आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday 17 February 2014

छत्रपती संभाजीराजे

                                       ।।सिंहाचा छावा छत्रपती संभाजीराजे।।



श्री शंभो: शिवजातस्य, मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनो लेखा,वर्तते कस्य नोपरि ||



छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र श्री.संभाजी राजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे.तिचे अंकसेवन करणाऱ्यांचा(आधार घेणाऱ्यांचा) पगडा सगळ्यांवर पडेल.


छत्रपती संभाजीराजे,ज्यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते.आठ भाषांचा जाणकार असणारा हा महाराजा, ज्यांनी 'बुधभूषणम्' हा संस्कृत तर 'नायिकाभेद', 'नखशिख', 'सातसतक' हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले.हा थोर राजा जसा लेखणीतही श्रेष्ठ होता तसा तो रणांगणात श्रेष्ठ होता.बुध्दिमत्ता आणि शौर्य श्रीशंभूराजामध्ये भरले होते.आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट केला,स्वराज्यातील एकही किल्ला गमावला नाही.मराठ्यांचे आरमार शक्तीशाली केले.कर्नाटकातील मराठी राज्य वाढविले,पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांश राज्य जिंकले,औरंगजेबच्या सैन्याची दाणादाण उडविली,असा हा छावा. छत्रपती संभाजीराजे एकाच वेळी मोघल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दीशी लढत होते.


श्री शंभूराजांचे निष्कलंक व्यक्तित्व समजण्यासाठी,शंभूराजांनी लिहिलेला खालील श्लोक पुरेसा आहे.(बुधभूषण,अध्याय दोन,श्लोक ४२२).यात त्यांनी राजाचे सात दोष वर्णिलेले आहेत.


व्यसनादि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् |

सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ||४२२||


हे सात दोष पुढीलप्रमाणे आहेत,वादण्ड,पारूष्य,दुरयातंच,पान,स्त्री,मृगया आणि द्यूत.शंभूराजेंनी राजांना या सात दोषापासून दूर राहावयास सांगितले आहे.


श्रीशंभूराजांनी बुधभूषण या आपल्या संस्कृत ग्रंथात पानापानावर असे विचार मांडलेत.त्याकाळी राजाकडे जनानखाना असणे प्रतिष्ठेचे असताना शंभूराजांनी त्याचा निषेध केला तसेच बहूपत्नीव नाकारले.महाराणी येसूबाईंना स्वतंत्र राज-मुद्रा देऊन राज्यकारभारामध्ये सामील करून घेतले.अशा थोर सेनानीचे कर्तुत्व झाकण्याचा प्रयत्न पेशवेकालीन बखरकारांनी केला.संभाजी राजांच्या कर्तुत्वाचे विकृतीकरण करणारी मल्हार रामराव चिटणीसाची बखर,संभाजी राजांच्या मृत्युनंतर १२२ वर्षांनी,सन १८११ साली लिहिली गेली.मल्हार रामराव चिटणीसाचे खापरपणजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांस संभाजीराजेंनी स्वराज्यद्रोहाच्या आरोपामुळे हत्तीच्या पायी दिले होते,त्यामुळे मनात अढी ठेवून मल्हार रामराव याने बखर लिहिली.आजच्या युगातील काही तथाकथित विद्वान लेखक,नाटककार,इतिहासकारसुध्दा संभाजी राजांच्या कर्तुत्वाचे विकृतीकरण करण्यात आघाडीवर आहेत.संभाजीराजांच्या पराक्रमाविषयी आपण सविस्तरपणे पुढे चर्चा करणार आहोत.


छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स.१४ मे,१६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या 'मातोश्री सईबाईंचे'निधन,संभाजीराजांच्या लहान वयात झाले. त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या कापूरहोळ गावातील 'धाराऊ'राजेंच्या दुधाई बनल्या.लहानपणापासूनच बुध्दिमान असलेल्या संभाजीराजेंनी युध्दाचे डावपेच,राजकारण लवकर आत्मसात केले.

छत्रपती शिवरायांनी संभाजीराजें अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांना आग्रा भेटीसाठी सोबत नेले.आग्रा भेटीवेळी संभाजी राजेंना मोघलांची पंचहजारी मनसबदारी मिळाली होती.त्यामुळे जेव्हा औरंगजेबने कपटाने छत्रपती शिवरायांना कैदेत टाकले त्यावेळी संभाजीराजेंचा,छत्रपतींना खुप उपयोग झाला.


सन १६७४ साली राज्याभिषेकानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले.त्यामुळे संभाजी राजे पोरके झाले.तर छत्रपती राजारामाचा जन्म झाल्यामुळे सोयराबाई संभाजी राजेंकडे दुर्लक्ष करू लागल्या.संभाजीराजे अत्यंत देखणे व शूर होते,त्यांना भ्रष्टाचार खपत नसे.शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील अण्णाजी दत्तोंच्यासारख्या काही लोकांचा भ्रष्टाचार संभाजीराजेंनी उघडकीस आणल्यामुळे ते संभाजी राजेंविरूध्द गेले.शिवरायांनंतर जर संभाजी राजे गादीवर बसले तर आपले काही खरे नाही असे अष्टप्रधानातील भ्रष्ट लोकांना वाटू लागले.त्यामुळे त्यांनी महाराणी सोयराबाईंना फूस लावून शिवरायांनंतर छोट्या राजारामाला गादीवर बसविण्याचे मनोरथ आखले.

छत्रपती शिवरायांनी जेव्हा दक्षिण भारतातील मोहिम आखली,तेव्हा त्यांनी संभाजी राजेंना सोबत नेण्याचा विचार केलेला होता,जेणेकरून संभाजी राजेंना मोहिमेचा अनुभव येईल.पण छत्रपतीसोबत गेल्यावर संभाजी राजेंचे कर्तुत्व शिवरायांच्या नजरेत भरेल व राजे म्हणून ते संभाजीराजेंची निवड करतील असे वाटल्यामुळे, अष्टप्रधान मंडळीनी सोयराबाईंकरवी महाराजांना,संभाजीराजेंना सोबत नेण्यास विरोध दर्शविला.महाराज या सर्वापुढे हतबल झाले व त्यांनी संभाजी राजेंना शृंगारपूरचे सुभेदार म्हणून पाठविले.

शृंगारपूरचे सुभेदार



छत्रपती दक्षिण मोहिमेला गेल्यानंतर अष्टप्रधानांची कारस्थाने सुरू झाली.इकडे शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजीराजेंतील कवी,लेखक जागा झाला. बुधभूषणम् हा संस्कृत तर नायिकाभेद,नखशिख आणि सातसतक हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ त्यांनी याच कालावधीत लिहिले.यावेळी त्यांना कवी कलश यांची चांगली साथ लाभली.शृंगारपूर परिसरात दुष्काळ पडल्यामुळे,रयतेकडून एक वर्ष करवसुली न करण्याचा संभाजीराजेंनी निर्णय घेतला.पण अष्टप्रधानानीं संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिला.संभाजीराजे राज्य चालविण्यासाठी अयोग्य आहेत,असा प्रचार अष्टप्रधान मंडळीनी आरंभिला.तशी पत्रे त्यांनी कर्नाटकात मोहिमेवर असलेल्या छत्रपतींना पाठविली.



आपल्या निर्णयाला स्वराज्यात किंमत नाही,असे समजल्यामुळे संभाजीराजे निराश झाले.अशातच दिलेरखानाने संभाजीराजेंना पत्र पाठवून आपल्याकडे येण्याचा निरोप दिला.मुघलांना मिळून त्यांची गुपीते मिळवावी असा विचार करून त्यांनी मुघलांना सामील व्हायचा निर्णय घेतला.सभासदाच्या बखरीमध्ये याचे पुढीलप्रमाणे वर्णन आहे.'इतकियात संभाजीराजे राजियाचे पुत्र ज्येष्ठ राजियावर रूसून मोघलाईत गेले .'



दिलेरखानाने संभाजीराजेंना ढाल करून भूपाळगडावर हल्ला केला.शत्रूपक्षात संभाजीराजे असल्यामुळे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तसेच इतर मावळ्यांनी शरणागती पत्करली.संभाजीराजेंनी सर्व सैनिकांना सुखरूप जाऊ मागणी दिलेर खानाकडे केली.पण दिलेर खानाने सर्वच सैनिकांचा एक हात कलम करण्याचा आदेश दिला,तसेच त्याने आदिलशाहच्या ताब्यातील अथणीवर हल्ला करून तेथील जनतेचा अनन्वित छळ केला.मोघलांना सामील होऊन आपण चूक केल्याचे संभाजीराजेंना कळल्यामुळे मोघलांच्या तावडीतून निसटून ते विजापूर मार्गे पन्हाळा किल्ल्यावर येऊन दाखल झाले.

छत्रपती शिवरायांची व संभाजीराजेंची ऐतिहासिक भेट


छत्रपती शिवरायांना कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना संभाजीराजे स्वराज्यात परत आल्याची वार्ता समजल्यानंतर ते त्वरेने संभाजीराजेंना भेटावयास पन्हाळा किल्ल्यावर आले.तो ऐतिहासिक दिवस होता १३ जानेवारी १६८०.संभाजीराजेंची पन्हाळा किल्ल्याचा सरसुभेदार म्हणून नेमणूक करून ते रायगडाला परतले.

रायगडावर आल्यानंतर छत्रपतींनी ७ मार्च,१६८० रोजी राजारामची मुंज केली.तर १५ मार्च १६८० रोजी,प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई हिच्याशी राजाराम याचा विवाह केला.

मनात अढी असल्यामुळे सोयराबाईंने संभाजी राजेंना विवाहासाठी बोलाविले नाही. राजारामच्या विवाहानंतर काही दिवसातच,३ एप्रिल १६८० या रोजी महाराजांचे निधन झाले.महाराजांच्या निधनाची बातमी संभाजीराजेंना न कळवता,लहान असलेल्या राजारामला राज्याधिकारी करण्याचे अष्टप्रधान मंडळी व राणी सोयराबाईंनी ठरविले.महाराजांच्या मृत्युनंतर अठरा दिवसांनी,२१ एप्रिल रोजी राजाराम महाराजांचे रायगडावर त्यांनी मंचकारोहन केले.

अष्टप्रधानांची कारस्थाने



राजारामचे मंचकारोहन झाल्यानंतर,प्रधान मंडळीनी सेनापती हंबीररावास,'आम्हास मिळून राजारामाचा कार्यभाग साधावा'असे पत्र धाडिले.हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते त्यामुळे आपल्या भाच्यासाठी ते आपल्या कटात सामील होतील असे प्रधान मंडळीना वाटले.

मोरोपंत,प्रल्हाद निराजी आणि अण्णाजी दत्तो या मंडळीनी संभाजीराजेंना अटक करण्यासाठी रायगडाहून पन्हाळा किल्ल्याकडे प्रस्थान केले.वाटेत कराड जवळ हंबीरराव मोहिते यांना सोबत घेऊन संभाजीराजेंना कैद करावयाचा त्यांचा विचार होता.पण कराडच्या छावणीत आल्यानंतर हंबीरराव मोहितेंनी सर्व मंडळीना कैद करून कोल्हापूरला,पन्हाळा किल्ल्याकडे कूच केली.

संभाजीराजे हेच खरे गादीचे वारस आहेत तसेच मोघलांच्या प्रचंड अशा फौजेशी सामना करण्याची ताकद फक्त संभाजीराजेंकडे आहे,हे हंबीररावांना माहित होते.त्यातच मोघल सुभेदार बहादुरखान स्वराज्याच्या तोंडाशी आला होता.अशा वेळी राजारामला गादीवर बसवून स्वराज्याचा आत्मघात करण्यासारखे होते.या कठीण समयी संभाजीराजेंसारख्या खंबीर राजाची स्वराज्याला आवश्यकता होती. हे जाणून हंबीरमामा सारखा मुत्सद्दी सेनानी संभाजीराजेंच्या बाजूने उभा राहिला.सेनापती संभाजीराजें कडे गेल्यामुळे प्रधान मंडळीचे सर्व कारस्थान धुळीस मिळाले.पन्हाळा किल्ल्यावर मोठ्या उदार मनाने संभाजीराजेंनी या सर्व मंडळीना माफ केले.

संभाजीराजेंचा राज्याभिषेक


पन्हाळा किल्ल्याहून रायगडाला रवाना होताना संभाजीराजेंनी स्वराज्यातील सर्व किल्ल्यावर दारूगोळा,धनधान्य पाठवियाची व्यवस्था केली.किल्ल्याच्या मजबूती- करणाकडे किल्लेदारांना लक्ष द्यावयास सांगून आवश्यक साधनसामग्री प्रत्येक किल्ल्यावर पाठविली.यानंतर संभाजीराजेंनी रायगडाला प्रस्थान केले.रायगडाची जनता आपल्या राजाचं स्वागत करावयास गडावर हजर होती.सन १६ जानेवारी १६८१ साली संभाजीराजेंचा राज्याभिषेक,किल्ले रायगडावर झाला.या प्रसंगी त्यांनी सर्व अष्टप्रधान मंडळीना माफ केले व परत सर्वांना अष्टप्रधानात स्थान दिले.पण काही महिन्याने या मंडळीनी परत बंडाळी केली,तेव्हा कायमची बंडाळी मोडून काढण्यासाठी अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना छत्रपती संभाजींनी सुधागड परिसरात असणार्‍या परली गावात हत्तीच्या पायी दिले.

बुर्‍हाणपुरची मोहिमशत्रू तोंडाला आल्यामुळे ती वेळ स्वस्थ बसण्याची नव्हती.संभाजीराजेंनी लगेच बुऱ्हाणपुरची मोहिम आखली.बुर्‍हाणपुर हे मोघल राजवटीतील सुरतेनंतर असणारे दुसरे सधन शहर होते.त्यामुळे हे शहर लुटून मोघलांचे आक्रमण उधळून लावण्यासाठी,हंबीरराव मोहिते यांनी बुऱ्हाणपुरवर चाल केली.मोघलांचा इतिहासकार खाफीखान यांने या लुटीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे.

बुर्‍हाणपुर शहराच्या बाहेर बहादूरपुरा आणि इतर सात पुरे होते,मराठ्यांनी ते पुरे घेरले.मराठ्यांनी शहरावर इतक्या अनपेक्षितपणे हल्ला केला की,शहरातील लोकांना एक पैसा हलवता आला नाही.देशोदेशीचे जिन्नस,जडजवाहीर,सोने-नाणे,रत्ने यांनी भरलेली बाजारपेठ मराठ्यांनी लुटली.

मोघलांशी लढा


सन १६८१ साली औरंगजेबचा पुत्र शहजादा अकबर,औरंगजेबविरूध्द बंड करून संभाजीराजेंना येऊन मिळाला.मराठ्यांचे राज्य जिंकणे व शहजादा अकबर शासन करणे हे दोन हेतू मनात ठेवून औरंगजेबने दक्षिण मोहिम आखली.प्रचंड सैन्यासह व नामांकित सेनानीना घेऊन त्यांने दक्षिणेला कूच केली.वाटेतील गावागावात विध्वंस करत तो नोव्हेंबर १६८१ च्या सुमारास औरंगाबादला पोहचला.नासिकच्या जवळ असलेल्या रामसेज किल्ल्याला मोघल सेनानी शहाबुद्दीनखानने वेढा दिला.

सिद्दीचा बंदोबस्त


मोघलांचे स्वराज्यावर आक्रमण आले होते याचा फायदा घेऊन सिद्दीने कोकणकिनारपट्टीवर खूप उच्छाद मांडला होता.सिद्दीला मोघल,इंग्रज व पोर्तुगीज यांची मदत मिळत होती.१६८२ मध्ये संभाजी राजांनी सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निश्चय केला.प्रथम संभाजीराजेंनी सिद्दीच्या हबशी मुलखावर हल्ला करून तो जिंकून घेतला कारण सिद्दीला तेथून रसद मिळत होती.



राजापुरी गावातून नजरेच्या टप्यात असलेल्या जंजिरा किल्ल्याला दर्यात बुडविण्याचा विचार करून संभाजीराजेंनी आक्रमण केले.पण किल्ल्याच्या बुरूजापर्यत मराठ्यांच्या तोफेचा मारा पोहचत नसल्यामुळे जंजिराच्या बुरूज शाबूत होता.सिद्दी खैरतने जंजिरा किल्ल्याचा बंदोबस्त मोठा चोख ठेवला होता.सिद्दी खैरताच्या कलाल बांगडी,लांडा कासम,चावरी या मोठ्या तोफांच्या मार्‍यापुढे मराठ्यांची गलबते दर्यात डूबत होती.



अशावेळी संभाजीराजेंनी धाडशी निर्णय घेऊन,ओहटीच्या वेळी समुद्रात भराव टाकून पुल बांधण्याचे ठरविले,जेणेकरून तोफेचा मारा जंजिराच्या बुरूजापर्यंत पोहचेल.समुद्रात काही अंतरावर भराव टाकल्यानंतर मराठ्यांनी आपल्या मोठ्या तोफा काढून किल्ल्यावर मारा चालू ठेवला त्यामुळे किल्ल्याचा बुरूज कोसळून किल्ल्यामध्ये ठिकठिकाणी आग लागली.रात्रीच्या वेळी सिद्दी खैरत व कासम किल्ला सोडून इंग्रजाच्या आश्रयाला मुंबईला पळून गेले.किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असे वाटले असतानाच मोघल सरदार हसन अलिखान कल्याणमार्गे रायगडाच्या दिशेने येत असल्याचे समजल्यामुळे संभाजीराजेंना ही मोहीम अर्धवट सोडावी लागली.पण संभाजीराजेंनी जंजिरा खिळखिळा केल्यामुळे,सिद्दीने पुन्हा मराठी मुलखात पाय टाकायचे धाडस केले नाही.संभाजीराजे एकाच वेळी मोघल,सिध्दी,इंग्रज,पोर्तुगीज यांच्याशी लढत होते.
रामसेजचा ऐतिहासिक लढा


इकडे नासिकच्या जवळ असलेल्या रामसेज किल्ल्याला मोघल सेनानी शहाबुद्दीनखानने वेढा दिला होता.औरंगजेबला वाटले की काही तासातच किल्ला पडेल पण किल्ला जिंकायला त्याला तब्बल साडेसहा वर्षे लागली.या कालावधीत त्यांने वेगवेगळे सेनानी किल्ला जिंकावयास पाठविले.रामसेजचा किल्लेदार सुर्याजी जेधे हा मोठा पराक्रमी होता.मराठ्यांनी हा किल्ला झुंजवत ठेवला.किल्ल्याला घातलेला वेढा मारण्यासाठी रूपाजी भोसले,मानाजी मोरे,हंबीरमामा यांना संभाजीराजेंनी पाठविले.या कालावधीत स्वत: संभाजीराजे यांनी किल्ल्यावर रसद पुरविली.अखेरीस किल्ल्यावरची रसद संपल्यामुळे मराठ्यांनी किल्ला सोडून दिला.

याच सुमारास संभाजीराजेंनी गोव्याचे पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय यांच्याविरूध्द आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला.मराठ्यांचे राज्य जिंकण्यास येत असलेल्या अपयशामुळे औरंगजेबने आदिलशाही जिंकून घेण्याचा विचार केला.
म्हैसूरकर चिक्कदेवराजाचा बंदोबस्त



मराठ्यांची जहागीर एंकोजीरावांनी बेंगलोरहून,तंजावरला हलविल्यापासून म्हैसूरकर चिक्कदेवराजा खूप माजला होता.त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते.रामसेजचा लढा चालू असल्यामुळे औरंगजेब नजीकच्या कालखंडात घाटमाथ्यावर उतरण्याची शक्यता कमी होती.त्यातच पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते.औरंगजेबबरोबरच्या निर्णायक युध्दात कर्नाटक,तामीळ प्रांतातून येणारी रसद महत्त्वाची ठरेल ही संभाजीराजेंनी ओळखले होते.कर्नाटक,तामीळ प्रांतातील जहागीर त्यासाठी शाबूत ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे संभाजीराजेंनी कर्नाटक,तामीळ प्रांतावरील मोहिमेचा बेत आखला.


चिक्कदेवराजाची ताकद पहिल्यापेक्षा वाढल्यामुळे म्हैसूरवर हल्ला करणे संभाजीराजेंना योग्य वाटले नाही.त्यामुळे शत्रूला गुहेतून बाहेर काढून त्याजबरोबर लढावे असा विचार त्यांनी केला.तामीळ प्रांतातील चिक्कदेवराजाच्या ताब्यात असलेल्या त्रिचनापल्लीच्या(सध्याचे त्रिची शहर)पाषाणकोट किल्ल्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.



संभाजीराजेंच्या सोबतीला बसप्पा नाईक हुक्केरी,गोवळकोंड्याचा दिवाण मादण्णा पंडीत तसेच तंजावरच्या एंकोजीरावांच्या सैन्याची कुमक होती.पहाटेच्या सुमारास होडीचा आधार घेत संभाजीराजेंच्या सैन्याने दुथडी भरून वाहणार्‍या कावेरी नदीत घोडी घालून कावेरीचा किनारा गाठला.मराठ्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शहरात अफरातफरी माजली.संभाजीराजेंनी पाषाणकोट किल्ल्यावर जोरदार हल्ला चढविला.गडावरील मदुरेकर नायकाच्या शिबंदीने जोरदार प्रत्युतर दिले.पण शेवटी कवी कलशाच्या नेतुत्वाखालील तिरंदाजांच्या पेटत्या बाणांनी किल्ल्यावरील दारूगोळ्याला आग लागून बुरूज उडाला व शेवटी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.



संभाजीराजेंनी चिक्कदेवराजांकडून मोठी खंडणी वसूल केली.या कालावधीत संभाजीराजेंनी कर्नाटक व तामीळ प्रांतात मोठा मुलूख मारला.या प्रांतातील बावीस किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले.मोठी खंडणी तसेच रसद स्वराज्याला मिळाली.कर्नाटकातील धर्मपुरी-होसूर पासून तामीळ प्रांतातील जिंजी वेलुरापर्यंतचा प्रदेश मराठ्यांच्या घोड्याच्या टापाखाली आला.
संगमेश्वरला दगा


सन १६८५ साली एप्रिल महिन्यात मोघलांच्या सैन्याने विजापूरला वेढा घातला.औरंगजेबचा शहजादा आज्जम यांने हा वेढा आणखी मजबूत केला. विजापूरला वाचविण्यासाठी संभाजीराजेंनी आपले विश्वासू छंदोगामात्य कवि कलश यांना आदिलशाहच्या मदतीस पाठविले.पण अखेरीस १२ सप्टेंबर १६८६ साली विजापूर मोघलांच्या ताब्यात पडले.


आदिलशाही जिंकल्यामुळे आता औरंगजेबला कोणताही शत्रू उरला नाही,त्याने आता पुर्ण शक्तीनिशी मराठी मुलूखावर वेगवेगळ्या आघाड्या उघडल्या.शत्रू अगदी रायगडाच्या पायथ्याशी आला होता.अशातच सन १६८७-८८ साली पडलेल्या दुष्काळाने रयतेचे हाल झाले.संकटे चोहोबाजूंनी आलेली होती,या संकटाच्या समयी स्वराज्यातील अनेक सरदार,वतनाच्या आशेने मोघलांना मिळाले होते. समय खूप कठिण होता अशा वेळी पुढील रणनीती ठरविण्यासाठी संभाजीराजेंनी महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले.यावेळी कोकणात यावयाच्या सर्व वाटांवर संभाजीराजेंनी बंदोबस्त लावला होता.


संगमेश्वरची बैठक संपवून रायगडाला निघतेवेळी,हेरांनी संगमेश्वरवर औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी हल्ला केल्याची बातमी आणली.


त्यावेळी संगमेश्वरला संभाजीराजेंसोबत महाराणी येसूबाई होत्या.अवघे चारशे-पाचशे सैन्य यावेळी राजांसोबत होते.शत्रूने अचानक हल्ला केल्यामुळे मोठी हातघाई झाली.यासमयी येसूबाईंना, धनाजी जाधव व काही सैनिकासह त्यांनी पुढे पाठविले.शत्रुला गुंगारा देण्यासाठी संभाजीराजे,कवि कलश व काही निवडक साथीदार दुर्गम वाटेने गेले. पण सर्वजण पकडले गेले.संभाजीराजेंना त्यांच्या सहकार्‍यांसह पकडून दुर्गम जंगलातील वाटेने नेण्यात आले.वाटेत जाताना ते ओळखू नयेत म्हणून सर्वाचे केस कापले गेले,तोंड बांधले गेले.
संभाजीराजेंची क्रुर हत्या


संभाजीराजे आणि कवि कलश यांची धिंड काढून त्यांना औरंगजेबसमोर हजर करण्यात आले.या घटनेबद्दल मोघलांचा इतिहासकार खाफीखान लिहितो,"संभाजी व कवीकलश यांची धिंड जेव्हा परतली तेव्हा औरंगजेबने आपला दरबार भरवला आणि या कैद्याना दरबारात आणले.त्यांना पाहताच औरंगजेब तख्तावरून खाली उतरला.ईश्वराच्या या उपकाराप्रीत्यर्थ दोन रूकात पढल्या. औरंगजेब गुडघे टेकून ईश्वराची प्रार्थना करीत होता.हे पाहिल्यानंतर कवी कलश संभाजीराजेंकडे पाहून म्हणाला,


'राजन हो तुम सॉंच खरे,खूब लढे तुम जंग।

देखत तव चंडप्रताप जही,तखत त्यजत औरंग।'


हे संभाजीराजा तू सच्चा वीर आहेस,तूच जबरदस्त योध्दा आहेस.तुझा हा प्रचंड पराक्रम बघून स्वत:औरंगजेबाने आपले राजसिंहासन त्यागून तुझ्यापुढे तो नतमस्तक झाला आहे."


संभाजीराजेंच्या मृत्युबद्दल आलमगीर विजय'या फारशी ग्रंथात(हा ग्रंथ औरंगजेबाचा मुख्य न्यायाधिश शेख उल इस्लाम याचा कारकून असलेल्या ईश्वरदास नागर याने लिहिला आहे)पुढीलप्रमाणे लिहिले आहे."बादशाहच्या आज्ञेने,इखलासखान आणि बहादूरखान हे संभाजीराजे,कवि कलश व इतर साथीदारांना घेऊन बादशाहच्या छावणीजवळ आले.बादशाहच्या आज्ञेवरून या सर्वांची उंटावरून धिंड काढण्यात आली.त्यानंतर त्यांना छावणीत आणण्यात आले.इखलासखान आणि हमीदुद्दीन खान यांनी संभाजीराजेंना बादशाहला ताजीम देण्यासाठी सांगितले पण संभाजीराजेंनी त्यांचे ऐकले नाही.संभाजीराजे,कवि कलश व इतर साथीदारांच्या पायात बेड्या ठोकण्याचा बादशाहने आदेश दिला.


बादशाहने रहुल्लाखाना करवी,मराठेशाहीतील खजिनाबद्दल तसेच बादशाहच्या सरदारापैकी ज्यांचे संभाजीराजेशी संबंध होते याची माहिती काढण्याचा खूप प्रयत्न केला पण संभाजीराजेंनी काही ऐकले नाही.अखेरच्या कालखंडात संभाजीराजें,कवी कलश व त्यांच्या सहकार्‍यांचे खूप हाल करण्यात आले.सर्वांनी अन्नाचा त्याग केला होता.शेवटी चिडून जाऊन बादशाहच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील मौजे तुळापूर येथे सर्वांची अत्यंत क्रुर अशी हत्या करण्यात आली.हत्येनंतर संभाजीराजेंच्या शरीराचे अवशेष गोळा करून वढु बुद्रूक येथील रयतेने त्यांची समाधी बांधली.

No comments: