आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday 29 July 2013

बोधप्रद गोष्टी

वयम् पंचाधिकम् शतम


कौरवांनी पांडवांना द्युतात हरवून बारा वर्षे वनवास व एक वर्षे अज्ञातवासात पाठवले होते. पांडव वनवासात असताना त्यांच्या दारिद्रय़ाला हिणवावे आणि स्वत:च्या श्रीमंतीचे प्रदर्शन करावे म्हणून कौरव आपल्या कुटुंबकबिल्यासह पांडव राहत असलेल्या द्वैतवनात जात असत.

एकदा दुर्योधन आपल्या परिवारासह द्वैतवनातील सरोवराकडे जाण्यास निघाला, त्याच वेळी चित्रसेन गंधर्व आपल्या अप्सरांसह त्याच सरोवरात जलक्रीडा करत होता. सरोवराकडे येणार्‍या दुर्योधनाला पाहून गंधर्वाने त्याला तेथे येण्यास अटकाव केला. या अडवणुकीचा दु:शासनाला प्रचंड राग आला. क्रोधमग्नतेतूनच त्याने गंधर्वाना युद्धाचे आव्हान दिले. दोन्ही पक्षांत तुंबळ युद्ध सुरू झाले आणि त्यात गंधर्वाची सरशी झाली. गंधर्वांनी कौरववीरांचा पराभव केला. त्यांच्यापुढे कौरवांची दयनीय अवस्था झाली. यातून आपण वाचणे कठीण आहे, हे लक्षात आल्यावर चार-सहा कौरवसैनिक जीव मुठीत धरून कसेबसे पळ काढीत वनवासात असलेल्या युधिष्ठिरासमोर पोहोचले आणि अक्षरश: त्याच्या हातापाया पडत कुरुकुलाची अब्रू वाचविण्याची विनंती करू लागले. यावर भीम म्हणाला, ''आपण आता काहीही करायचे नाही. सगळ्या कौरवांचा यक्षाच्या हातून नाश होऊ दे. आपोआपच कौरवांचा काटा काढला जाईल. सुंठीवाचून खोकला जाईल.'' पण भीमाचे हे म्हणणे युधिष्ठिराला अजिबात रुचले नाही. तो म्हणाला, ''आपापसात भांडताना आपण पाच विरुद्ध ते शंभर कौरव हे ठीक आहे, पण जेव्हा परकीयांशी मुकाबला करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही एकशे पाच मिळून शत्रूशी मुकाबला करू. शत्रूला चारीमुंडय़ा चीत करू.''

अशा प्रकारे हर त-हेने समजूत घालून युधिष्ठिराने भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या सर्वांना कौरवांच्या मदतीसाठी तयार केले. पांडव गंधर्वांविरुद्ध लढण्यासाठी कौरवांना जाऊन मिळाले आणि कौरवांसह पांडवांनी लढून गंधर्वांना धूळ चारली व शत्रूशी लढताना 'वयम् पंचाधिकम् शतम् !’ हे दाखवून दिले.

अशा प्रकारे आपापसांत कितीही वैर असले तरी परकीयांशी लढताना एकजुटीने लढा देण्याच्या वृत्तीला 'वयम् पंचाधिकम् शतम्' म्हटले जाते.




                                  द्रौपदीची थाळी

पांडवांच्या वनवासाच्या काळातली ही गोष्ट आहे ! राजा धृतराष्ट्र हस्तिनापुरावर राज्य करीत होता. त्यामुळे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याच्याच हातात राज्यकारभार होता, असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याच काळात महर्षि दुर्वास एकदा अचानकपणे कौरवांच्या दरबारात आले. ते जरी आगंतुकपणे (अचानक) आले होते तरी दुर्योधनाने त्यांचा यथास्थित आदरसत्कार केला. त्यांची स्नानसंध्या, भोजन, निद्रा यासाठी उत्तमोत्तम अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे दुर्वास मुनी एकदम तृप्त झाले आणि संतुष्टतेने दुर्योधनाला म्हणाले, ''मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुला पाहिजे तो वर माग.'' यावर दुर्योधन मनातल्या मनात आनंदून गेला. पांडवांना तोंडघशी पाडण्यासाठी या संधीचा उपयोग करायचा ठरवून तो खोटय़ा नम्रतेने म्हणाला, ''मुनिवर, मी यथाशक्ती आपला आदरसत्कार केला. त्यामुळे तुम्ही संतुष्ट झालात ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तसेच त्यामुळे माझ्या पुण्यात देखील भर पडेल हे विशेष महत्त्वाचे आहे. असेच पुण्य माझे बंधू पांडव यांनाही मिळावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. आपण या पुढील मुक्काम वनात रहाणार्‍या माझ्या पांडव बंधूकडे करावा आणि आपल्या शिष्यांसहित सर्वांनी एकवेळच्या भोजनाचा पांडवांकडेही लाभ घ्यावा, एवढीच माझी इच्छा पूर्ण करा.'' 'तथास्तु' म्हणून दुर्वास ऋषी तेथून निघाले. दुर्योधनाला मनातल्या मनात आसुरी आनंद झाला. वनवासातील दरिद्री पांडव काही एवढय़ा लोकांची भोजन आणि आदरातिथ्याची व्यवस्था करू शकणार नाहीत आणि त्यांना दुर्वासांच्या ख्यातनाम रागाचा असा काही फटका बसेल की, पांडवांचे गर्वहरण होईलच. दुर्योधन मनात मांडे खात होता.

दुसर्‍या दिवशी दुर्वास ऋषी त्यांच्या शिष्यगणांसह पांडवांच्या पर्णकुटीत पोहचेपर्यंत दुपारची भोजनाची वेळ टळून गेली होती. ते पोहचता क्षणीच द्रौपदीला म्हणाले, ''मुली, आधीच भोजनाची वेळ टळून गेलीय. आम्ही नदीवरून स्नानसंध्या करून येतो, तोपर्यंत तू भोजनाचा प्रबंध करून ठेव.'' एवढे बोलून ते शिष्यगणांसह नदीवर गेले. द्रौपदी काही बोलूच शकली नाही, पण ती पुरती गर्भगळीत झाली होती. कारण त्यांच्या पर्णकुटीत धान्याचा कणही शिल्लक नव्हता. अशा वेळी शिष्यांसह आलेल्या दुर्वासांची भोजनव्यवस्था कशी करावी या काळजीत ती पडली. शेवटी तिने भगवान श्रीकृष्णाचा आर्तपणे धावा केला. या संकटातून बाहेर पडण्यासाठी फक्त आणि फक्त श्रीकृष्णच आपल्याला मदत करू शकतो, हे तिला माहीत होते आणि काय आश्चर्य, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाला आणि द्रौपदीकडे त्याने भोजनाचीच मागणी केली. ती ऐकून हतबल झालेल्या द्रौपदीने त्याला वास्तव परिस्थिती कथन केली. ते ऐकून कृष्ण म्हणाला, ''जे काही घरात असेल ते आण.'' द्रौपदीने घरभर पाहिले. पण तिला काहीच सापडले नाही. एका थाळीला भाजीचे एक छोटेसे पान चिकटलेले तिला दिसले. तेच तिने कृष्णाला खायला दिले. कृष्णाने ते खाल्ले आणि त्याचे पोट भरून तो तृप्त झाला. एवढा तृप्त झाला की, तृप्तीने एक ढेकर दिला. त्याचक्षणी स्नानासाठी गेलेल्या दुर्वास व त्यांच्या शिष्यगणांनाही पोट तुडुंब भरल्याची जाणीव झाली व ते ढेकर देऊ लागले. त्यामुळे पांडवांकडे परत येण्याचा बेत रहित करून ते पुढच्या प्रवासास निघाले. द्रौपदीने कृष्णपरमात्म्याच्या साहाय्याने संकटावर मात केली.

आजही एखादी गृहिणी घरात साधनसामग्रीची कमतरता असताना पै-पाहुण्यांचे हसतमुखाने आदरातिथ्य करून त्यांना इष्ट भोजनाने तृप्त करते; तेव्हा तिच्याकडे द्रौपदीची थाळी आहे, असे म्हटले जाते.



    व्यवहारात राहूनही अनुसंधान ठेवावे भगवंताशी !



रावणाने सीतेचे हरण केल्यावर रामचंद्र शोक करू लागला. ते पाहून पार्वती शंकराला म्हणाली, ‘‘आपण ज्या देवाचे नाम अहोरात्र घेतो, तो आपल्या बायकोसाठी केवढा शोक करत आहे, ते पाहा ! बर्‍याच वेळा साधी माणसेसुद्धा इतका शोक करीत नाहीत.’’ हे ऐकून शंकर म्हणाला, ‘‘पार्वती ! तू चुकतेस, रामचंद्राचा हा शोक वरवरचा आहे, खरा नाही. भगवंताने मनुष्यदेह धारण केला आहे, त्याला अनुसरून तो वागत आहे.’’ पार्वती म्हणाली, ‘‘आपण म्हणता हे मला खरे वाटत नाही; कारण ‘‘सीता, सीता’’, असे म्हणून राम झाडांना आलिंगन देत आहे. तो सीतेसाठी खरोखर वेडा झाला आहे.’’ यावर शंकर म्हणाला, ‘‘आपण असे करू ! तू सीतेचे रूप घे आणि त्याच्या वाटेत जाऊन उभी रहा. काय होते ते आपण बघू.’’ ठरल्याप्रमाणे पार्वतीने हुबेहुब सीतेचे रूप घेतले आणि रामचंद्र चालले होते त्या वाटेवर जाऊन ती उभी राहिली; पण श्रीरामचंद्रांनी तिच्याकडे लक्षच दिले नाही.

बर्‍याच वेळा पुढे येऊनही ते लक्ष देत नाहीत असे पाहून पार्वती त्याला म्हणाली, ‘‘हे काय ! मी सीता समोर आहे ना !’’ त्या वेळी मात्र श्रीरामचंद्र किंचित हसले आणि म्हणाले, ‘‘जगन्माते तू आदिमाया आहेस. मी तुला ओळखले आहे. तू परत जा.’’ हे शब्द ऐकून पार्वती एकदम लाजली व म्हणाली ‘‘राघवेंद्रा, मी शंकराची आज्ञा घेऊन तुमची परीक्षा पहाण्यासाठी आले होते. मला आता कळले की, आपण साक्षात् विष्णुच आहात.’’

‘आपण शिवाचे म्हणणे ऐकले नाही. रामाबद्दल कुत्सित् बुदि्ध धारण केली. आता शिवाला काय उत्तर देऊ’, असा तिला पश्चात्ताप झाला. ‘‘तू रामचंद्राची परीक्षा घेतलीस ?’’, असे म्हणून स्वतःवरील तिचा अविश्वास जाणून तिचा शिवाने मनापासून त्याग केला. तो कैलास पर्वतावर गेला. मार्गात आकाशवाणी झाली, ‘परमेश्वरा, आपण धन्य आहात. आपली प्रतिज्ञा धन्य आहे.’ पार्वतीने विचारले, ‘‘आपण कोणती प्रतिज्ञा केली होती ?’’ शिवाने विष्णूसमोर केलेली प्रतिज्ञा पार्वतीला सांगितली नाही. ‘पतीने आपला त्याग केला आहे’, हे जाणून दक्षकन्या सती पार्वती शोकसागरात बुडून गेली. इतरांनी तिला इतर अनेक गोष्टी सांगून तिचा शोक दूर केला.

तात्पर्य : ज्या व्यवहारामध्ये आपण आहोत त्याचे सोंग बरोबर बजावले पाहिजे; पण ते आतमध्ये मात्र शिरता कामा नये. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवावे व बाहेर प्रपंचाचे कर्तव्य करावे.’ (श्री गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय, पृ. ६९५)

संदर्भ : शिवपुराण, प्र. न. जोशी.






प्राणिमात्रांविषयी आत्मियतेचा भाव असणारी पार्वती


पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. शंकर प्रगट झाला आणि दर्शन दिले. त्याने पार्वतीशी विवाह करणे स्वीकारले आणि तो अंतर्धान पावला. एवढ्यात काही अंतरावरील सरोवरात एका मगरीने मुलाला पकडले. मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. पार्वतीने लक्षपूर्वक ऐकले, तर तो मुलगा अत्यंत दयनीय स्थितीत ओरडत होता, ‘‘वाचवा .. माझे कोणीच नाही .. वाचवा .. !’’ मुलगा ओरडत आहे, आक्रांत करत आहे. पार्वतीचे हृदय द्रवित झाले. ती तेथे पोहोचली. तिने पाहिले, ‘एका सुकुमार मुलाचा पाय मगरीने पकडला आहे आणि ती त्याला फरफटत नेत आहे.’ मुलगा आक्रंदत आहे, ‘‘माझे या जगी कोणीही नाही. मला ना आई आहे, ना वडील आहेत, ना मित्र आहे. माझे कोणीच नाही. मला वाचवा !’’

पार्वती म्हणाली, ‘‘हे ग्राह ! हे मगरदेवते ! या मुलाला सोडून दे.’’

मगर : दिवसाच्या सहाव्या भागात जो मला मिळतो, त्याला आपला आहार समजून स्वीकार करणे, अशी माझी नियती आहे आणि ब्रह्मदेवाने दिवसाच्या सहाव्या भागात या मुलाला माझ्याकडे पाठवले आहे. आता मी याला का बरे सोडू ?

पार्वती : हे मगर, तू याला सोडून दे. याच्या मोबदल्यात तुला जे पाहिजे ते घेऊन टाक.

मगर : तू जे तप करून शंकराला प्रसन्न केले आणि वरदान मागितले, त्या तपाचे फळ जर मला देत असशील, तर मी या मुलाला सोडू शकते अन्यथा नाही.

पार्वती : हे काय बोलतेस ! केवळ या जन्माचेच नव्हे, तर कित्येक जन्मांच्या तपश्चर्येचे फळ तुला अर्पण करण्यासाठी सिद्ध आहे; पण तू या मुलाला सोड.

मगर : विचार कर, आवेशात येऊन संकल्प करू नको.

पार्वती : मी विचार केला आहे.

मगरीने पार्वतीकडून तपदान करण्याचा संकल्प करवला. तपश्चर्येचे दान होताच मगरीचे शरीर तेजाने चमकू लागले. तिने मुलाला सोडून दिले आणि म्हणाली, ‘‘हे पार्वती, तुझ्या तपश्चर्येच्या प्रभावाने माझे शरीर किती सुंदर झाले आहे, जणू मी तेजःपुंज बनले आहे. आपल्या जीवनभराची कमाई तू एका लहानशा मुलाला वाचवण्यासाठी अर्पण केली !’’

पार्वतीने उत्तर दिले, ‘‘ग्राह ! तप तर मी पुन्हा करू शकते; पण या मुलाला तू गिळले असतेस, तर असा निर्दोष मुलगा पुन्हा कसा मिळाला असता ?’’ पहाता पहाता तो मुलगा अंतर्धान पावला. मगरीसुद्धा अंतर्धान पावली. पार्वतीने विचार केला, ‘मी माझ्या तपाचे दान केले. आता पुन्हा तप करते.’ पार्वती तप करायला बसली. थोडेसे ध्यान केले, तोच भगवान सांब सदाशिव पुन्हा प्रगट होऊन म्हणाला, ‘‘पार्वती, आता का बरे तप करतेस ?’’ पार्वती म्हणाली, ‘‘प्रभु ! मी तपश्चर्येचे दान केले आहे.’’

भगवान शंकर म्हणाला, ‘‘पार्वती, मगरीच्या रूपातही मीच होतो आणि मुलाच्या रूपातही मीच होतो. तुझे चित्त प्राणिमात्रांत आत्मियतेचा अनुभव करते कि नाही, याची परीक्षा घेण्यासाठी मी ही लीला केली होती. अनेक रूपांमध्ये दिसणारा मी एकच्या एकच आहे. मी अनेक शरिरांमध्ये, शरिरांहून वेगळा अशरिरी आत्मा आहे. प्राणिमात्रांत आत्मियतेचा तुझा भाव धन्य आहे !’’

संदर्भ : मासिक ऋषीप्रसाद, फेब्रुवारी २००९.

No comments: