आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday, 1 October 2016

घटस्थापना


श्रीघट स्थापना व नवरात्र माहिती 

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्र म्हटली जातात.

आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात.

ह्या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख, शांती अन्‌ समाधान लाभते.
नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात.
ह्या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.
ही शक्ती देवता देशभरांत अन्‌ वेगवेगळ्या भागांत विविध नावांनी ओळखली जाते. 

देवी कां प्रकट झाली? कशासाठी अन्‌ कशी प्रकट झाली? ह्या बद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी :

पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस फार माजला होता. त्यानं देवदेवता, ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होतं. तो सर्वांनाच फार त्रास देत होता.
तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली.

त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.

देवीची नऊ रूपे

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.

व्रत करण्याची पद्धत-
नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.

अ. घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी.

आ. नवरात्रमहोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील मृत्तिका आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत.

इ. मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात.

ई. सप्तधान्ये आणि कलश (वरुण) स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी.

उ. नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते.

ऊ.अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रमहोत्सव साजरा करावा.

नवरात्रातील नऊ माळा

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.

पहिली माळ-शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ

दुसरी माळ-अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढर्याआ फुलांची माळ.

तिसरी माळ-निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.

चौथी माळ-केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

पाचवी माळ-बेल किंवा कुंकवाची वाहतात.

सहावी माळ-कर्दळीच्या फुलांची माळ.

सातवी माळ-झेंडू किंवा नारिंगीची फुले.

आठवी माळ-तांबडी फुले. कमळ,
 जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.

नववी माळ-कुंकुमार्चनाची वाहतात.

अखंड दीपप्रज्वलन करणे

           दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे :

      नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी

ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

 कुमारिका-पूजन कसे करावे ?

१. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. `नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी `नऊ'' या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.

२. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे.

३. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.

४. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.)

५. कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.'

रोज सकाळी आणि संध्याकाळी 
देवीची आरती व भजन करून श्री भगवतीचे चिंतन करावे .

मोहनदास करमचंद गांधी(राष्ट्रपिता)

*मोहनदास करमचंद गांधी*

जन्म: ऑक्टोबर २, इ.स. १८६९
पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत

मृत्यू: जानेवारी ३०, इ.स. १९४८
नवी दिल्ली, भारत

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस

पुरस्कार: टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती

प्रमुख स्मारके: राजघाट

धर्म: हिंदू

प्रभाव: लिओ टॉलस्टॉय
जॉन रस्किन
गोपाळ कृष्ण गोखले

पत्नी नाव: कस्तुरबा गांधी
अपत्ये: हरीलाल
मणिलाल
रामदास
देवदास


मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.[ संदर्भ हवा ] नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

 १९१५ मध्ये असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यानी खेड्यांना खर्‍या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विसटर्न चर्चिल याने त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.

ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली, गांधीजींची "अर्धनग्न फकीर" म्हणून कुचेष्टा केली होती. (It is alarming and also nauseating to see Mr. Gandhi, a seditious Middle Temple lawyer of the type well-known in the East, now posing as a fakir, striding half naked up the steps of the Viceregal palace to parley on equal terms with the representative of the King-Emperor.) त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधीजीनी हिंदू मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्‍न केले.

२ ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून पाळला जातो.

गांधींचे तत्त्वज्ञान निव्वळ पुस्तकी नव्हते तर ते उपयोगितावादात्मक (प्राप्त परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वांचे आचरण करणारे) होते.

Thursday, 15 September 2016

गोकुळाष्टमी


गोकुळाष्टमी
          कृष्णपक्ष्याच्या अष्टमीच्या चंद्राप्रमाणे एका पायावर भार देऊन , पाय वाकडा ठेऊन, शरीराला कमनीय वळण देऊन उभा राहिलेल्या मुरलीधराने ज्या दिवशी संसारात प्रथम पदार्पण केले तो दिवस इतिहासात अमर झाला आहे. मेघांच्या गडगडाटात, विजेच्या कडकडाटात ,मुसळधार पाऊस पडत आहे अशा वेळी श्रीकृष्णाचा जन्म झाला .जेव्हा जीवनात अंधार दाटतो , निराशेचे उदास वातावरण पसरते , आपत्तींचा पाऊस पडतो ,खूप दुखः येते त्यावेळी भगवान श्री कृष्ण जन्म घेतो. अंधारात जेव्हा प्रकाश किरण दिसतात , उष:कालचा सूर्य जेव्हा स्वतःची आभा पसरवतो त्यावेळी सर्वांचे हृदय पुलकित होते .   
           मुक्तीदात्या, गीतेच्या उद्गात्या , लोकांना तारणाऱ्या अशा उद्धारक कृष्णाचा जन्म झाला त्यावेळी सर्व लोक दुखः संताप विसरून आनंदोल्लासात नाचले आणि तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून प्रसिद्ध पावला. कृष्ण गोकुळात जन्मला . गोकुळ म्हणजे हे शरीर . ‘गो’ म्हणजे इंद्रिय व ‘कुळ’ म्हणजे समुदाय .या इंद्रियांचा समुदाय जेथे आहे ते गोकुळ . भारतात अनंत अवतार झाले .अशा भारत देशातील रत्नात शोभणारा कौस्तुभमणी म्हणजे भगवान श्रीकृष्ण ! सर्वच दृष्टींनी कृष्ण पूर्णावतार आहे .त्यांच्या जीवनात कोणत्याही ठिकाणी नावे ठेवायला जागा नाही .एकही स्थान असे नाही कि जेथे उणीव दिसेल. अध्यात्मिक , सामाजिक नैतिक किंवा दुसऱ्या कोणत्याही दृष्टीने पहिले तरी कृष्णासारखा समाज उद्धार करणारा दुसरा कोणी झालेला नाही. अध्यात्म आचरावे तर भगवान श्रीकृष्णाचेच . कृष्णाने सामान्य माणसांना समजावले , खिश्यात भले दिडक्या नसतील पण तेजस्वीपणे व निष्ठेने एकत्रित होऊन श्वास सोडला ,तर जग बदलून जाईल .
              भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे जीवन एवढे सुंदर व सुगंधित बनवले होते कि , जो कोणी त्यांच्याकडे पाहिलं त्याला तो आपला वाटत होता . सर्वांना त्याच्यावर प्रेम करण्याचा उमाळा येत होता. रोज तोच सूर्य उगवतो पण केवढा आनंद होतो ! पक्षी तेवढ्याच आनंदाने किलबिलाट करतात . गोकुळाष्टमी तशीच प्रत्येक वर्षी येते पण केवढा आनंद देते ! कृष्णाचे जीवन तसच आहे .गोकुळाष्टमी म्हणजे प्रभू प्रेमिकांच्या आनंदाची पराकाष्टा.
             गोप म्हणजे गवळी मग गवळी कुठे पाहायला मिळतात तर श्रीकृष्णाच्या गोकुळात .मुलांना खेळणे व खाणे दोन्ही पाहिजेत .त्यापासून गावातला व शहरातला बालक वंचित राहता कामा नये व गावामध्ये परकेपणा राहता कामा नये. श्रीकृष्ण दही लोणी चोर म्हणून विख्यात आहे. श्रीकृष्ण लहान होते त्यावेळी घराघरातून लोण्याची चोरी करत होते आणि ते लोणी सर्व गोपाळांना वाटून खात होता . त्यामुळे सर्व सर्व गोपाळ धष्टपुष्ट होत होते. लोणी म्हणजे नवनीत ,अर्क ,सार .प्रत्येक घरात जे साररूप असे जे काही घेण्यासारखे सदगुण होते ते सर्व श्रीकृष्ण बाल गोपाळांजवळ प्रदर्शित करत होता . असे घराघरातील व व्यक्ती व्यक्तीमधील लोणीरूप सदगुण तो सर्व गोपालाना खावू घालीत होता. त्यामुळे त्यांचे जीवन पुष्ट होत होते.आतल्या आत होणारे क्लेश ,कलह,खरे खोटेपणा राहतच नसत .सर्व प्रेमाने व शांतीने राहत होते . श्रीकृष्णाचे बालपण आपल्याला दोन गोष्टी समजावते ,एक श्रेष्टतेचा गर्व सोडून लोकांचा बनून रहा व दुसरी गोष्ट शरीर निरोगी व बलवान ठेवा . म्हणून श्रीकृष्णाने मुलांमध्ये ऐक्य निर्माण केले . त्यांने गवळ्यामध्ये राहून संबंध वाढवला . श्रीकृष्णाने खेळातून आपल्या सवंगड्या मध्ये ऐक्य निर्माण केले .त्यावेळे पासूनच आपल्या भारत देशामध्ये खेळ खेळण्याची पद्धत सुरु झाली.
             श्रीकृष्णाने सर्वांच्या हृदयाला जिंकले होते .सामान्य लोकांत त्याने आत्मप्रत्यय उभा केला . गवळ्यात मिसळून त्यांना धर्म युद्धा करता जागविले . त्याने अधासुर व बकासुर यांना मारले .अध म्हणजे पाप व बक म्हणजे दंभ . गोकुळातील पापी विचारांच्या व दांभिक वृत्तीच्या लोकांचा त्याने नाश केला . कालिया हा नाग जातीचा होता . स्वताच्या विषारी व विकारी विचारांच्या प्रचाराने तो यमुनेच्या आसपासच्या प्रदेशातील लोकांना त्रास देत होता.त्या कालिया नागाचाही श्रीकृष्णाने नाश केला.
            कृष्णाची मूर्ती समोर पाहताच कधी असेही वाटते , मुरली किती भाग्यवान आहे ! तिला प्रभुणे स्वताच्या ओठांवर धारण केले आहे आणि त्यातून प्रभू मधुर संगीत निर्माण करीत असतो. माथ्यावरचे मोरपीस किती भाग्यशाली आहे ! त्याला प्रभुने मस्तकावर धारण केले आहे आणि या गुंजांच्या माळांची तर गोष्टच न्यारी ! ज्यांना प्रभुने गळ्यात धारण केले आहे , हृदयाशी धरले आहे . जवळ उभी असलेली गाय किती भाग्यवान आहे . प्रभू तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत आहेत .ज्यांनी त्यांचे काम करण्याची तयारी दाखवली त्यांचे लहानात लहान व कमी दर्जाचे काम देखील भगवान श्रीकृष्णाने केले आहे . राजसूय यज्ञात त्याने पत्रावळी काढण्याचे काम केले आणि अर्जुनाच्या रथावर सारथी बनून त्याचे घोडे धुतले .
           ‘ श्रीमद्भागवत गीता ‘ हा आपला धर्मग्रंथ आहे .गीतेचे श्लोक स्वतः भगवंताने स्वमुखाने गाईलेले आहेत .कृष्णाच्या मुरलीचे संगीत म्हणजे गीता , कृष्ण म्हणजे कल्याण , कृष्ण म्हणजे आनंद , कृष्ण म्हणजे जीवनाचा सुगंध , कृष्ण म्हणजे नृत्य ! ज्याच्या जीवनात हा कृष्ण आलेला असेल तो नाचतच राहील.गात राहील. सुतकी चेहरा करून रडत बसणार नाही . जीवनाला कंटाळणार नाही . मृत्युच्या छायेत भीतीच्या भोवऱ्यात आणि आशेच्या अमर आश्वासनात कृष्णाचा जन्म झाला. कृष्ण आबालवृद्ध सर्वाना प्रिय बनला . बालकांचा जिवलग मित्र , तरुणांचा सखा आणि वृद्धांचा विसावा म्हणजे कृष्ण . कृष्णाचे बाल्य जीवनभर जिवंत राहिले . तो खेळला म्हणून आज सर्व जग त्याच्यात खेळत आहे . कृष्णाने प्रत्येक क्रियेत प्राण भरला. खेळात जीवन भरणारा व जीवनाला खेळ बनवणारा म्हणजे कृष्ण . कृष्णाने बाल्यातील बालीशता दूर करून तिच्यातील निर्दोषता जीवनात साकारीत केली. यशस्वी , मुत्सद्दी , विजयी योद्धा ,धर्म साम्राज्याचा उत्पादक , धर्माचा महान प्रचारक ,भक्तवत्सल तसच ज्ञानियांची व जिज्ञासूंची जिज्ञासा पूर्ण करणारा जगद्गुरू म्हणजे कृष्ण ! या कृष्णाला अनंत प्रणाम !
                                                                                                       
                                                                                                        *  संकलन *

                                                                                                     श्री. विवेक शेळके 

Wednesday, 24 August 2016

1ली ते 8 वी साठी प्रकल्प यादी

इ १ ते ८ वी प्रकल्प यादी

 
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नुसार  प्रकल्प यादी
               इ.१ ली ते ८ वी साठी प्रकल्प
इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -
भाषा -:
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी
,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
* पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.
गणित -:
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.
सामान्य विज्ञान -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.
इतिहास व ना.शास्त्र -:
* दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.
भूगोल -:
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

Friday, 12 August 2016

राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम

: *शासन निर्णय व परिपत्रक* 🔘

🇮🇳 *राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम*🇮🇳

*तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती*...



*राष्ट्रध्वज उतरवणे*

देशातील महान व्यक्ती, राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाल्यास त्यांचा सन्मान राखण्यासाठी शोक पाळण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रध्वजाला झुकविण्यात येते. याचा अर्थ ध्वज दंडाच्या मध्यभागी आणून फडकावण्याच्या स्थिती ठेवण्यात येते. राष्ट्रध्वज घेऊन संचलन किंवा मिरवणूकीने शोक व्यक्त केला जात असेल तर भाल्याच्या अग्रभागी काळ्या रंगाच्या दोन पट्टाय लावल्या जातील.
त्या पट्ट्या लटकलेल्या असतील. मात्र, असे प्रयोग केवळ शासनाच्या आदेशावरच होतील.

*खालील व्यक्तींचे निधन झाल्यास ध्वज उतरविण्याचे प्रभाव क्षेत्र*

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान- संपूर्ण भारतात
लोकसभा अध्यक्ष किंवा भारताचे सरन्यायाधीश- दिल्लीत
केंद्रिय मंत्रिमंडळ स्तरावरील मंत्री- केवळ दिल्ली व राज्यांच्या राजधानीत
केंद्र, राज्यमंत्री किंवा उपमंत्री - दिल्लीत
राज्यपाल, उपराज्यपाल, मुख्यमंत्री, संबधित किंवा संघशासित राज्याचा मुख्यमंत्री- संपूर्ण राज्य
कोणत्याही राज्याचा मंत्रिमंडळ स्तराचा मंत्री- संबंधित राज्याच्या राजधानीत
सूचना- दिल्ली म्हणजे दिल्ली महापालिका, नवी दिल्ली नगर पालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व भाग.

*विशेष स्थिती*

राष्ट्रीय उत्सवावेळी अर्थात पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीला देशातील मोठ्या व्यक्तीचे निधन झाल्यास राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. त्यावेळी ध्वज उतरविला पाहिजे.मात्र या दिवशी सर्वत्र ध्वजारोहण कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. फक्त ज्या इमारतीत त्या व्यक्तीचे पार्थिव ठेवले आहे, तेथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविलेला असेल. पार्थिव शरीर अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्यात आल्यानंतर राष्ट्रध्वजाला पूर्ण उंच फडकावले पाहिजे.

*शहिदांवर राष्ट्रध्वज*

देशासाठी प्राणांचे बलिदान देणार्‍या जवानांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रध्वज त्यांच्यावर लपेटण्यात येतो. त्यावेळी केशरी पट्टी डोक्याच्या दिशेने आणि हिरवी पट्टी मांड्यांच्या दिशेने असली पाहिजे. पांढरी पट्टी डोक्यापासून पायापर्यंत आणि केशरी आणि हिरवी पट्टी डाव्या व उजव्या बाजूला अशी स्थिती अजिबात नको. आणखी एक महत्त्वाची बाब. शहीद वा मोठ्या व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रध्वज जाळायचा वा दफन करायचा नाही. मुखाग्नी देण्यापूर्वी किंवा दफन करण्यापूर्वी तो काढून घेतला पाहिजे.

*नष्ट कसा करायचा*

रंग उडालेला, फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यास योग्य नसतो. असे करणे म्हणजे ध्वजाचा अपमान करणे आहे हे लक्षात ठेवा. राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे. किंवा वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे. पार्थिव शरीरावरून उतरवलेल्या ध्वजाच्या बाबतीतही असे केले पाहिजे.

*राष्ट्रध्वजाचा अपमान*

पाणी ओतणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे किंवा व्यावसायिक उद्देशाने वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो. राष्ट्रध्वज झुकवणे हाही अपमान समजला जातो.
*शासन निर्णय व परिपत्रक*🔘

⚜ *```ध्वजसंहिता```* ⚜

‬ 🇮🇳🇮🇳 ध्वजसंहिता 26 जानेवारी 2002 ला नवीन ध्वजसंहिता अंमलात आली.

🇮🇳 ध्वजसंहितेत झालेले बदल-

1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.

2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.

3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.)

4) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये.

🇮🇳🇮🇳ध्वजप्रतिज्ञा 🇮🇳🇮🇳

 "मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम,समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे."

🇮🇳🇮🇳ध्वजारोहन क्रम🇮🇳🇮🇳

1) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे
2) राष्ट्रीय सलामी
3) राष्ट्रगीत
4) ध्वजप्रतिज्ञा
5) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा.

 *****!!!!!*****‬: राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.

राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.

ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.

 संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात.

मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.

राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.

शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.

रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे.

प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.

 ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.

ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.

 अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.

कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.

 ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.

जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.

 कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.

इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये.

केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये.

तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.

ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्या संदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.

त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.

ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.

कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.

तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये.

राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.

ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.

राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.

शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.

जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.

सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.

आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

🍁➖➖➖➰➖➖➖🍁
*शासन निर्णय व परिपत्रक* 🔘