी संभाजीराजे,कवि कलश व काही निवडक साथीदार दुर्गम वाटेने गेले. पण सर्वजण पकडले गेले.संभाजीराजेंना त्यांच्या सहकार्‍यांसह पकडून दुर्गम जंगलातील वाटेने नेण्यात आले.वाटेत जाताना ते ओळखू नयेत म्हणून सर्वाचे केस कापले गेले,तोंड बांधले गेले.
संभाजीराजेंची क्रुर हत्या


संभाजीराजे आणि कवि कलश यांची धिंड काढून त्यांना औरंगजेबसमोर हजर करण्यात आले.या घटनेबद्दल मोघलांचा इतिहासकार खाफीखान लिहितो,"संभाजी व कवीकलश यांची धिंड जेव्हा परतली तेव्हा औरंगजेबने आपला दरबार भरवला आणि या कैद्याना दरबारात आणले.त्यांना पाहताच औरंगजेब तख्तावरून खाली उतरला.ईश्वराच्या या उपकाराप्रीत्यर्थ दोन रूकात पढल्या. औरंगजेब गुडघे टेकून ईश्वराची प्रार्थना करीत होता.हे पाहिल्यानंतर कवी कलश संभाजीराजेंकडे पाहून म्हणाला,


'राजन हो तुम सॉंच खरे,खूब लढे तुम जंग।

देखत तव चंडप्रताप जही,तखत त्यजत औरंग।'


हे संभाजीराजा तू सच्चा वीर आहेस,तूच जबरदस्त योध्दा आहेस.तुझा हा प्रचंड पराक्रम बघून स्वत:औरंगजेबाने आपले राजसिंहासन त्यागून तुझ्यापुढे तो नतमस्तक झाला आहे."


संभाजीराजेंच्या मृत्युबद्दल आलमगीर विजय'या फारशी ग्रंथात(हा ग्रंथ औरंगजेबाचा मुख्य न्यायाधिश शेख उल इस्लाम याचा कारकून असलेल्या ईश्वरदास नागर याने लिहिला आहे)पुढीलप्रमाणे लिहिले आहे."बादशाहच्या आज्ञेने,इखलासखान आणि बहादूरखान हे संभाजीराजे,कवि कलश व इतर साथीदारांना घेऊन बादशाहच्या छावणीजवळ आले.बादशाहच्या आज्ञेवरून या सर्वांची उंटावरून धिंड काढण्यात आली.त्यानंतर त्यांना छावणीत आणण्यात आले.इखलासखान आणि हमीदुद्दीन खान यांनी संभाजीराजेंना बादशाहला ताजीम देण्यासाठी सांगितले पण संभाजीराजेंनी त्यांचे ऐकले नाही.संभाजीराजे,कवि कलश व इतर साथीदारांच्या पायात बेड्या ठोकण्याचा बादशाहने आदेश दिला.


बादशाहने रहुल्लाखाना करवी,मराठेशाहीतील खजिनाबद्दल तसेच बादशाहच्या सरदारापैकी ज्यांचे संभाजीराजेशी संबंध होते याची माहिती काढण्याचा खूप प्रयत्न केला पण संभाजीराजेंनी काही ऐकले नाही.अखेरच्या कालखंडात संभाजीराजें,कवी कलश व त्यांच्या सहकार्‍यांचे खूप हाल करण्यात आले.सर्वांनी अन्नाचा त्याग केला होता.शेवटी चिडून जाऊन बादशाहच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील मौजे तुळापूर येथे सर्वांची अत्यंत क्रुर अशी हत्या करण्यात आली.हत्येनंतर संभाजीराजेंच्या शरीराचे अवशेष गोळा करून वढु बुद्रूक येथील रयतेने त्यांची समाधी बांधली.

राजा शिवछत्रपती

                                                       ।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।



तीनशे वर्ष महाराष्ट्र इस्लामी राज्यसत्तेच्या ताब्यात खितपत पडला होता,या लोकांनी महाराष्ट्रावर आपली राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक गुलामगिरी लादून रयतेचा प्रचंड छळ चालविला होता.या कालखंडातील दिल्लीचे मोगल राजे,स्वत:ला हिंदूस्थानाचा अधिपति मानत.मोघलांच्या सत्तेला हिंदूस्थानात सर्वप्रथम छत्रपती शिवरायांनी आव्हान दिले आणि आपले स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापिले.हिंदूस्थानातील जे राजे पारतंत्र्यात जगत होते त्यांना छत्रपतींनी स्वतंत्र होण्याचा संदेश दिला.त्यामुळेच छत्रपतीं शिवरायांना युगकर्ते ,शककर्ते असेही म्हटले जाते.



छत्रपती शिवरायांचा जन्म इ.स.१९ फेब्रुवारी १६३०(फाल्गुन वद्य तृतीया,शके १५५१) रोजी पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला(संदर्भ:जेधे शकावली).सन १६३९ ते १६४२ या कालावधीत बालशिवाजी कर्नाटकात असताना शहाजीराजांनी त्यांना राज्यकारभार तसेच युद्धाभ्यासाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती(संदर्भ:परमानंदकृत शिवभारत).त्यामुळे लहानपणीच बालशिवाजी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी यात तरबेज झाले.रामायण, महाभारत या ग्रंथाचे जिजाऊंकडून संस्कार झाल्यामुळे,परकीयांविरूद्ध लढण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले.जन्मानंतर इ.स १६४२ पर्यत त्यांचे वास्तव्य शिवनेरी, सिंदखेडराजा, खेड शिवापूर, पुणे जहागीर तसेच बेंगलोर आदि ठिकाणी होते.
बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत पुण्याजवळचा मुलूख) खोऱ्यात राहणार्‍या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५ साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.


छत्रपती शिवरायांनी सुरवातीच्या कालखंडामध्ये तोरणा,सिंहगड,चाकण आदी किल्ले आदिलशहाकडून जिंकून आपल्या वर्चस्वाखाली आणले.आदिलशहाने शिवाजीराजांना आळा घालण्यासाठी फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवरायांवर हल्ला करण्यास पाठविले शिवाय विश्वासघाताने शहाजीराजांना कैद केले.


पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला.यावेळी आपल्या मुसद्दीने मुघल बादशाह शाहजहान यास दख्खनच्या सुभेदार,शहजादा मुरादबक्ष याच्यामार्फत पत्र पाठवून शहाजीराजां सहित मुघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजांची सुटका झाली याबदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला.


स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.

सईबाईना संभाजीराजे हा पुत्र तर सखूबाई,रानूबाई,अंबिकाबाई या मुली होत्या. सोयराबाईंना राजाराम हा पुत्र तर दीपाबाई ही मुलगी होती.सगुनाबाईना राजकुंवर ही मुलगी होती. तर सकवारबाईना कमलाबाई ही मुलगी होती.
चंद्रराव मोरेचा बंदोबस्त


जावळीचा चंद्रराव मोरे हा आदिलशहाचा चाकर होता,त्याच्या त्रासाने जावळी खोर्‍यातील जनता त्रस्त झाली होती.मोरे याचा पाडाव करून शिवाजी महाराजांनी जावळी काबिज केली,शके १५७७ पौष वद्य चतुर्दशी मंगळवार १५ जाने १६५६ (संदर्भ:जेधे शकावली).यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला.महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.कैदेतील मोरे आदिलशाहीशी गुप्तरुपाने पत्रव्यवहार करताना सापडल्यामुळे महाराजांनी त्याला ठार केले.रायरीवरील विजयाने महाबळेश्वर ते रायगडापर्यंतच्या कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

प्रतापगडची लढाई
आदिलशाहच्या ताब्यातील चाळीस किल्ले इ.स.१६५९ पर्यंत छत्रपतींनी जिंकले होते,या कालावधीत त्यांनी मुघलांशी नरमाईचे धोरण ठेवले.शिवरायांना नेस्तनाबूत करण्यासाठी अफझलखान या सरदारास आदिलशहाने पाठविले. शिवरायांना कैद करून विजापूरात घेऊन येण्याची प्रतिज्ञा करून अफाट सैन्यासह खान स्वराज्यावर चालून आला.स्वराज्यात येताना खान तुळजापूर,पंढरपूर आणि वाटेतील इतर गावातील देवस्थानाची तोडफोड करत, वाईला तळ ठोकून राहिला.


खानाच्या प्रचंड अशा सैन्याशी समोरासमोर लढण्याची ताकद त्यावेळी शिवरायांकडे नव्हती.याच अफझलखानाने शहाजीराजांना कैद करून अपमानास्पदरितीने बेड्या ठोकून विजापुरात नेले होते तर कनकगिरीच्या वेढ्यात शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा खानामुळे मृत्यू झाला होता.
अफझलखानांस घाबरून मसूरचे जगदाळे, उत्रोळीचे खोपडे आदि खानाला मिळाले तर कान्होजी जेधे (संदर्भ:जेधे शकावली)सारखे मावळातील बहूसंख्य इमानी वतनदार महाराजांना सामील झाले.आपल्या जीवाचे बरेवाईट होईल हे जाणून जिजाऊंच्या ताब्यात राज्यकारभार देऊन आपल्या सहकार्‍यांना भावी काळासाठी त्यांनी सूचना दिल्या.


खानाला आपण फार घाबरतो आणि आपल्याकडून खूप अपराध झाल्यामुळे आपण खानास भेटावयास जाण्याऐवजी खानानेच आपल्या भेटीस प्रतापगडाच्या पायथ्याशी यावे, असा आग्रह शिवरायांनी केला.शिवरायांच्या नम्रतेच्या निरोपामुळे व स्वत:च्या सामर्थ्याची घमेंडीमुळे अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी यावयास तयार झाला.

भेटीच्या वेळी दोन्हीकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि यावेळी सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.१० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवराय भेटीसाठी खानाला सामोरे गेले असता धिप्पाड खानाने अलिंगन देण्याचा बहाणा करून शिवरायांचे मस्तक काखेत दाबून दुसर्‍या हाताने कट्यारीचा वार शिवरायांच्या शरीरावर केला.शिवरायांनी अंगरख्याच्या आत घातलेल्या चिलखतावर हा वार बसला.खानाचा दगा लक्षात येताच शिवरायांनी उजव्या हातातील वाघनख्यांनी वार करून खानाचे पोट फाडून आतडी बाहेर काढली.

खान'दगा दगा'असे ओरडत आतडी सावरीत बाहेर आला असता,खानाचा अंगरक्षक सय्यद बंडाने शिवरायांवर केलेला वार शिवरायांचा अंगरक्षक जिवा महालाने वरच्यावर अडवून सय्यद बंडाला ठार केले.पालखीत बसून पळून जाणार्‍या खानाचे मुंडके संभाजी कावजी याने उडविले.महाराज गडावर जाताच तोफेचा आवाज करण्यात आला आणि खानाच्या बेसावध सैन्यावर दाट जंगलात लपून बसलेल्या मावळयांनी तुटून पडून त्यांची दाणादाण उडविली.
अफझलखानाच्या वधानंतर शिवरायांनी खानाच्या शवाचे इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार करुन त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.तर अफझलखानाच्या वधानंतर खानाचा मुलगा व इतर सरदारांना पळून जाण्यास मदत करणार्‍या खंडोजी खोपडेला महाराजांनी डावा पाय आणि उजवा हात तोडण्याची प्रतापगडावर शिक्षा दिली.


पन्हाळगडची लढाई

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते.मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला.शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला.शिवा काशीद चे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्यांस ठार केले,तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.

छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्या- नंतर,सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला.मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले,अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले.घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली,शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू,फ़ुलाजी,संभाजी जाधव,बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.

महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला.इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऎकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला.या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.
मुघलांशी संघर्ष



इ.स.१६६३ साली मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार करण्यासाठी त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या राज्यविस्ताराला वेसण घालण्यासाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले.हजारो सैन्य,प्रचंड मोठा लवाजमा सोबत घेऊन शाहिस्तेखान दख्खनला निघाला.दख्खनला जात असताना मध्ये वाटेत लागणार्‍या प्रत्येक गावा-गावात त्याने दहशत पसरवीत मोठा विध्वंस केला.पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील छत्रपती शिवरायांच्या लाल महालात खानाने तळ ठोकला.

खानाचे सैन्य रोजच आजूबाजूच्या गावा-गावामध्ये जाऊन लुटालूट करत.खानाच्या रूपाने एक मोठे संकट स्वराज्यावर चालून आले होते.खानाला धडा शिकविणे गरजेचे होते.समोरासमोरच्या युध्दात मराठ्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते,अशा वेळी छत्रपतींनी लालमहालावर हल्ला करून खानाला धडा शिकविण्याचे ठरविले.राजांना लाल महाल नवा नव्हता,त्यांचे लहानपण लालमहालातच गेले होते त्यामुळे लालमहालातील कोपरा न कोपरा त्यांना माहीत होता.

लालमहालाभोवती खानाच्या शेकडो सैनिकांचा बंदोबस्त होता.अशावेळी अंधार्‍या रात्री लग्नाच्या वरातीचा आधार घेऊन राजे व काही निवडक मावळे वेशभूषा बदलून महालात घुसले .लालमहालात मराठ्यांनी कत्तल आरंभिली सगळीकडे गोंधळ चालू झाला,छत्रपती खानाच्या शामियानात शिरले .ऱाज्यांना प्रत्यक्ष समोर पाहून खानाची पाचावर धारण बसली,जीव वाचविण्यासाठी खानाने खिडकीतून उडी मारली,छत्रपतींचा चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाची तीन बोटे तुटली गेली.खान बचावला गेला पण शिवरायांची दशहत मनात बसल्यामुळे तो मराठी मुलूख सोडून गेला.या प्रकरणामुळे मुघलांची बेइज्जत झाली तर शिवरायांचे नाव हिंदूस्थानभर झाले.
बसरूरची ऐतिहासिक आरमार स्वारी



इ.स.१६६५ साली छत्रपतींनी बसरूर या कर्नाटकातील बेदनुरच्या नायकाच्या राज्यातील बंदरावर चढाईचा बेत केला.गुप्तहेरांकडून शहराची व सागरी मार्गाची माहिती काढली. सन ८ फेब्रुवारी १६६५ साली मालवणजवळच्या मालंडच्या खाडीतून ८५ लहान तसेच ३ मोठी जहाजे घेऊन त्यांनी जहाजावर पाऊल टाकले.मालवण ते बसरूर अंतर सहा दिवसात कापून मराठे १४ फेब्रुवारीला बसरूरच्या किनार्‍यावर पोहचले.

मराठ्यांनी शहरात घुसून लुट आरंभिली.सुमारे चार हजार मराठे अचानक शहरात घुसल्यामुळे शहरात हाहाकार उडाला,मराठ्यांनी दिवसभर शहराची लुट केली. सभासदाच्या बखरीमध्ये या मोहिमेचे खुप सुंदर असे वर्णन आहे.

'बिदनुरी शिवाप्पा नाईक जंगम होता,त्याचे शहर बसनूर(बसरूर)म्हणून थोर नामांकित होते.दर्या किनारी येथे पालती(टेहळणी)पाठवून वर घाटे जाता मार्ग नाही म्हणून पाणीयातील जहाजे आणून सिध्द करून आपण राजा खासा,जहाजात बसून जाऊन बसनुरास एकाएकी दिवस उगवावयासी गेले.शहरचे लोक बेहुशार होते,एकाएकी जहाजातून उतरले,शहर मारिले,एक दिवस शहर लुटून फन्ना केले.जैसी सुरत मारून मालमत्ता आणिली,त्याप्रमाणे बसनुरची मालमत्ता अगणित माल, जडजवाहीर, कापड, जिन्नस आपले देशास घेऊन आले.मालमत्ता पाहता दोन कोटी होनांची आणली.

छत्रपती शिवरायांनी आरमारातून जाऊन स्वत: या सागरी मोहिमेचे नेतृत्व केल्यामुळे बसरूरच्या स्वारीचे खूप ऐतिहासिक महत्व आहे.या मोहिमेमुळे टोपीवाले इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज तसेच डचांमध्ये मराठ्यांच्या आरमाराची जबरदस्त दशहत निर्माण झाली.
पुरंदरचा तह



छत्रपती बसरूर मोहिम संपवून स्वराज्यात परत येत असताना त्यांना मिर्झाराजे जयसिंग याच्या आक्रमणाची बातमी समजली.स्वराज्यावर आलेल्या या मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी महाराज लगोलग राजगडावर पोहचले.शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंग याच्या दिलेरखान या सेनापतीने पुरंदराला वेढा घातला.पुरंदरच्या माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले.सभासदाच्या बखरीमध्ये याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता.त्याजबरोबर हजार माणूस होते.याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते.त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले.दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती.त्यात होऊन सरमिसळ जाहले.मोठे धूरंधर युद्ध जहले.मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले.पाचशे पठाण लष्कर ठार जाहले.तसेच बहिले मारले.'

मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,'अरे तू कौल घे.मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.'ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?'म्हणोनि नीट खानावरी चालिला.खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारुन पुरा केला.तो पडला,मग खानाने तोंडात आंगोळी घातली,'असा शिपाई खुदाने पैदा केला.'

मिर्झाराजे जयसिंगच्या रूपाने स्वराज्यावर आलेले मोघलांचे आक्रमण, परतावण्यासाठी छत्रपती शिवरायांनी ११ जून १६६५ रोजी मिर्झाराजे जयसिंग बरोबर इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह'केला.या तहान्वये तेवीस किल्ले मोघलांना द्यावे लागले.तह करून छत्रपतींनी स्वराज्यावरील संकट परतवून लावल्यामुळे तह करून सुध्दा राजे जिंकले.

राजमाता जिजाबाई

                                                             ।। राजमाता जिजाबाई ।।

जशी चंपकेशी खुले फूल जाई ।

भली शोभली ज्यास जाया जिजाई ॥

जिचे कीर्तिचा चंबू जंबू द्विपाला ।

करी साऊली माऊली मुलाला ॥
(कवीश्रेष्ठ: जयराम पिंडे,शहाजीराजेंच्या दरबारातील रत्न)

अर्थ :एखादा मोठा बगीचा फुललेल्या जाईंच्या फुलाच्या ताटव्याने खुलून जातो त्याचप्रमाणे जिजाऊंच्या रूपाने शहाजी राजांचे जीवन सुशोभित झाले होते.पण शहाजीराजेंची पत्नी हीच जिजाऊंची ओळख नव्हती.जिजाऊंच्या कार्याचा,कर्तुत्वाचा गौरव सर्वदूर देशामध्ये व दिशामध्ये पसरला होता.अशा जिजाऊंनी साऊली होऊन आपल्या सुपूत्राला सर्वच प्रकारची सोबत,शिक्षण दिले.आई होऊन शिवबावर सावलीसुध्दा धरली.



राजमाता जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी सिंदखेडराजा (बुलडाणा) येथे झाला.म्हाळसाराणी हे त्यांच्या आईचे नाव तर लखुजीराव जाधव हे त्यांच्या वडिलांचे नाव होते.दत्ताजी,अचलोजी,राघोजी व बहादुरजी हे त्यांचे वडिलबंधू होते.लखुजीराव वेरूळच्या यादव घराण्याचे वंशज होते.


जिजाऊंना अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते.लखुजीराव जाधव निजामशाहचे वतनदार होते.आपल्या पराक्रमाऩे त्यांनी निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले होते.इ.स.१६१० साली वेरूळ येथे निजामशाहच्या पुढाकाराने जिजाऊंचा विवाह शहाजीराजेंशी झाला.तो काळ मोठा धामधुमीचा होता.भोसले,जाधव,निंबाळकर,महाडिक,सुर्वे,शिर्के असे अनेक मराठा सरदार वतनापायी अदिलशाह,कुतूबशाह,निजामशाह,मोघल यांच्याकडे चाकरी करीत होते.·

छत्रपती शहाजीराजे भोसले

                                 ।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।


वेरूळच्या मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांनी पुत्र व्हावा म्हणून अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस केला होता.त्यामुळे पुत्र झाल्यावर शहाजी व शरीफजी अशी आपल्या पुत्रांची नावे त्यांनी ठेवली.शहाजीराजेंचा जन्म इ.स.१८ मार्च,१५९४ रोजी झाला.

शहाजीराजेंचे पिता मालोजीराजे भोसले निजामशाहच्या चाकरीत होते. निजामशाहच्या दरबारात सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव हे सुध्दा चाकरीत होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.पुढे निजामशाहच्या पुढाकाराने शहाजीराजेंचा विवाह,लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी जिजाबाई यांच्याशी इ.स.१६०३ मध्ये झाला.शहाजीराजें व जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये झाली.त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते.त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजीराजेंचा सांभाळ जिजाबाईंनी केला.

सासरे लखुजी जाधव यांच्याशी बेबनाव

मालोजीराजेंच्या दुदैवी मृत्यूनंतर शहाजीराजेंनी आपल्या पराक्रमाने निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले.पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला,कारण होते पिसाळलेल्या हत्तीस काबूत करण्याचे.निजामशाहच्या दरबारातील एक हत्ती पिसाळला होता,हत्तीस पकडण्यास दोन पथके तयार केली गेली.पहिले पथक जाधवांचे होते,त्याचे नेतॄत्व लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ दत्ताजीराव जाधव करत होता.तर दुसरे पथक भोसले यांचे होते.त्याचे नेतृत्व शहाजीराजे भोसले यांचे बंधू संभाजीराजे भोसले करत होते.यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले.हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसल्यास ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासऱ्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.

शिव महिमा ( छत्रपती शिवाजी महाराज )


निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
 अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

 परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
 तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥

 यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
 नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

 आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
 सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥

 नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
 पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥

 धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
 सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

 तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।
 सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

 देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
 हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥

 उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
 धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥

 या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
 महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥

 आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।
 धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥

 कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
 कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥

 तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
 ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणो ॥

 सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
 धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ॥

 उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
 प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥

Monday, 6 January 2014

सावित्रीबाई फुले

               सावित्रीबाई फुले (जानेवारी ३, इ.स. १८३१ - मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
अनुक्रमणिका
१ चरित्र
२ सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य
३ सावित्रीबाई संमेलन/पुरस्कार
४ अधिक वाचन


चरित्र

सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. स्त्री-स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फूल हिसकावून घेणाऱ्या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणाऱ्या नागाला त्यांनी ठेचून मारले.

फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) रोजी ज्योतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. म्हणजे त्या वेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच झाल्याचे मानले गेले. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या.

‘त्यांनी केले ते माफ आणि आपण शिकलो की पाप’ हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’.... या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली. ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला . त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे भिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आले की "गोऱ्या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील". नरकाच्या भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले.

१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रिबाइनी पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.

सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत .

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य[संपादन]
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना. ग. पवार)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)
त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)
साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे)
सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)
सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)
सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )
सावित्रीबाई फुले -श्रध्दा (लेखक : मोहम्मद शाकीर)
सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )
सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)
सावित्रीबाई फुले (लेखिका : मंगला गोखले)
सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना. ग. पवार)
’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हे नाटक (एकपात्री प्रयोगकर्ती अभिनेत्री : सुषमा देशपांडे)
ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)
सावित्रीबाई संमेलन/पुरस्कार[संपादन]
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा ’सावित्रीबाई फुले पुरस्कार’. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यास एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ’आदर्श माता’ पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्न पुरस्कार : आदर्शमाता रत्न, उद्योग रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न, जिद्द रत्न, पत्रकारिता रत्न, प्रशासकीय रत्न, वीरपत्नी रत्न, शिक्षण रत्न, वगैरे.
मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)

Wednesday, 21 August 2013

संभाजीराज- एक आदर्श राजा

छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन
झाल्यानंतर 1680
च्या सुमारास संभाजीराजे गादीवर बसले.
तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत (1689) चा हा केवळ
नऊ वर्षांचा काळ
महत्त्वाचा आहे.”
“अवघे तेवीस वर्षांचे वय.औरंगजेब,इंग्रज,
पोर्तुगीज,
सिद्धी अशी गनिमांची संकटे चहूबाजूंनी
स्वराज्याला गिळंकृत करण्यास
आली होती.
मात्र
त्याही स्थितीत संभाजीराजे संकटांवर
केवळ
स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्व
आक्रमकांच्या उरात
धडकी भरवली.
त्या नऊ वर्षांच्या काळात
त्यांनी केवळ स्वराज्याचे संरक्षण केले
नाही तर संवर्धनही केले.
स्वराज्याचा निम्म्या भारतात
विस्तारकेला.
राजपुतांची साथ मिळाली असती तर ते
दिल्लीचे तख्तही ते
काबीज करू शकलेअसते.
ही कामगिरी “केवळ अद्भुत’ म्हणता येईल
अशीच आहे.
जगात
त्याची तुलना होऊ शकत नाही.
उण्यापुऱ्या नऊ वर्षांत एकही पराभव, तह
वा माघार नसलेल्या 240
लढाया त्यांनी केल्या.
सैन्यदल अफाट वाढवले. तंजावर (कर्नाटक),
मद्रास (मदुराई),
पावणकोट, त्रिचनापल्ली (तमिळनाडू),
पाटणा (बिहार), बंगालपर्यंत
फौजा घुसवल्या.
खजिना दुप्पट
केला.
शिवाजी महाराजांच्या राज्याचा
विस्तार पाच हजार किलोमीटरपर्यंत
वाढवला.
नऊ वर्षांत 240 लढाया करणारे युवराज
संभाजीराजे
दिवसाच्या 24 पैकी 20 तास घोड्यावर
असत.
त्यांनी पत्नीला प्रशासकीय
हक्क,अधिकार, स्वतंत्र
शिक्का देऊन राज्य कारभार
करायलाप्रोत्साहन दिले.
स्वराज्याचा स्वतंत्र
दारूगोळा कारखाना काढला.
तरलता तोफखाना काढला. जंजिऱ्याजवळ
पूल बांधला. नवी गावे बसवली.
व्यापारीपेठा बसवल्या. धरणे बांधली.
लढाईमुळे विस्थापित झालेल्यांचे
पुनर्वसनही केले.
आरमार वाढवून दर्यावर हुकमत निर्माण
केली.
चार नवे
किल्ले बांधले.
पराक्रमी सैनिकांना बक्षिसे दिली.
लढाईत
मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची सोय
केली.
हे सारे
करण्यास त्यांना केवळ नऊ वर्षे मिळाली.
वाटते तेवढे सोपे नाही. अद्भुत, अचाट,
अतुलनीयच ठरेल.”
“संभाजीराजांनी शत्रूंवरएवढी जरब
बसवली, की मुअज्जम
आणि शहाबुद्दीन यांनी दोन
बाजूंनी घेरण्याची
व्यूहरचना केली असताना गोवेकरांनी त्यां
करण्याचे
धाडस देखील केले नाही. उलट
संभाजीराजांचा
मार्ग
मोकळा करण्यासाठी त्यांनी राजधानी
बदलली.
मोगलाईला धोका होता म्हणून…
“”मराठ्यांचे स्वराज्य रयतेचं, तर सर्व
शाह्या या बादशहांच्या होत्या.
स्वराज्याचा प्रयोग भारतभर
पसरण्याचा धोका होता
बुंदेलखंड त्याचे उदाहरणहोते.
म्हणून औरंगजेब सर्व ताकदीनिशी स्वराज्य
उद्ध्वस्त करण्यास दक्षिणेत आला.
पण स्वतःचं राज्य समजून
मराठी जनता प्राणपणानं लढली.
संभाजीराजांचं हौतात्म्य
 त्यांच्यासमोर आदर्श होता.
म्हणून औरंगजेबाचं स्वप्न अपुरं राहिलं.
त्याला पुन्हा उत्तरेलाही जाता आलं
नाही. त्याचा महाराष्ट्रातच
अंत झाला....!!
जय शिवराय...
जय शंभूराय...