- मन वळवणे श्रेष्ठ -
उत्तरवारा व
सूर्यनारायण यांची अधिक श्रेष्ठ व शक्तीमान कोण, याबद्दल एकदा खूप हमरी-तुमरी झाली.
शेवटी ते सिध्द करण्याचा एक मार्ग त्यांनी निश्चित केला. रस्त्याने जाणा-या एका
प्रवाशाला त्याच्या अंगावरील कपडे काढायला लावण्यात जो यशस्वी होईल तोच श्रेष्ठ व
विजयी होय, असे दोघांनी ठरविले.
पवनराजाने प्रवाशावर
पहिला हल्ला केला. सोसाटयाचा वारा सुटला. वा-याच्या त्या प्रचंड सोसाटयात सापडताच
प्रवाशाने आपल्या अंगावरील कपडे आपल्या शरीराभोवती अधिक लपेटून घेतले. इतकेच नाही,
तर वा-याने जेंव्हा अधिक उग्र स्वरूप धारण केले, तेंव्हा तर त्या माणसाने आणखी एक
वस्त्र आपल्या अंगाभोवती लपेटून घेतले. अखेर कंटाळून जाऊन वा-याने आपण हरल्याचे
कबूल केले, व त्या प्रवाशाला सूर्य नारायण कसे काय वागवतील, ह्या उत्सुकतेने
वायुराज गंमत पाहू लागले...
सूर्य प्रथम उबदारपणे
प्रकाशू लागला, तसा प्रवासी शांत झाला. त्याने बाहेरचे लपेटलेले वस्त्र बाजूस
सारले. हळुहळू आपली प्रखरता वाढवीत सूर्य तेजाने तळपू लागला. अखेर उष्णता असह्य होत
चालली, तसतशी आपल्या अंगावरील सारी वस्त्रे त्या प्रवाशाने एकामागून एक काढून
टाकली. या नंतरही उष्णता आणखी असह्य झाल्यावर तो प्रवासी जवळच्या नदीत अंघोळ
करावयास उतरला.
तात्पर्य- बळजबरीपेक्षा कुशलपणे दुस-याचे मन
वळविणे, हेच जगात अधिक यशकारक असते, हेच खरे. झोटींगांपेक्षा प्रेमदेवताच जगाचा
अधिक लवकर विकास करू शकते.
-दृष्टांचा स्वभाव -
एका धनगराला एक नुकतेच
जन्मलेले लांडग्याचे पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर
वाढवले व मोठे केले.
याचा परिणाम असा झाला
की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग
करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील
होई.
पण गंमत मात्र अशी की,
त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी
भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी.
अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी
गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही
तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा
आनंद लुटी.
धनगर मात्र बेसावध
होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची
बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या
त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले.
तात्पर्य-
वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक
दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.
- तोकड्या दृष्टीचे विचार -
धुळीने भरलेले दोन प्रवासी.
थकलेले. भागलेले. वणवण उन्हामध्ये उघडया रखरखीत रस्त्यावरून चालत होते. डोक्यावर
भयंकर ऊन 'मी' म्हणत होते. इतक्यात रस्त्याच्या कडेला त्यांना एक मोठे झाड दिसले.
मोठया आनंदाने ते तिकडे वळले. त्यांनी झाडाखाली आसरा घेतला. विसाव्यासाठी त्यांनी
तिथेच बसकण मारली. दूरदूर विस्तारलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे तिथे बराच गारवा
होता. प्रवाश्यांचा कासाविस जीव झाडाच्या सावलीमध्ये सुखावला.
विश्रांती घेता घेता तिथे
पहुडलेल्या एकाची नजर झाडाच्या फांदीकडे गेली. तो आपल्या सहप्रवाशाला म्हणाला,
'फुकट हे एवढं मोठ्ठं झाड आहे. फळं धरत नाही. काही नाही. काय उपयोग या झाडाचा
माणसाला? '
ते ऐकल्यावर संतापून झाड म्हणाले,
'किती कृतघ्न रे तूं ! तापलेल्या उन्हातून इथे आलास तो माझा आसरा घेण्यासाठी. या
क्षणी प्रत्यक्ष माझ्या सावलीत बसलेला आहेस, तरीसुध्दा तू मला निरूपयोगी म्हणून
हिणवत आहेस...'
तात्पर्य-
काही काही प्रकारची साधीसुधी सेवा फारच महत्त्वपूर्ण असली तरी तिचा उपयोग
घेणा-यांना मात्र कसलीच कृतज्ञता वाटत नाही.
-एकमेकांना साजेशी -
एकसाप एकदा नदीत पडला.
पुराच्या जोरदार प्रवाहाबरोबर तो वेगाने वाहून चालला होता. तेवढयात एक काटेरी झुडुप
त्याच्याजवळून वाहात चाललेले त्याला दिसले. कसेबसे तो त्याच्यावर चढून बसण्यात तो
यशस्वी झाला आणि मग ते सारे लाटांवर वेगाने खाली वाहात जाऊ लागले.
किना-यावर एक कोल्हा
होता. काटेरी झुडुप व त्याच्यावर चढून बसलेला साप पाहून कोल्हा म्हणाला, 'वा:!
सुंदर! आत बसलेला तो प्रवासी आणि त्याला वाहून नेणारी ती नाव, दोन्हीही एकमेकांना
कशी अगदी शोभून दिसतात!'
तात्पर्य- कधी कधी चांगल्याप्रमाणे वाईट गोष्टीही जगात परस्परांना
साजेशा, शोभून दिसतात.
जगातला मोठा गुन्हा
एका फासेपारध्याच्या
जाळयात एक कवडा सापडला. त्याला पकडून न्यायला तो जेंव्हा जवळ आला, तेंव्हा तो पक्षी
अगदी गयावया करून म्हणाला, 'पारधीदादा जाऊ द्या मला. मी वचन देतो की, तुम्ही मला
सोडलात तर दुस-या कवडयांना जाळयात पकडून देईन मी.'
पारधी त्याच्यावर
ओरडला, 'छे, मग तर मुळीच नाही सोडत तुला. तुझ्यासारख्या विश्वासघातक्याला कशाला
सोडायचं? जो आपल्या निरूपद्रवी मित्रांचा विश्वासघात करू इच्छितो, तो साक्षात
मृत्युपेक्षाही भयंकर!'
तात्पर्य- विश्वासघातासारखा जगात दुसरा भयंकर गुन्हा
नाही.
-आगाऊ कयास बांधावा -
वादळी नि वाईट हवेमुळे
एक शेतकरी आपल्या घरीच कित्येक दिवस अडकून पडला होता. बाहेर जाता येत नाही, अन्न
आणता येत नाही, हे पाहून शेवटी त्याने आपली मेंढरे मारून खायला सुरवात केली.आणखी
काही दिवस गेल्यावर त्याने आपल्या बक-यांचा फन्ना उडवला. आणखी काही दिवसांनी तर
त्याने आपल्या बैलांवरही हात टाकला व आपली भूक भागवली.
हे सारे पाहून त्याचे
कुत्रे एकमेकांत कुजबुजू लागले की, 'पाहिलंत ना सारं, काय केलंन आपल्या धन्यानं
आतापर्यंत? अजून काही विपरित घडलं नाही, तोवरच शहाणपणानं आपली तोंडं काळी करूया
आपण! अरे, जो धनी आपल्याबरोबर श्रम करणा-या बैलांनाही शिल्लक ठेवण्यास तयार नाही,
तो भुकेने पिसाळल्यावर अखेर आपल्यावर देखील हात टाकणार नाही, याची शाश्वती कोणी
सांगावी? चला, आताच पळा!'
तात्पर्य-
जे आपल्या मित्रावरही हात टाकायला नि त्याचा दुरूपयोग करायला कचरत नाहीत,
त्यांच्यापासून सावध राहून नेहमी चार हात दूर असणे बरे! त्यांची ती वरवरची दिखाऊ
नीती नि प्रतिष्ठा संशयास्पद व धोकेबाज समजणे शहाणपणाचे होय!
-देवाची चोरी -
शेतात काम करता करता
एका शेतक-याचे फावडे हरवले. त्याला वाटले, मजुरांपैकी कोणी ते चोरले असावे. त्याने
कसून चौकशी केली, पण कोणीही कबूल होईना. कोणीही काही त्याबाबत माहीत असल्याचेही
सांगेना. तेंव्हा त्या शेतक-याने सा-या मजुरांना घेऊन जवळच्या गावातील मोठया देवळात
जाऊन शपथ घ्यायला लावायचे, असे ठरविले.
ठरल्याप्रमाणे सर्व
मजूरांना घेऊन तो शेतकरी त्या जागृत देवस्थानी गेला. देवळाच्या दारातच दवंडीवाला
दवंडी पिटत होता. थाळी पिटून तो मोठमोठयाने म्हणत होता की, 'लोक हो, ऐका. आपल्या या
जागृत देवस्थानातील देवांचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीची किंवा चोराची
पुराव्यासह जो बित्तंबातमी देईल त्याला कोतवालसाहेब माठे बक्षिस देतील. ऐका हो,
ऐका...'
ती बातमी ऐकून,
शेतक-याला मोठा अचंबा वाटला, आणि तो स्वत:शीच म्हणाला, 'चला, आल्या पावली घरी परत
गेलेलेच बरे. इथल्या देवाला प्रत्यक्ष त्याच्याच देवळातल्या मौल्यवान वस्तू कोणी
चोरल्या ते शोधून काढता येत नाही, तर माझं फावडं चोरणारा चोर, देव कसा काय शोधून
काढेल?
तात्पर्य - देवच दुबळे ठरले तर त्यांच्यावर
भरीभार का टाका? आपल्या प्रयत्नाइतका सामर्थ्यशाली देव दुसरा कोणी
नाही.
चढ आणि उतार
आपल्या छानदार
खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला
होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा
उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच
खाशील.'
बिचारे गाढव गप्पच
राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो
घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला.
आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत
होते.
थकला भागला तो घोडा
असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले.
त्याला पाहताच खोचकपणे
गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं
छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी
पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?...'
तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे
सदैव ध्यानी बाळगावे.
वात्सल्य
एकदा देवांनी जाहीर
केले की, सा-या पशूंमध्ये ज्याचे मूल सर्वात सुंदर दिसेल त्याला एक मोठे बक्षिस
मिळेल. ही सूचना ऐकल्यावर सर्व पशु आपापल्या मुलांना घेऊन प्रतियोगितेंच्या ठिकाणी
हजर झाले. त्यातच एक माकडीण होती. तिच्या हातांच्या झुल्यात ती आपले चिमुकले पिलू
झुलवत होती. नकटया, चपटया नाकाचे, अंगावर केस असलेले ते पिलू मजेशीर दिसत होते.
डोक्याचा कोबीचा कांदाच जणू! एकंदरीत ते ध्यान पाहता सारे पशु खदखदा हसू लागले.
माकडिणीला जाणवत होते
की तिची टर उडवित आहेत. माकडीणीने आपल्या चिमुकल्याला हृदयाशी अधिकच कवटाळून धरले
आणि ती म्हणाली, 'सुंदरपणाचे बक्षिस देवांनी हवे त्याला द्यावे. पण मला मात्र माझे
मूलच सर्वात सुंदर दिसते आणि तेच माझे सर्वात मोठे बक्षिस आहे...'
तात्पर्य - आपले मूल
कसेही असले तरीही प्रत्येक आई त्याच्यावरून सारे जग ओवाळून
टाकते.
आशेची थोरवी
एक भुकेलेला डोमकावळा
एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत.
ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता.
हा डोमकावळा बराच काळ
तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण
विचारले.
डोमकावळयाने कारण
सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस.
आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत
नाही.
तात्पर्य-
केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा.
-मैत्रीच्या मर्यादा -
एका गावाच्या एका
पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली
ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, 'धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात
तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.'
एक दिवस कोळसेवाल्याने
धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, 'या
महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही
होईल!'
'फार फार आभारी आहे.
तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!' धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. 'बाकी सर्व ठीक आहे
हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे
स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ
करा!!'
तात्पर्य- चांगल्या हेतूने
होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात.
-आंधळा सूड -
एका सापाच्या डोक्यावर
एक गांधीलमाशी बसली व दंश करून ती त्याला सतावून सोडू लागली.
साप त्यामुळे अगदी
वेडापिसा झाला. काय करावे व तिच्या तडाख्यातून कसे सुटावे, हे त्याला मुळीच कळेना.
रागारागाने तो तिचा सूड उगवण्यासाठी मार्ग शोधू लागला.
तेवढयात तेथून एक
बैलगाडी जाताना त्याला दिसली. सापाने आपल्या शत्रूला ठार करण्यासाठी तत्काळ त्या
बैलगाडीच्या चाकाखाली आपले डोके ठेवले. त्या चाकाखाली ती गांधीलमाशी चिरडून मेलीच,
पण तिच्याबरोबर त्या सापाचीही सपाटपोळी झाली.
तात्पर्य- आपल्या शत्रूंना
जिवंत ठेवण्यापेक्षा काही लोक त्यांच्याबरोबर स्वत:चाही मृत्यु झालेला पत्करतात.
सूडाने आंधळी झालेली माणसे आत्मघात व समाजघातच करतात. सूडबुध्दीने जगाचे एकूण
अकल्याणच जास्त होते
-गर्वाचे घर खाली -
कोंबडयांवरून जुंपलेल्या
भांडणामध्ये एक कोंबडा खूप जखमी होऊन पराभूत झाला होता. बिचा-याने लाजेने चूर होऊन
एका अडगळीमध्ये तोंड लपविले.
विजयी झालेला दुसरा कोंबडा एका
उंच भिंतीवर दिमाखाने चढला व अगदी उच्च स्वरात त्याने आपण जिंकल्याच्या आनंदात
त्याने एक ललकारी मारली.
त्याला पाहाताच, एका गरूडाने
त्याच्यावर झेप टाकली व त्याला उचलून तो आकाशात उंच उडाला.
पराभूत झालेला कोंबडा तोंड लपवनू
बसलेला असल्यामुळेच बचावला नि अखेर कोणी प्रतिस्पर्धी न उरल्यामुळे निश्चिंतपणाने
त्या कोंबडयांमध्ये खेळूबागडू लागला.
कथासार :
गर्वाचे घर नेहमी खालीच असते. घमेंडीत वावरणा-यांचा सदैव नाश होतो.
-हावरटपणाचे फळ -
एक कोळी होता. रोज
मासे पकडायचे, ते विकायचे, आणि जे पैसे येतील त्यावर उपजीविका करायची असा त्याचा
जीवनक्रम होता. एक दिवस, दिवसभर प्रयत्न करूनही त्याला मासे सापडले नाहीत. शेवटी
संध्याकाळी त्याच्या जाळयात लहानसा मासा सापडला.
तो मासा, कसेबसे श्वास
घेत कोळयाला म्हणाला, 'बाबारे, मी तुझ्याकडे माझ्या प्राणांची भीक मागतो. मी इतका
लहान आहे की, माझी बाजारात काहीही किंमत यायची नाही. कोणी मला खाल्ले तर त्याचे पोट
देखील भरणार नाही. माझ्या शरीराची अजून वाढ व्हायची आहे. कृपा कर. मला पुन्हा
पाण्यात सोडून दे. मी मोठा गरगरीत झाल्यावर माझा मेजवानीसाठी उपयोग होईल. त्यावेळी
मला विकून तुला खूप पैसे मिळतील. आज तू मला सोडून दे.'
कोळी त्या माशाला
म्हणाला, 'उद्याचे कोणी पाहिले आहे? शंकांनी घेरलेल्या उद्याच्या लाभासाठी आजच्या
हातात गवसलेल्या लाभावर पाणी सोडणे अगदी मूर्खपणाचे कृत्य होईल. त्यामुळे मी तुला
सोडू शकत नाही.
तात्पर्य-
झाडातल्या दोन पाखरांच्या मागे लागून, हातातले एक गमावून बसण्यात अर्थ नाही.
संकलन - VIVEK SHELKE
No comments:
Post a Comment