आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday 14 September 2012

balgeet

बाळ आणि तै
(पुरंदरे शशांक)

"मी जर आहे बाळाची ताई
बाळाला माझ्याकडे दे की गं आई "

"हो तर ताई
रुसु नका बाई
अजून हे बाळ छोटं कि नै
मान पण नीट धरतंच नै

मोठ्ठं होईल जरासे किनाई
हाकही मारेल तुला ते "ताई"

मग काय मजा ताईची बाई
बाळ आणि तै, बाळ आणि तै
आम्ही तर मधे कुणीचच नै"

 
 
 
मन्नी मन्नी आमची माऊ
येताय का कडे भुर्र जाऊ

कश्शी खुलली कळी आता
भुर्रचं नुस्तं नाव काढता

हात पसरुन लगेच तयार
मन्नी आमची कस्ली हुशार

थांब जरा बदलुंदे फ्रॉक
लग्गेच नकोय नाकावर राग

वाजता सँडल बघते कश्शी -
'नेणारे मला का निघ्घाली तश्शी '....
 
 
 
 
 
महाराज (महाराणी)

- पुरंदरे शशांक
भुर्भुरते जावळ नि
छान छोटे नाक
बसत नाहीत अजून जरी
तोच केवढा धाक

रडून सांगतात महाराज (महाराणी)
आई ऊठ ऊठ ऊठ
कसे कळते आईला
लागलीये यांना भूक

जर्रा जवळ जाताच
कसे हात काढतात
भुर्रर घेऊन चला जरा
हुकूम थेट सोडतात

दुपटं जरा ओलं होता
बिघडून जातो नूर
घरदार डोक्यावर
काढतात महा सूर.....

 
 
 
मी नाही घरात बसणार आई ऽऽऽ.....
मी तर पावसात खेळणार खेळणार

होड्या मस्त सोडणार सोडणार
डोलताना छान त्या बघणार बघणार

टपोरे थेंब झेलणार झेलणार
गा-या गा-या भिंगो-या खेळणार

लाल लाल पाण्यात नाचणार नाचणार
उडूं दे चिखल मातीच असणार

सर्दी ताप नाही घाबरणार
आल्याचा चहा पिणार पिणार

पावसाची छान लागलीये झड
बोलावते मला चल लवकर

तू पण ना आई भितेस कशाला
पावसात ये तू काही नाही होणार
मी नाही घरात बसणार आई ऽऽऽ.....
मी तर पावसात खेळणार खेळणार....


-shashaank purandare.
 
 
 
 

No comments: