आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday, 29 July 2013

मनाची एकाग्रता वाढण्यासाठी हे करा !

१. ध्यान

कोणत्याही बाहेरच्या किंवा शरीरातील भागावर किंवा क्रियेवर मन एकाग्र करणे यास ध्यान असे म्हणतात. यात शरिरात होणार्‍या निरनिराळ्या संवेदनांकडे तसेच मनात येणार्‍या विचारांकडे साक्षीभावाने पहावे. ध्यानाच्या पुढील अवस्थेत व्यक्ती स्वतःलाही विसरून विचारशून्य अवस्थेत जाऊन आत्मानंद अनुभवते. बुद्धी आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी गायत्रीमंत्र, त्रिबंध प्राणायाम आणि ध्यान हे निश्चितपणे उपयोगी पडतात.


२. नामजप आणि प्रार्थना

सर्वांनाच सर्व वेळी ध्यान लावणे शक्य होईल किंवा जमेल असे नाही. त्यामुळे एकाग्रता वाढवण्यासाठी नामजप आणि प्रार्थना यांचे साहाय्य होते.

२. अ नामजप कोणता करावा ?

आपली कुलदेवी अथवा कुलदेव यांचा नामजप प्रतिदिन कमीतकमी २० मिनिटे करावा. तसेच पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ३० मिनिटे करावा.

२. आ प्रार्थना कोणत्या कराव्यात ?

१. ‘हे कुलदेवते, तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर राहू दे.’

२. ‘हे बुद्धीदाता श्री गणेशा, माझा अभ्यास चांगला होण्यासाठी मला शक्ती आणि सद्बुद्धी दे.’

विद्यार्थ्यांनो, अभ्यासाचे योग्य वेळापत्रक करा !

१. वेळापत्रक का करायचे ?

महत्त्व आणि लाभ

* प्रत्येक कृती नियोजन करून केल्यामुळे ध्येय साध्य करणे सोपे होते.

* ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नांत शिस्त आल्याने प्रयत्नांची सुलभता वाढते.

* विविध विषयांच्या अभ्यासाची समयमर्यादा ठरवल्याने मनावरचा ताण हलका होतो आणि एका विषयाचा अभ्यास करतांना दुसर्‍या विषयाचे विचार मनात येत नाहीत.

* नियोजन केल्याने विचारांचा गोंधळ होत नाही.

* विचारांत सुस्पष्टता आल्याने मन शांत राहून वेळ आणि मनाची ऊर्जा वाया जात नाही.

* आत्मविश्वास वाढतो.

* ध्येयनिश्चितीची खात्री पटते !

२. वेळापत्रक करतांना पुढील गोष्टी ध्यानात घ्या !

* सर्व विषयांना योग्य पद्धतीने प्राधान्य द्या.
उदा. प्रत्येक विषयाच्या सिद्धतेला स्वतःला लागणारा वेळ लक्षात घेऊन हा प्राधान्यक्रम बदलेल.

* परीक्षेच्या ऐन वेळेपर्यंत अभ्यासाचे नियोजन न करता काही काळ विषयांच्या सरावाकरता ठेवा.

* नियोजन करतांना सलग खूप वेळ अभ्यास न करता मध्ये मध्ये वैयक्तिक आवरणे, जेवण-न्याहारी, विश्रांती, व्यायाम, दैनिक वाचन, नामजप इ. गोष्टी करण्याचे नियोजन करा.

* सर्वसाधारणपणे २० वर्षांचा सामान्य क्षमतेचा विद्यार्थी सलग दोन तास एकाग्रतेने अभ्यास करू शकतो. त्यानंतर एक तास इतर गोष्टींसाठी ठेवू शकतो. अशा पद्धतीने दिवसातून १० तास अभ्यास सहज होतो.

* सर्व दैनंदिन गोष्टींसाठी योग्य तो वेळ देऊन नियोजन करा !

* समयमर्यादा ठरवतांना प्रत्येक गोष्टीसाठी पुरेसा वेळ द्या !

* नियोजनातील प्राधान्य बदलावे लागले, तर त्याची सिद्धता ठेवा !

* इतरांनी केलेल्या नियोजनांचा अभ्यास करा !

* इतरांच्या नियोजनाची तुलना न करता त्यातील आपल्याला शक्य असणार्‍या गोष्टी स्वीकारा !

* केलेले नियोजन पालकांना दाखवून घ्या आणि त्यांच्या सूचनांचा विचार करा !

* नियोजन हे केवळ आपल्या सोयीसाठी आहे, हे ध्यानात घ्या !

* काही वेळा ऐनवेळी नियोजन बदलून वेळेची जुळवाजुळव करावी लागल्यास ते स्वीकारा !

संदर्भ: सनातन-निर्मित-ग्रंथ, ' अभ्यास कसा करावा? '

घरी आलेल्यांचे स्वागत कसे कराल आणि त्यांना निरोप कसा द्याल ?

घरी पाहुणे किंवा अतिथी आल्यावर कसे वागणे टाळले पाहिजे ?

आपल्याकडे बर्‍याचदा आई-बाबांच्या ओळखीच्या व्यक्ती घरी भेटायला येतात. सध्या घरी भेटायला कोणी आले, तरी मुले सोफ्यावर बसून दूरदर्शन बघत असतात. त्यांचे अधिक लक्ष दूरदर्शनकडे असल्याने पाहुण्यांकडे नसते. पाहुणे उभे असले, तरी मुले बसून असतात, अजिबात उठत नाहीत. दूरदर्शनच्या मोठ्या आवाजामुळे पाहुणे आणि आई-बाबा यांना बोलतांना अडथळा येत असतो. त्यामुळे आई-बाबा आपल्याला दूरदर्शन बंद करून आत जाण्यास सांगतात किंवा दूरदर्शनचा आवाज हळू करण्यास सांगतात. तेव्हाही काही मुले ‘काय आहे’, असे उद्धटपणे खेकसतात.

घरी आलेल्या पाहुण्यांविषयी भाव कसा असावा ?

संस्कृतमध्ये ‘अतिथी देवो भव ।’ असे म्हटले आहे. याचा अर्थ अतिथी हे देवाचेच रूप आहे. ‘अतिथीच्या रूपाने देवच आपल्याकडे आलेला असतो’, अशी हिंदु धर्माची शिकवण आहे. धर्माच्या शिकवणीनुसार पाहुण्यांचा आदर आपण केला पाहिजे. त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य चांगल्या पद्धतीने केले पाहिजे.

घरी पाहुणे किंवा अतिथी आल्यावर
त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य कसे करावे?

१. घरी आलेल्या पाहुण्यांना लगेच उठून नमस्कार करून स्वागत करावे.

२. पाहुणे उभे असतांना त्यांच्यासमोर बसू नये.

३. त्यांना बसायला जागा करून द्यावी.

४. पाहुणे बसल्यावरच आपण बसावे, तोपर्यंत उभे राहावे. यातून आपली नम्रता वाढते आणि त्यांच्याप्रतीचा आदर व्यक्त होतो.

५. पाहुणे बाहेरून दमून आलेले असतात, त्यामुळे त्यांना लगेच पाणी द्यावे.

६. त्यांच्याशी हसतमुखाने आणि प्रेमाने वागावे.

७. आई-बाबांनी त्यांच्यासाठी चहा, कॉफी किंवा सरबत बनवायला सांगितले, तर ते लगेच बनवावे.

८. आई-बाबा पाहुण्यांशी बोलत असतांना आपण मधेच वेगळ्या विषयावर बोलून त्यांच्या चाललेल्या विषयात व्यत्यय आणू नये.

९. पाहुणे जाण्यासाठी उभे राहिले की, आपणही लगेच उभे राहावे.

१०. पाहुण्यांना निरोप देतांना त्यांच्यासोबत दोन पावले चालून बाहेर जावे.

अशा प्रकारे अतिथींमध्ये देवाचे रूप पाहून त्यांचे आदरातिथ्य करावे. अतिथींचे आदरातिथ्य करतांना त्यांच्यातील देवासाठीच सर्व करत आहोत, असा भाव ठेवून करावे, त्यामुळे आपल्याला त्यांच्यातील देवत्वाचे आशीर्वाद मिळतात. हिंदु धर्मामध्ये सांगितलेल्या ‘अतिथी देवो भव ।’ या शिकवणीचे आचरण करून आनंद मिळवावा !

वर्गात ‘ऑफ’ तासाला (मोकळ्या तासाला) काय कराल ?

मित्रांनो, वर्गात आठवड्यातून एखादा तरी ‘ऑफ’तास तुम्हाला मिळतो ना ? काय करता तुम्ही या तासाला ? काय, वर्गात धमाल करता ? कॅन्टीन’मध्ये गप्पा मारत बसता ? ...अजून काय करता येईल, असे विचारतांय, तर सांगतो - या तासाला स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक यांची चरित्रे वाचा ! जगातील अन्य कोणत्याही देशातील क्रांतीकारकांना सुचली नसतील, अशी साहसे भारताच्या क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात करून दाखवली आहेत. ही त्याची काही उदाहरणे -

१. स्वा. सावरकरांनी विशाल सागरास अन् आकाशास साक्ष ठेवून नौकेवरून भर समुद्रात उडी मारली.

२. साँडर्सवध प्रकरणी पकडले गेल्यावर ब्रिटीश शासनाच्या अन्यायाच्या विरोधात ६३ दिवसांचे उपोषण करून जतिंद्रनाथ दास यांनी मृत्यूला कवटाळले.

३. आई-वडील, पत्नी अन् मुलगा यांना हिंदुस्थानातच सोडून गेलेल्या मदनलाल धिंग्रा यांनी २५ व्या वर्षी इंग्लंडमध्येच कर्झन वायलीला गोळ्या घातल्या.

४. ब्रिटिशांच्या विरोधातील मिरवणुकीत भाग घेतला म्हणून १५ वर्षांच्या चंद्रशेखर आझाद यांनी पाठ रक्तबंबाळ होऊनही ‘हूं कि चू’ न करता वेताचे १५ फटके खाल्ले.

एक नाही, दोन नाहीत, असे शेकडोंनी प्रसंग इतिहासाच्या पानापानावर अंकित आहेत अन् तुम्हाला सांगत आहेत, ‘यापुढे ‘ऑफ’ तासाला धमाल बंद; कॅन्टीन, कॉलेज कट्टा, कॅम्पस येथे वेळ वाया घालवणे बंद... सर्व बंद. या वेळेत देशाच्या क्रांतीकारकांनी दिलेला रोमहर्षक लढा वाचा !’

अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?

आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना प्रश्नोत्तरे पाठ करायला सांगतात. पुढे जाऊन घोकंपट्टीची सवय घातक पडू शकते. पाठ केलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा लक्षात राहत नाही. तिथे विषयाचा आवका मोठा असतो. त्यामुळे विषय समजावून घेणं, विषयातील महत्त्वाच्या मुद्यांसाठी पेन्सिलनं अधोरेखित करणं, महत्त्वाच्या मुद्याचे टिपण तयार करणं तसेच त्याचे उपयोजन करणं, या गोष्टी अभ्यासाच्या तंत्राच्या दृष्टीनं उपयोगी ठरतात. अभ्यासाच्या तंत्राची सवय लहानपणापासून लागली, तर महाविद्यालयात विषयाच्या नोटस् स्वत: काढता येतात. गाईड वाचण्याऐवजी स्वतच्या नोटस् चांगल्या लक्षात राहतात. गाईडमध्ये प्रश्नांची उत्तरांची पुनरावृत्ती झालेली असते. पाठय़पुस्तकाच्या तुलनेत गाईड वाचायला वेळही जास्त लागतो. पाठय़पुस्तक वाचनाची सवय झाल्यावर पाठय़पुस्तक वाचायला कमी वेळ लागतो.
अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?

१) शाळेत नवीन धडा शिकवण्यापूर्वी मुलांना वाचायला सांगा.

२) धडा शिकवून झाल्यावर शिक्षकांना प्रश्न विचारून शंकेचे निरसन करणं गरजेचं आहे. याबद्दल मुलांशी बोला.

३) घरी पुन्हा धडा वाचायला सांगा.

४) त्यानंतर महत्त्वाच्या मुद्यांच्या नोटस् तयार करायला सांगा.

५) परीक्षेच्या वेळी स्वतच्या नोटस् वाचण्याकडे मुलांचा कल हवा.

६) प्रश्न-उत्तराचा सराव करताना लिहून काढायला सांगा.

७) लिहिलेले दीर्घकाळ स्मरणात राहते.

अभ्यास करताना पिक्चर ज्या आवडीनं पाहतो, त्या आवडीनं झोकून देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे.

हे स्वानुभवाचे बोल आहेत. माझ्या मुलांनी अभ्यासक्रमासाठी ही पद्धत अनुसरली होती. त्यामुळे नोकरीला लागल्यावर शालेय पाठय़पुस्तकातील अभ्यास त्याच्या मनात ताजा आहे. अभ्यास करताना पालकांनी टीव्ही बंद करून पाल्याजवळ बसलं म्हणजे त्यांची एकाग्रता साधली जाते. बराच वेळ आई-वडील आपला अभ्यास घेतात. ही भावनिक सुरक्षितता पाल्यासाठी यशदायी ठरते.

- प्रा. कुंदा कुलकर्णी, नाशिक