गोकुळाष्टमी
कृष्णपक्ष्याच्या अष्टमीच्या
चंद्राप्रमाणे एका पायावर भार देऊन , पाय वाकडा ठेऊन, शरीराला कमनीय वळण देऊन उभा
राहिलेल्या मुरलीधराने ज्या दिवशी संसारात प्रथम पदार्पण केले तो दिवस इतिहासात
अमर झाला आहे. मेघांच्या गडगडाटात, विजेच्या कडकडाटात ,मुसळधार पाऊस पडत आहे अशा
वेळी श्रीकृष्णाचा जन्म झाला .जेव्हा जीवनात अंधार दाटतो , निराशेचे उदास वातावरण
पसरते , आपत्तींचा पाऊस पडतो ,खूप दुखः येते त्यावेळी भगवान श्री कृष्ण जन्म घेतो.
अंधारात जेव्हा प्रकाश किरण दिसतात , उष:कालचा सूर्य जेव्हा स्वतःची आभा पसरवतो
त्यावेळी सर्वांचे हृदय पुलकित होते .
मुक्तीदात्या, गीतेच्या उद्गात्या ,
लोकांना तारणाऱ्या अशा उद्धारक कृष्णाचा जन्म झाला त्यावेळी सर्व लोक दुखः संताप
विसरून आनंदोल्लासात नाचले आणि तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून प्रसिद्ध पावला. कृष्ण
गोकुळात जन्मला . गोकुळ म्हणजे हे शरीर . ‘गो’ म्हणजे इंद्रिय व ‘कुळ’ म्हणजे
समुदाय .या इंद्रियांचा समुदाय जेथे आहे ते गोकुळ . भारतात अनंत अवतार झाले .अशा
भारत देशातील रत्नात शोभणारा कौस्तुभमणी म्हणजे भगवान श्रीकृष्ण ! सर्वच दृष्टींनी
कृष्ण पूर्णावतार आहे .त्यांच्या जीवनात कोणत्याही ठिकाणी नावे ठेवायला जागा नाही
.एकही स्थान असे नाही कि जेथे उणीव दिसेल. अध्यात्मिक , सामाजिक नैतिक किंवा
दुसऱ्या कोणत्याही दृष्टीने पहिले तरी कृष्णासारखा समाज उद्धार करणारा दुसरा कोणी
झालेला नाही. अध्यात्म आचरावे तर भगवान श्रीकृष्णाचेच . कृष्णाने सामान्य माणसांना
समजावले , खिश्यात भले दिडक्या नसतील पण तेजस्वीपणे व निष्ठेने एकत्रित होऊन श्वास
सोडला ,तर जग बदलून जाईल .
भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे जीवन
एवढे सुंदर व सुगंधित बनवले होते कि , जो कोणी त्यांच्याकडे पाहिलं त्याला तो आपला
वाटत होता . सर्वांना त्याच्यावर प्रेम करण्याचा उमाळा येत होता. रोज तोच सूर्य
उगवतो पण केवढा आनंद होतो ! पक्षी तेवढ्याच आनंदाने किलबिलाट करतात . गोकुळाष्टमी
तशीच प्रत्येक वर्षी येते पण केवढा आनंद देते ! कृष्णाचे जीवन तसच आहे
.गोकुळाष्टमी म्हणजे प्रभू प्रेमिकांच्या आनंदाची पराकाष्टा.
गोप म्हणजे गवळी मग गवळी कुठे
पाहायला मिळतात तर श्रीकृष्णाच्या गोकुळात .मुलांना खेळणे व खाणे दोन्ही पाहिजेत
.त्यापासून गावातला व शहरातला बालक वंचित राहता कामा नये व गावामध्ये परकेपणा
राहता कामा नये. श्रीकृष्ण दही लोणी चोर म्हणून विख्यात आहे. श्रीकृष्ण लहान होते
त्यावेळी घराघरातून लोण्याची चोरी करत होते आणि ते लोणी सर्व गोपाळांना वाटून खात
होता . त्यामुळे सर्व सर्व गोपाळ धष्टपुष्ट होत होते. लोणी म्हणजे नवनीत ,अर्क
,सार .प्रत्येक घरात जे साररूप असे जे काही घेण्यासारखे सदगुण होते ते सर्व
श्रीकृष्ण बाल गोपाळांजवळ प्रदर्शित करत होता . असे घराघरातील व व्यक्ती
व्यक्तीमधील लोणीरूप सदगुण तो सर्व गोपालाना खावू घालीत होता. त्यामुळे त्यांचे
जीवन पुष्ट होत होते.आतल्या आत होणारे क्लेश ,कलह,खरे खोटेपणा राहतच नसत .सर्व
प्रेमाने व शांतीने राहत होते . श्रीकृष्णाचे बालपण आपल्याला दोन गोष्टी समजावते ,एक
श्रेष्टतेचा गर्व सोडून लोकांचा बनून रहा व दुसरी गोष्ट शरीर निरोगी व बलवान ठेवा
. म्हणून श्रीकृष्णाने मुलांमध्ये ऐक्य निर्माण केले . त्यांने गवळ्यामध्ये राहून
संबंध वाढवला . श्रीकृष्णाने खेळातून आपल्या सवंगड्या मध्ये ऐक्य निर्माण केले
.त्यावेळे पासूनच आपल्या भारत देशामध्ये खेळ खेळण्याची पद्धत सुरु झाली.
श्रीकृष्णाने सर्वांच्या हृदयाला
जिंकले होते .सामान्य लोकांत त्याने आत्मप्रत्यय उभा केला . गवळ्यात मिसळून
त्यांना धर्म युद्धा करता जागविले . त्याने अधासुर व बकासुर यांना मारले .अध
म्हणजे पाप व बक म्हणजे दंभ . गोकुळातील पापी विचारांच्या व दांभिक वृत्तीच्या
लोकांचा त्याने नाश केला . कालिया हा नाग जातीचा होता . स्वताच्या विषारी व विकारी
विचारांच्या प्रचाराने तो यमुनेच्या आसपासच्या प्रदेशातील लोकांना त्रास देत होता.त्या
कालिया नागाचाही श्रीकृष्णाने नाश केला.
कृष्णाची मूर्ती समोर पाहताच कधी
असेही वाटते , मुरली किती भाग्यवान आहे ! तिला प्रभुणे स्वताच्या ओठांवर धारण केले
आहे आणि त्यातून प्रभू मधुर संगीत निर्माण करीत असतो. माथ्यावरचे मोरपीस किती
भाग्यशाली आहे ! त्याला प्रभुने मस्तकावर धारण केले आहे आणि या गुंजांच्या माळांची
तर गोष्टच न्यारी ! ज्यांना प्रभुने गळ्यात धारण केले आहे , हृदयाशी धरले आहे .
जवळ उभी असलेली गाय किती भाग्यवान आहे . प्रभू तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत
आहेत .ज्यांनी त्यांचे काम करण्याची तयारी दाखवली त्यांचे लहानात लहान व कमी
दर्जाचे काम देखील भगवान श्रीकृष्णाने केले आहे . राजसूय यज्ञात त्याने पत्रावळी
काढण्याचे काम केले आणि अर्जुनाच्या रथावर सारथी बनून त्याचे घोडे धुतले .
‘ श्रीमद्भागवत गीता ‘ हा आपला धर्मग्रंथ आहे
.गीतेचे श्लोक स्वतः भगवंताने स्वमुखाने गाईलेले आहेत .कृष्णाच्या मुरलीचे संगीत
म्हणजे गीता , कृष्ण म्हणजे कल्याण , कृष्ण म्हणजे आनंद , कृष्ण म्हणजे जीवनाचा
सुगंध , कृष्ण म्हणजे नृत्य ! ज्याच्या जीवनात हा कृष्ण आलेला असेल तो नाचतच
राहील.गात राहील. सुतकी चेहरा करून रडत बसणार नाही . जीवनाला कंटाळणार नाही . मृत्युच्या
छायेत भीतीच्या भोवऱ्यात आणि आशेच्या अमर आश्वासनात कृष्णाचा जन्म झाला. कृष्ण
आबालवृद्ध सर्वाना प्रिय बनला . बालकांचा जिवलग मित्र , तरुणांचा सखा आणि
वृद्धांचा विसावा म्हणजे कृष्ण . कृष्णाचे बाल्य जीवनभर जिवंत राहिले . तो खेळला
म्हणून आज सर्व जग त्याच्यात खेळत आहे . कृष्णाने प्रत्येक क्रियेत प्राण भरला.
खेळात जीवन भरणारा व जीवनाला खेळ बनवणारा म्हणजे कृष्ण . कृष्णाने बाल्यातील
बालीशता दूर करून तिच्यातील निर्दोषता जीवनात साकारीत केली. यशस्वी , मुत्सद्दी ,
विजयी योद्धा ,धर्म साम्राज्याचा उत्पादक , धर्माचा महान प्रचारक ,भक्तवत्सल तसच
ज्ञानियांची व जिज्ञासूंची जिज्ञासा पूर्ण करणारा जगद्गुरू म्हणजे कृष्ण ! या
कृष्णाला अनंत प्रणाम !
* संकलन *
श्री. विवेक शेळके
No comments:
Post a Comment