आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Sunday, 2 December 2012

प्राणी जगत

                                       वाघ
 
 
वाघाचे नाव ऐकताच अंगावर काटा येतो नाही का? अतिशय बलवान परभक्षी असलेला वाघ हा मार्जार या सस्तन प्राण्यांच्या प्रवर्गातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाची सरासरी लांबी साडेचार फूटापासून साडेनऊ फुटापर्यंत लांब असते आणि वजन २०० ते ६०० पौंड इतके असते. याचा रंग मु़ख्यतः नारंगी असून संपूर्ण शरीरावर काळ्या रंगाचे पट्टे असतात तसेच छाती, चेहरा व आतल्या बाजूस काहीसा पांढरा रंग दिसून येतो. आजतागायत वाघाच्या आठ उपजातींची नोंद करण्यात आली आहे. मात्र यांतील तीन जातींचे वाघ अवैध शिकारीमुळे साल १९५० पासून नजरेस पडलेलेच नाहीत. या बेपत्ता जातींमध्ये कॅस्पीयन, बाली व यावान वाघांचा समावेश आहे. उर्वरित पाच जातींची परिस्थीती सुद्धा यापेक्षा फार काही वेगळी नाही. या उर्वरीत जातींमध्ये सायबेरीयन, बंगाल, इंडो-चायनीज, दक्षिणी चीन व सुमात्रीयन वाघांचा समावेश आहे. एकेकाळी पश्चिमी-पूर्व तुर्कस्तानापर्यंत वाघ आढळत असे मात्र गेल्या काही काळात वाघाचे अस्तित्व हे ठरावीक आशियाई क्षेत्रापर्यंत मर्यादित राहीले आहे. चामड्यासाठी शोभेच्या वस्तूंसाठी तसेच हौसेखातर केली जाणारी शिकार, जंगलांचे कमी होत चाललेले प्रमाण, नैसर्गीक अन्नस्त्रोताचे कमी होणारे प्रमाण ही कारणे त्यामागे आहेत.
वाघ हा एकटा राहणारा प्राणी असून मुख्यतः रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतो. त्याच्या प्रमुख भक्ष्यांमध्ये हरण तसेच इतर पशू, मगरी, वानरे, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे इत्यादींचा समावेश होतो. वाघ हा सडलेले मांस सुद्धा भक्षण करतो इतकेच नाही तर पचन नीट होण्यासाठी औषध म्हणून तो कधीकधी गवत खातानासुद्धा आढळला आहे.
सध्या वाघांच्या संख्येतली वाढती घट पहाता. अनेक राष्ट्रांनी 'सेव्ह टायगर्स' मोहीमा सुरु केलेल्या दिसून येतात. आपल्या भारतामध्येच अनेक वाघ्र्यप्रकल्प सुरु करुन वाघांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेल्या या प्राण्याच्या संवर्धनाची तसेच संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकानेच उचलायला हवी तरच हा देखणा आणि साहसाचे प्रतिक असलेला प्राणी वाचण्यास मदत होईल अन्यथा येणार्‍या पिढीस आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ कसा होता? हे पुस्तकांतूनच वाचण्याची पाळी येईल.
टिप- भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाची भारतातील संख्याच १४११ इतकी नगण्य आहे आणी दिवसेंदिवस त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घट होत आहे.



भारतीय सारंग किंवा माळढोक पक्षी


सुमारे एक मिटर उंचीचा माळढोक पक्षी हा मोठा रुबाबदार पक्षी आहे. जवळ जवळ छोट्या शहामृगाच्या आकाराचा हा पक्षी वजनदार असतो. माळढोक नराचे वजन १० किलो तर मादीचे ५ किलो असते. बाजूने काळे असलेले त्याचे बदामी रंगाचे पंख, डोक्यावार असलेला काळा मुकूटासारखा तुरा, लांब पांढरी मान व तशाच रंगाचे शरिराच्या खालच्या बाजूचा भाग अशी त्याची शरीर रचना असते. मादी नराहून लहान असते व नर हा अधिक रुपवान असतो.
माळढोकला चांगले उडता येते मात्र उडण्यासाठी त्यास १५-२० फुट पळत जावे लागते व नंतर तो आकाशात झेप घेतो, पण तो खुप उंचावरुन उडत नाही. मादी एकावेळी एकच अंडे देते. महिन्याभरात अंड्यातून पिल्लू बाहेर पडते, त्याला उडता यायला पाच महिने लागतात. एका वर्षात त्याची संपुर्ण वाढ होते. मात्र मादी एका वेळी एकच अंडे देत असल्याने या पक्ष्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढत नाही. घार, गरुड सारखे शिकारी पक्षी, मंगूस, घोरपड, साप हे प्राणी अंडी खातात तसेच गुरांच्या पायाखाली ही अंडी तुडवली जातात.
हा पक्षी दोन्ही प्रकारचा आहार घेतो. करवंद, बोर, तुरे तसेच मांसाहारामध्ये किटक, अळ्या, टोळ, पाली, उंदीर, लहान साप हे त्याचे प्रमुख अन्न आहे. माळढोक हा खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचा मित्र आहे. तो थव्याने वास्तव्य करतो. माळढोकच्या जगात एकूण २२ उपजाती आहेत. यातील भारतात आढळणार्‍या तिन उपजाती म्हणजे मोठा माळढोक, तणमोर व बंगाली तणमोर या आहेत. हा सारंग कुळातला पक्षी आहे.
एकेकाळी बंगाल, आसाम व म्हैसुरचा दक्षिण भाग वगळता भरतात सर्वत्र ते आढळत मात्र आता ते राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रातील अहमदनगर तसेच सोलापूर जिल्ह्याती रुक्ष व सौम्य भागात दिसून येतात.
माळढोकच्या राहण्याच्या ठिकाणाचा नाश, मांसासाठी केली गेलेली शिकार यामुळे ते आता दुर्मिळ झाले आहेत. काही वर्षापूर्वी भारत सरकारच्या वन्यप्राणी संघाने त्याचा दुर्मिळ पक्ष्यांच्या यादीत समावेश केला. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गाला लागला मग १९७९ साली अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात काही चौ.कि.मी. वनक्षेत्रात माळढोक पक्षी अभयारण्याची स्थापना करण्यात आली. आज येथे माळढोक सुरक्षीत आहेत.

                                             पेंग्वीन
                अंटार्टीक खंडात आढळणा-या पेंग्वीन पक्षांमधील सर्वात जास्त परिचीत अशी ही पेंग्वीन पक्षांची जमात आहे. ही जमात इतर पेंग्वीन पक्षांच्या तुलनेत आकाराने लहान असुन ते त्यांच्या एकत्रीत समुदयासाठी प्रसिध्द आहेत. या समुदयाची संख्या २०,००० पेक्षा जास्त असु शकते. समुद्रालगत असलेल्या खडकाळ प्रदेशात घरटे तयार करुन हे पक्षी जोडपी करुन राहतात. प्रसुतीकाळात मादा पेंग्वीन दोन हलक्या वजनाची अंडी देते आणि या नंतर सर्व जोडपी अंड्यांची सुरक्षा समुद्रातील मोठ्या पेंग्वीन्सना करण्यास देऊन अन्न मिळवण्यासाठी परत मार्गस्थ होतात. या पेंग्वीन्सचा रंग सामान्य पेंग्वीन पक्षांसारखाच असतो. पांढ-या रंगाचा पोटाकडील भाग व काळ्या रंगाचा पंख, डोके व पाठीकडील भाग असे यांचे बाह्य रुप असते. उंची सामान्यतः ४६ ते ६१ सेमी व वजन ४.५ ते ५ कि.ग्रॅ. इतके असते. आणि सरासरी नर व माद्यांमध्ये सारखीच असते. या जमातींची लोकसंख्या अत्यंत स्थिर तसेच सुरक्षीत आहे किंबहुना ती वाढत आहे. ताज्या अहवालानुसार यांची संख्या ३ कोटीच्या आसपास असावी. या पक्षांचा अन्नप्रवास समुद्रातील कोळंबी तसेच इतर मासे असल्याने जेथे मासे विपुल प्रमाणात असतात त्या ठिकाणी या पक्षांचा जास्त वावर असतो.                                 

No comments: